वाढता उष्मा आणि चार्याच्या अभावामुळे गुरांची फरफ ट होत आहीे. सध्या उन्हाचा तडाखा सर्वत्र वाढला आहे. मानवाबरोबरच प्राण्यांनाही उष्माचा त्रास मोठ्या प्रमाणात जाणवू लागला आहे. अशातच जनावरांसाठी हिरव्या व सुक्या चार्यांचा देखील अभाव निर्माण झाला आहे. त्यामुळे मोकाट जनावरांना खाण्यासाठी अन्न पाण्याची कमतरता भासू लागली आहे. ही मोकाट गुरे सध्या पालीत कचराकुंड्या व उकिरड्यावर जावुन मिळेल ते खात आहेत. त्यामुळे त्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे. शिवाय स्वच्छतेचा प्रश्न देखील ऐरणीवर आला आहे. पालीकर समस्यांच्या विळख्यातून कधी बाहेर पडणार असा सवाल उपस्थित होत आहे. तेथील जुने पोलीस स्थानक, कुंभारआळी, बाजारपेठ, मधली आळी, बल्लाळेश्वर मंदिर, महाकाली मंदिर परिसर, मिनिडोअर स्टॅन्ड, भोईआळी, आगर आळी या ठिकाणी कचरा कुंड्यांवर सकाळ पासूनच मोकाट गुरांची गर्दी असते. येथे टाकलेला कचरा ही गुरे अस्ताव्यस्त करतात त्यामुळे येथे घाण व दुर्गंधी पसरते. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य देखील धोक्यात येते. बर्याचवेळा टाकुन दिलेले अन्न पदार्थ पिशव्यांमध्ये असते. याचे नागरिकांना भान नसते. परिणामी गुरांच्या पोटात कमी अधिक प्रमाणात प्लास्टिक जाते. प्लास्टिक व सडके आणि कुजलेले अन्न पदार्थ खाऊन या जनावरांच्या आरोग्यावर घातक परिणाम होतात. त्यांची पचनशक्ती मंदावते, अन्नाच्या शोधात सतत चालल्याने त्यांची ऊर्जा कमी होते. अशक्तपणा येतो. कचराकुंड्या मध्ये व उकिरड्यावरील कचर्यात धातू तसेच धारधार वस्तू उदा. घरगुती वापराची सुई, इंजेक्शनच्या सुय्या आदी घटक असतात. त्या पोटात गेल्यामुळे जनावरांच्या जठराला व अन्न नलिकेला इजा पोहचते. सतत प्लास्टिक खाल्ल्यामुळे ते त्यांच्या पोटात साठते. त्यामुळे गुरे मरतात देखील. काही वेळेस अशा मेलेल्या गुरांची हाडे इतर गुरे आणि प्राणी चघळतात व पर्यायाने त्यामुळे त्यांचा देखील मृत्यू होतो आणि हे दुष्टचक्र सुरूच राहते. पालीचे उपनगराध्यक्ष आरिफ मणियार यांच्या म्हणण्यानुसार उष्म्याने जनावरांच्या चार्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. त्यामुळे शेतकरी किंवा गुरेमालक आपली गुरे चरण्यासाठी मोकाट सोडून देतात. शासनाने मोकाट गुरांच्या चारा पाण्याची व्यवस्था केली पाहिजे. तसेच पशुपालकांना यासाठी अनुदान दिले पाहिजे. नागरिकांनी कचराकुंड्यांमध्ये कचरा न टाकता घंटागाडीतच कचरा टाकावा. जेणेकरून गुरे तेथे येणार नाहीत.तर शेतकर्यांनी व पशुपालकांनी आपली जनावरे मोकाट सोडू नयेत. त्यांना पेंढा किंवा सुके गवत खाऊ घालावे. कचर्यात किंवा उकिरड्यावर टाकलेले अन्न पदार्थ खाऊन गुरांची पचनक्रिया बिघडते. टाकलेले मानवी खाद्य हे जनावरांसाठी नाही. वारंवार प्लास्टिक पोटात गेल्याने ते पोटात साठून गुरांचा मृत्यू देखील होऊ शकतो. शहरी तसेच ग्रामीण भागात निसर्गपूरक जीवन अंगिकारणे गरजेचे असल्याचे सुधागड तालुका पशुधन विकास अधिकारी डॉ. प्रशांत कोकरे यांनी म्हटले आहे. मानवाबरोबर प्राण्यांचे जीवनही तेवढेच महत्त्वाचे आहे. निसर्ग साखळीतील प्रत्येक आज महत्त्वाचा आहे, यामुळे या सर्वाचा विचार गांभिर्याने होणे गरजेचे आहे. गेले काही वर्ष गुरांच्या चार्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. यामुळे गुरांना वेळेत चारा मिळत नाही. मोकाट गुरे तर सर्वत्र सोडून दिलेली असतात. संबधित गुरे मालकांना याची कल्पना दिली पाहिजे. यासाठी संबधित प्रशासनाने याकडे गांभिर्याने बघणे गरजेचे बनले आहे.
-धम्मशील सावंत