पनवेल : रामप्रहर वृत्त
स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू अर्थात बालकांचे चाचा नेहरू यांचा जन्मदिन देशभर बाल दिन म्हणून उत्साहात साजरा केला जातो. रयत शिक्षण संस्थेच्या गव्हाण येथील श्री. छत्रपती शिवाजी विद्यालय व ज. आ. भगत ज्युनियर कॉलेजमध्येही पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिन बालदिन म्हणून उत्साहात साजरा करण्यात आला. इयत्ता सहावी ’अ’ या वर्गातील बालकांनीच हा उत्सव साजरा केला. प्रारंभी पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या प्रतिमेचे पूजन सुयशा पाटील यांनी केले तर सहावी ‘अ’ या वर्गातील विद्यार्थ्यांनीच श्रीफळ वाढवले. सूत्रसंचालन सांस्कृतिक विभागाच्या सहायक हर्षाला पाटील यांनी केले. इयत्ता सहावी ‘अ’ या वर्गाच्या वतीने कार्यक्रमाचे नेटके नियोजन करण्यात आले. या वर्गाच्या वर्गशिक्षिका अपर्णा देवकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या वर्गातील विद्यार्थ्यांनी कार्यक्रमाचे आखीव नियोजन केले. या वेळी पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या प्रतिमेसमोर नतमस्तक होऊन विद्यार्थ्यांनी त्यांच्या आवडत्या चाचा नेहरूंना अभिवादन केले. या कार्यक्रमास विद्यालयाचे प्रभारी प्राचार्य प्रमोद मंडले यांच्यासह रयत शिक्षण संस्थेचे लाईफ मेंबर व समन्वय समिती सदस्यद्वय प्रमोद कोळी व रवींद्र भोईर, संस्थेच्या लाईफ वर्कर ज्योत्स्ना ठाकूर, शिक्षक व शिक्षिका आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.