मशिदींवरील भोंग्यांविषयीच्या राज ठाकरे यांच्या भूमिकेमुळे शिवसेनेची चांगलीच पंचाईत झालेली दिसते. अधुनमधून हिंदुत्वाची आरोळी ठोकणार्या शिवसेनेची अवस्था तेलही गेले, तूपही गेले अशीच सध्या झालेली आहे. हिंदुत्वाचा प्रखर पुरस्कार करावा तर ज्यांच्या सोबत सत्तेमध्ये मांडीला मांडी लावून बसलो ते नवे मित्रपक्ष दुखावतात. त्यांना चुचकारण्यासाठी हिंदुत्वाचा बाणा सोडून द्यावा तर परंपरागत मतदार हातातून निसटण्याची भीती आहे. अशा कात्रीत शिवसेना सध्या सापडली आहे. कुठल्याही राजकीय वादाला तोंड फुटले की निवडणुका जवळ आल्या आहेत अशी खूणगाठ सामान्य मतदार मनातल्या मनात बांधत असतो. गेली दोन-अडीच वर्षे मात्र त्यास अपवाद मानावी लागतील. महाविकास आघाडी सरकार सत्तेवर आल्यापासून नित्यनवे वाद आणि वादंग महाराष्ट्राच्या नागरिकांना अनुभवावे लागत आहेत. भ्रष्टाचाराच्या प्रकरणांमुळे आधीच डागाळलेली महाविकास आघाडी नव्याने उद्भवलेल्या मशिदींवरील भोंग्यांच्या वादामुळे फरफटत चालली आहे असे चित्र दिसते. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोेंगे उतरवण्याबाबत सत्ताधारी आघाडीला निर्वाणीचा इशारा दिला आहे. 3 मेपर्यंत मशिदींवरचे भोंगे उतरवले नाहीत तर मनसे स्टाइलने त्यावर उपाययोजना करण्याचा खणखणीत इशारा त्यांनी ठाण्यात झालेल्या सभेत दिला. वास्तविक मनसेच्या या भूमिकेमध्ये नवीन असे काहीही नाही. मशिदींवरील तसेच सार्वजनिक भोंग्यांबाबत सर्वोच्च न्यायालयाने 2005 सालीच मनाई आदेश दिला होता. या आदेशाचे तंतोतंत पालन व्हावे ही भूमिका राज ठाकरे यांनी यापूर्वीही दोन-तीनदा मांडली आहे. भोंगे उतरवले नाहीत तर मशिदींसमोर मोठे स्पीकर लावून हनुमान चालिसाचे पठण केले जाईल हा त्यांचा धमकीवजा इशारा मात्र नवीन आहे. राज ठाकरे यांच्या इशार्याचे पालन मनसेच्या महाराष्ट्र सैनिकांनी ठिकठिकाणी केले. आता अमरावतीचे अपक्ष आमदार रवी राणा यांनी मातोश्रीसमोर हनुमान जयंतीला हनुमान चालिसाचे पठण करण्याचे जाहीर आव्हान दिले आहे. अपक्ष आमदार-खासदारांचेही शिवसेनेला ललकारण्याचे धाडस होते हीच बाब काही कडवट शिवसैनिकांना सलू लागली आहे. एकेकाळी मुंबईवर दबदबा राखून असलेल्या शिवसेनेला ही अवहेलना भोगावी लागत आहे ती त्यांच्या दुटप्पी राजकारणामुळे. राज ठाकरे यांनी हनुमान चालिसाचे पठण करण्याची जी शक्कल शोधून काढली, ती वार्याच्या वेगाने देशभर पसरत आहे. उत्तर प्रदेशसारख्या दूरच्या राज्यामध्ये देखील काही हिंदुत्ववाद्यांनी भोंग्यावरून हनुमान चालिसाचे पठण सुरू केल्याच्या बातम्या येऊ लागल्या आहेत. नजीकच्या काळात महाराष्ट्रभर हे लोण पसरत गेले तर आश्चर्य वाटायला नको. पूर्वीची शिवसेना अस्तित्वात असती तर राज ठाकरे यांच्या घोषणेला त्यांचे प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष पाठबळच मिळाले असते. परंतु आता इकडे आड, तिकडे विहिर अशी शिवसेनेची अवस्था झाली आहे. राज ठाकरे यांनी सुरू केलेल्या राजकारणाचे नेमके काय करायचे हेच मुळात महाविकास आघाडीच्या नेत्यांना अजुन कळलेले नाही. म्हणूनच शनिवारी हनुमान जयंतीला ठिकठिकाणी मंदिरांमध्ये महाआरती करण्याचा कार्यक्रम राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी घेतल्याचे समजते. हनुमान चालिसाच्या पठणाला आमचा विरोध नाही हे दाखवण्याचा हा केविलवाणा प्रयत्न म्हणावा लागेल. निवडणुका डोळ्यासमोर ठेवून काही पक्ष सामाजिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत असल्याची टीका एकीकडे करायची आणि दुसरीकडे स्वत:च महाआरतीला उभे राहायचे हा महाविकास आघाडीचा दुटप्पीपणा मतदारांना सहज ओळखता येईल.
Check Also
शेकाप उमेदवार चित्रलेखा पाटील यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल
अलिबाग शासकीय कार्यालयात जाऊन प्रचार अलिबाग : प्रतिनिधी अलिबाग-मुरूड विधानसभा मतदरसंघाच्या शेतकरी कामगार पक्षाच्या उमेदवार …