पनवेल : वार्ताहर
गुन्हे शाखा कक्ष-3 कडून 60,72,000 रुपये किमतीचा प्रतिबंधित सुगंधीत तंबाखू व पानमसाला (गुटखा) साठ्यासह चार टेम्पो जप्त करून सात आरोपी गजाआड करण्यात आले आहेत. या त्यांच्या धडक कारवाईमुळे बेकायदेशीररित्या असा व्यवसाय करणार्यांचे धाबे दणाणले आहेत.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक शत्रुघ्न माळी यांना गोपनीय बातमीदारामार्फत महापे एमआयडीसी परिसरात मोठ्या प्रमाणात गुटख्याचा साठा करण्यात आला असून त्याची विक्री होणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार कक्ष 3 गुन्हे शाखेकडून गस्त व सापळा रचण्यात आला होता.
महापे एमआयडीसीमधील टाटा मोटर्स परिसरातील पीएपीए 202 या गोडावूनजवळ चार संशयीत टेम्पो दिसून आल्याने त्यापैकी एका टेम्पोची पाहणी केली असता त्यामध्ये विमल गुटखा मिळून आला. त्यानंतर चारही टेम्पोची तपासणी करता सदर ठिकाणी मिळून आलेल्या चारही टेम्पोमध्ये विमल गुटखा भरलेला आढळुन आला त्यांचेकडे अधिक चौकशी करता त्यांनी सदरचा विमल गुटखा त्या ठिकाणचे गोडावुन मधुन टेम्पोमध्ये भरल्याचे टेम्पोचालकांनी सांगितले.
गोडावूनमध्ये जाऊन पाहणी केली असता तेथेही गुटखा मिळुन आला. एकुण 42,72,000 रुपयांचा सुगंधी तंबाखू व पानमसाला (विमल गुटखा) व गुन्हा करण्याकरिता वापरलेली 18,00,000 रुपयांचे एकुण चार टेम्पो जप्त करण्यात आले आहेत. गुन्ह्यात एकुण 60,72,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त सात आरोपींना अटक करण्यात आलेली आहे. यामध्ये आरोपी इसरार अहमद नियाज अहमद शेख (वय 45, रा. ठाणे), सुरज हरिश ठक्कर (वय 41, रा. डोंबिवली), सस्तु रामेत यादव (वय 34, रा. उत्तर प्रदेश), नितीन बाबूराव कसबे (वय 49, रा. मुलुंड), नौरुद्दीन अलिशौकत सय्यद (वय 26, रा. मानखुर्द), मोहम्मद नफिस रफिक शेख (वय 34, रा. दहिसर), पवनकुमार पन्नालाल श्रीवास्तव (वय 27, रा . नवी मुंबई) हे आहेत.