कडेकोट पोलीस बंदोबस्त : देवस्थानकडून सुयोग्य नियोजन
पाली : प्रतिनिधी
राज्यात कोरोनाची लाट ओसरली आहे. शासन निर्बंध शिथिल होऊन धार्मिक स्थळे व मंदिरे दर्शनासाठी खुली करण्यात आली आहेत. अष्टविनायकाचे प्रख्यात धार्मिक स्थळ असलेल्या पालीत भाविक व गणेशभक्तांची गर्दी उसळत आहे. कोरोनातील निर्बंध उठल्यानंतरची पहिली अंगारकी संकष्टी मंगळवारी (दि.19) आहे. त्यासाठी बल्लाळेश्वर देवस्थान ट्रस्ट व प्रशासन सज्ज झाले आहे. पोलीस बंदोबस्तही चोख ठेवण्यात आला आहे. उन्हाळी सुट्ट्यांमुळे हजारो भक्त पाली बल्लाळेश्वर नगरीत दाखल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पालीत मुंबई, पुणे, ठाणे, मुंबई उपनगर व रायगड कोकणातील विविध भागातून नागरिक मोठ्या संख्येने पालीत दाखल होतात. भाविकांची खासगी वाहने व बसेस येत असल्याने वाहतूककोंडीची समस्या भेडसावत आहे. वाहतूककोंडीसह गैरसोय टाळण्यासाठी प्रशासन सज्ज झाले आहे. तहसीलदार, पोलीस, मंदिर देवस्थान आणि नगरपंचायतींकडून अंगारकी संकष्टीच्या पाश्वभूमीवर नीटनेटके व सुसज्य नियोजन केले आहे. कोरोनातील निर्बंधांमुळे मागील दोन वर्षांतील अंगारकीला गणेश भक्तगणांना मनोभावे दर्शन घेता आलेले नव्हते. गतवर्षी अष्टविनायक तीर्थक्षेत्र वरदविनायक महड व पाली बल्लाळेश्वर मंदिर दर्शनासाठी खुले केले होते, मात्र मंदिरात तीन चार वर्ष पूर्वीसारखी गर्दी नसल्याने स्थानिक व्यावसायिकांचा हिरेमोड झाला. आता मंदिर परिसर गजबजुन जात आहेत. यंदा निर्बंध उठलेले असून अनेक शाळांच्या परिक्षाही संपत आलेल्या आहेत. जोडून शासकीय सुट्ट्या आल्यामुळे पर्यटकांचा अष्टविनायक दर्शनासाठी राबता वाढणार आहे. मंगळवारी होणार्या अंगारकी संकष्टी उत्सवाला हजारोच्या संख्येने भक्तगण दाखल होतील, असा अंदाज आहे. त्यानुसार बल्लाळेश्वर देवस्थान ट्रस्ट व प्रशासन, पोलीस यांच्यामार्फत नियोजन करण्यात आले आहे.
भक्तनिवासमार्गे वाहने वळविण्यात येणार
पालीत दाखल झालेल्या भाविकांच्या गाड्यांमुळे वाहतूककोंडी झाली होती. परंतू पाली पोलीस व बल्लाळेश्वर देवस्थानचे सुरक्षा रक्षक वाहतूककोंडी सोडविण्यासाठी प्रयत्न करत होते. दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये या दृष्टीने पाली पोलीस निरीक्षक विश्वजित काइर्ंगडे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रत्येक नाक्यावर चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. सर्व वाहने भक्तनिवास क्रमांक 1 च्या बाजूने वळविण्यात आली आहेत.
बल्लाळेश्वर देवस्थान ट्रस्टने जिल्हाधिकार्यांच्या आदेशानुसार विशेष खबरदारी घेत उपाययोजना केल्या आहेत. देवस्थानचे दोन भक्तनिवास नाममात्र दरात भाविकांसाठी उपलब्ध आहेत. भाविकांसाठी शुद्ध, थंड पाण्याची व सॅनिटायझरची व्यवस्था करण्यात आली आहे. रांगेत उभे राहण्यासाठी शेड उभारण्यात आली आहे. वाहने पार्क करण्यासाठी देवस्थानची दोन भव्य मोफत पार्किंग आहेत तसेच सुसज्ज स्वच्छतागृह उभारण्यात आले आहेत.
-अॅड. धनंजय धारप, अध्यक्ष, बल्लाळेश्वर देवस्थान ट्रस्ट, पाली