कर्जत : बातमीदार
नेरळ रेल्वेस्थानकातून जेमतेम 15 मिनिटांच्या अंतरावर असल्याने ममदापूरच्या नागरीकरण होत असलेल्या भागात मुंबईतील मध्यमवर्गीय लोकांनी घरे घेतली, मात्र त्या नागरी वस्तीतील लोकांना ममदापूर ग्रामपंचायत नळाचे पाणी पोहचवू शकली नाही. त्यामुळे येथील रहिवाशांना तेथे खोदलेल्या बोअरवेलचे पाणी सध्या प्यावे लागत आहे. दरम्यान, पावसाळ्यात पिण्याच्या पाण्यासाठी त्रासलेल्या ममदापूर नागरी भागातील लोकांना उन्हाळ्यात ट्रँकरचे पाणी विकत घ्यावे लागते. नेरळ ग्रामपंचायतला आणि कर्जत-कल्याण या राज्यमार्गाला लागून असलेल्या ममदापूर नागरी प्राधिकरणाच्या जागेत गेल्या सात वर्षात साधारण 200 इमारती उभ्या राहिल्या आहेत. जेव्हा या बिल्डिंग उभारण्यात आल्या त्या वेळी रेल्वेस्थानकाजवळ आहे, म्हणून शेकडोंनी घरे घेतली ती नोकरी आणि व्यवसाय करण्यासाठी सहज जाता येईल म्हणून घरे घेतली. या भागात घरामध्ये 24 तास पाणी उपलब्ध आहे, असे सांगण्यात आले, पण गेली सात वर्षे झाली तरी या नागरिकांना हक्काचे पाणी मिळाले नाही. नेरळ-ममदापूर संकुल प्राधिकरणमधील ममदापूर भागातील नागरी वसाहती ममदापूर ग्रामपंचायत हद्दीत आहेत. त्या भागातील इमारतींना ममदापूर ग्रामपंचायतीने पाणीपुरवठा करणे आवश्यक आहे. नेरळ नळपाणी योजनेचे पाणी ममदापूर गावात येते, पण नेरळ ग्रामपंचायतीला लागून असलेल्या या भागातील जनता आजही तहानलेली आहे. ममदापूर ग्रामपंचायतची अडीच कोटींची नळपाणी योजना पूर्ण झाली आहे, पण आता ग्रामपंचायत ती नळपाणी योजना गावासाठी आहे, असे सांगत आहे. त्यामुळे वेगवेगळ्या प्रकारचे कर ग्रामपंचायतीला भरणारे ममदापूर नागरी वसाहतीमधील लोक पाण्यापासून मात्र वंचित आहेत.
ममदापूर ग्रामपंचायतीने प्रत्येक करदात्याला पिण्याचे पाणी दिले पाहिजे. नागरीकरण झाल्याने पाण्याची टंचाई जाणवू शकते, पण आठ हजार लोकांसाठी बनवलेली भारत निर्माणची नळपाणी योजना फक्त गावातील लोक यांच्यासाठी आहे हे काही उमजत नाही?
-शावस्ती सचिन अभंगे, ग्रामपंचायत सदस्य
आम्ही घरे विकत घ्यायला आलो त्या वेळी बांधकाम व्यवसायिकांनी अनेक आश्वासने दिली. त्यात 24 तास नळाचे पाणी आम्हाला दिले जाणार होते, पण आता आम्ही बोअरवेलचे पाणी पीत आहोत. ग्रामपंचायतला आम्ही कर भरतो, त्यामुळे त्यांनी स्वच्छ पाणीपुरवठा करायला हवा.
-अहमद शहजाद आलम, स्थानिक रहिवासी
ममदापूरमधील नागरीकरण झालेल्या भागातील जनतेसाठी प्राधिकरणाकडून 60 लाख रुपयांची तरतूद केली आहे. त्यातून दोन लाख लीटर पाण्याचे जलकुंभ उभारण्यात येणार असून, जलवाहिनी टाकण्यासाठी वितरण व्यवस्था यांच्यासाठी तरतूद करण्यात आली आहे. हा निधी लघुपाटबंधारे विभागाच्या माध्यमातून खर्च करण्याची कार्यवाही प्राधिकरणाने सुरू केली आहे.
-आर. एस. देवांग, तांत्रिक अधिकारी, नेरळ-ममदापूर संकुल प्राधिकरण