पावसाळ्यासंबंधीची कामे 15 मेपूर्वी पूर्ण करा; नवी मुंबई आयुक्तांचे निर्देश
नवी मुंबई ः बातमीदार
महापालिका मुख्यालयात वर्षभर, अहोरात्र सुरू असणार्या प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन केंद्राप्रमाणेच पावसाळ्यात बेलापूर, नेरूळ, वाशी, ऐरोली येथील अग्निशमन केंद्रांच्या ठिकाणी 25 मेपासून आपत्कालीन नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात येणार आहेत, तसेच आठही महापालिका विभाग कार्यालयात विभागीय नियंत्रण कक्ष सुरू करून या सर्व ठिकाणी आवश्यक साधनसामुग्री व उपकरणांसह मदत करण्यासाठी पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध ठेवण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. पावसाळापूर्व कामांविषयक घेतलेल्या बैठकीत आयुक्तांनी 15 मेपर्यंत कामे पूर्ण करण्याचे निर्देश दिले. नवी मुंबई पालिकेची पावसाळापूर्व कामांविषयक बैठक मंगळवारी (दि. 19) झाली. या बैठकीत विविध महत्त्वाच्या विषयांवर चर्चा करण्यात आली. बैठकीला अतिरिक्त आयुक्त सुजाता ढोले व संजय काकडे तसेच इतर सर्व प्राधिकारणांचे अधिकारी होते. अग्निशमन विभागाकडे असलेल्या रबर बोटी, पाणीउपसा पंप तसेच इतर साहित्य व उपकरणे कार्यान्वित असल्याबाबत तपासणी करून घ्यावी, असेही निर्देश देण्यात आले आहेत. आपत्ती नियंत्रण कक्षातील दूरध्वनी कोणत्याही परिस्थितीत अनुत्तरित राहणार नाही याची काळजी घेतानाच, एखादी तक्रार प्राप्त झाल्यानंतर त्याचे त्वरित निराकरण झाले पाहिजे याकडे काटेकोर लक्ष देण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले आहेत. स्थापत्यविषयक कामे 24 तास सुरू ठेवावीत. रस्ते खड्डेमुक्त करावेत. दिवाबत्ती व्यवस्थित ठेवावी. पाणी साचू नये यासाठी महानगरपालिकेप्रमाणेच सार्वजनिक बांधकाम विभाग व एमआयडीसीने रस्त्यावर पडलेले डेब्रिज उचलावे. बंदिस्त नाले व नैसर्गिक नाल्यांची सफाई विहित वेळेत पूर्ण करावी. दुर्गम भागात नळाद्वारे पाणीपुरवठा होत नाही, तेथील पाणी नमुन्यांची नियमित तपासणी करावी. मलनि:स्सारण वाहिन्यांची झाकणे दुरूस्त करावीत. भरतीच्या काळात गटारांवरील झाकणे बॅकवॉटरमुळे उघडली जाणार नाहीत याची काळजी घ्यावी. याशिवाय जनरेटर बॅकअप ठेवावा. वाहतूक पोलीस विभागामार्फत सिग्नल यंत्रणा नियमित कार्यान्वित राहिल याकडे लक्ष द्यावे. तसेच स्पीडब्रेकर, झेब्रा क्रॉसिंगच्या रंगरंगोटीचीही कामे आपापल्या अखत्यारितील रस्त्यांवर करून घ्यावीत. महावितरण कंपनीने उघड्या केबल, डिपीची झाकणे बंद असण्याची खबरदारी घ्यावी व दुरूस्ती करून घ्यावी. धोकादायक इमारतींची यादी तयार करून ती जाहीर करण्यात यावी. परवाना विभागानेही धोकादायक होर्डींगची पाहणी करून दुरुस्ती करावी. पावसाळी कालावधीतील संभाव्य आजार लक्षात घेता आवश्यक औषधसाठा उपलब्ध करून ठेवावा. डास उत्पत्तीस्थाने आढळणार्या ठिकाणी दंडात्मक कारवाई करण्याचे निर्देश आरोग्य विभागाला देण्यात आले. झाडांच्या फांद्यांची आवश्यक तेवढ्याच प्रमाणात छाटणी करावी. हरित कचरा त्वरित उचलण्यासाठी उद्यान व स्वच्छता विभागांनी परस्पर समन्वय राखावा, अशा सूचना करण्यात आल्या आहेत.
आपत्कालीन निवार्याची योग्य सोय करावी
दरड, माती कोसळण्याची संभाव्य ठिकाणे, नैसर्गिक नाल्यांची ठिकाणे येथील नागरिकांना स्थलांतरीत करण्यासाठी दक्षता घ्यावी. आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांच्या निवार्याकरीता शाळा व समाजमंदिरांचे विभाग कार्यालयांनी पूर्वनियोजन करावे. आवश्यक अन्नधान्य साठा करून ठेवावा, अशा सूचना करण्यात आल्या.
RamPrahar – The Panvel Daily Paper