Breaking News

अमली पदार्थांची नशा

बॉम्बे डाईग, बॉम्बे बर्म ट्रेडिंग, ब्रिटानिया बिस्कीट, गो एअरलाईन्स या कंपन्या वाडिया समूहाच्या मालकीच्या. 2 शतकांच्या वर या समूहाचा औद्योगिक क्षेत्रात वावर, तेही उच्च स्थानी. 13.1 अब्ज डॉलर्स ची संपत्ती. देशातील सर्वात श्रीमंत उद्योजक नुस्ली वाडिया यांचे पुत्र, तर सध्याच्या मोसमात आयपीएलचा बहर सुरु असून जोरदार फटकेबाजीने नावलौकिक असलेल्या किंग्स इलेव्हन पंजाब क्रिकेट संघाचे अभिनेत्री प्रीती झिंटासह भागीदार असलेले नेस वाडिया अमली पदार्थ जवळ बाळगल्याप्रकरणी दोन वर्षाची न्यायालयाने शिक्षा ठोठावल्याची बातमी ऐन निवडणुकीच्या हंगामात देशात वार्‍यासारखी पसरली आणि नरेंद्र मोदी, उद्धव ठाकरे, शरद पवार, देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांच्या निवडणुकीतील तुफान फटकेबाजीला काही काळ विसरून देशातील या महान उद्योगपतीच्या करारनाम्याची चर्चा देशभर सुरु झाली. तशी ती काही वर्षापूर्वी 2014 मध्ये किंग्स इलेव्हन पंजाब ची मालकीण असणार्‍या अभिनेत्री प्रीती झिंटा हिच्याबरोबर गैरवर्तन केल्याची तक्रार पोलिसांत दाखल झाल्याने सुरु होती.

30 एप्रिल 2019 रोजी देशभरातील सर्वच वृत्तवाहिन्यांना मोठे खाद्य मिळाले. आणि ब्रेकिंग… ब्रेकिंग असा गलगलाट झाला. हिंदुस्तानातील श्रीमंत उद्योगपतीला  जपानच्या न्यायालयाने दोन वर्षाची शिक्षा सुनावली असल्याची ब्रेकिंग न्यूज सुरु झाली.  दुसर्या दिवशी प्रिंट मिडियानेही रकानेच्या रकाने भरून बातमी दिली. त्यावर प्रतिक्रिया देताना वाडिया ग्रुपच्या प्रवक्त्याने स्पष्टीकरण केले की, न्यायालयाने नेस वाडिया यांना ठोठावलेली शिक्षा निलंबित करण्यात आली आहे. सध्या नेस वाडिया हिंदुस्थानात असून नेसवर असलेल्या जबाबदारीचा कोणताही परिणाम होणार नाही.

देशातील नामांकित उद्योगपतीच्या वारसाला शिक्षा होणे ही मोठी खळबळजनक बाब आहे. मार्चमध्ये होक्कायडो या उत्तर जपानमधील बेटावरील न्यू चिटोस विमानतळावर 25 ग्राम गांजा जवळ बाळगल्याप्रकरणी जपान पोलिसांनी अटक केली होती. प्रशिक्षित  श्वानाने वाडिया यांच्याकडे अंमली पदार्थ असल्याबद्दल कस्टम अधिकार्‍यांना सावध केल्याने हा प्रकार उजेडात आला. देशातील अब्जाधीश घराण्यातील वाडिया ग्रुपचे नेस वाडिया हे उत्तराधिकारी. या बातमीने 17व्या लोकसभेचे वातारणात काही काळ बाजूला गेले तर या वृत्ताने शेअर्स बाजारात हलचल माजात  वाडिया समूहाच्या शेअर्सची मार्केटमध्ये चांगलीच घसरण झाली. इतकी झळ या बातमीने पोहचली. अमली पदार्थांचे सेवन व जवळ बाळगणे. भारतीय राज्य घटनेच्या अनुच्छेद 47 मध्ये सार्वजनिक आरोग्य आणि जनतेच्या आरोग्य रक्षणासाठी औषधी प्रयोजानाव्यतिरिक्त मादक पदार्थावरील बंदीची मार्गदर्शक तत्वे समाविष्ट करण्यात आली आहेत. छऊझड रलीं नार्कोटीक ड्रग्स आंडसायकोट्राफिक सबस्टेन्सेस कायदा 1985 नुसार नाशिले पदार्थ वापरणे गुन्हा ठरविण्यात आला आहे. 17 ऑगस्ट 2011 रोजी  महाराष्ट्र राज्याचे व्यसनमुक्ती धोरण जाहीर करण्यात आले. 26 जून हा जागतिक अमली पदार्थ विरोधी दिन म्हणून साजरा केला जातो. अमली पदार्थांची नशा  घातक, शरीरास अपायकारक आहे. बडे बडे उद्योगपती ते सडकछाप गर्दुले हे एकाच माळेत गणले जातात. मुंबईच्या कानाकोपर्‍यात पुलाखाली, उकिरड्यावर, स्मशानभूमीत, समुद्र किनार्‍याच्या पडीक बाजूला किंवा रेल्वे स्टेशनच्या कोपर्‍यात, मुतारीच्या बाजूला असे गर्दुले हमखास पडलेले असतात. यांना कुठलीच तमा नसते.  

दोन दिवसांपूर्वी  गुरुवारी (2 मे) पुणे चिंचवड येथील बीटवाईज कारखान्याजवळ दोन उच्चशिक्षित तरुणांना गांजा विकत असलेच्या कारवरून ताब्यात घेण्यात आले. अंमलीपदार्थ विरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक श्रीराम पोळ यांना विशाखापट्टणम येथून दोन तरुण अमलीपदार्थ विकावयास येत असल्याची खबर मिळाली होती. दबा धरून बसलेल्या अमलीपदार्थ विरोधी पथकाने योगेश दत्तात्रय जोध व सागर दिगंबर कदम या दोन जणांना ताब्यात घेत, त्यांच्याकडून 150 किलो गांज्या भरलेल्या गोनी जप्त केल्या. त्याची किंमत 35 लाख 80 हजार असल्याचे सांगण्यात आले. विशेष म्हणजे योगेश इंजिनिअर व सागर फार्मसीच चे शिक्षण घेत असून हे दोन्ही तरुण उच्च शिक्षित आहेत. शारदा केमिकल, एमआयडीसी बदलापूर, ठाणे या कारखान्यावर अमलीपदार्थ विरोधी पथकाने छापा मारून मेट्रोडेन अमलीपदार्थ जप्त केला. कारखाना मालक नारायण पटेल व शाहीर शहा या तस्कराला ताब्यात घेण्यात आले होते. नालासोपारा येथे अमलीपदार्थ विरोधी पथकाने दोन तस्करांना ताब्यात घेतले असता. या तस्करीत खुद्द पोलीस उपनिरीक्षक महेश चव्हाण सहभागी असल्याची माहिती समोर आल्याने पोलिसांचे डोकेच  चक्रावले. 24 मार्च 2019 रोजी बंगलोर विमानतळावर सहा कोटी रुपयांचे अमलीपदार्थ पोलिसांनी जप्त केले होते.

23 एप्रिल 2019 रोजी 2 तस्करांकडून एम.डी जप्त करण्यात आले होते. तर 19 एप्रिल 2019 मध्ये दोन महिला तस्करांकडून हेरॉईन जप्त करण्यात आले होते. गुजरात राज्यात 27 मार्च 2019 रोजी अमलीपदार्थांची बोट जप्त करण्यात आली आहे. 4 एप्रिल 2019 मध्ये अबु रेहान खान (24, रा. मुंब्रा) या तरुणाला  गुन्ह्यात अटक झाली. खांदेश्वर पोलिसांनी  दोन किलो वजनाचा 15 लाख किमतीच्या चरस सह आकाश साखरे (20) व बिट्टू रघुराज सिंग (26) यांना अटक केली होती. तर 18 जून 2018 रोजी कळंबोली पोलिसांनी महेंद्रसिंग भगतसिंग 78 याच्याकडून 16 किलो कोडाईन दोन लाख 44 हजार किमतीचा ऐवज जप्त करून गुन्हा दाखल केला. ठाणे ग्रामीण पोलिसांनी योगेश शाह (50) व सादेव जमादार (38) या दोखांना ताब्यात घेत त्यांच्याकडून तीन कोटी 25 किलो इफ्रेड्रीन हे अमलीपदार्थ जप्त केले होते. 15 मार्च 19 मध्ये 332 कोटी रुपये किमतीचे 83 किलो हेरॉईनसह 10 जण पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. आचारसंहिता सुरु असताना 25 दिवसांत पोलिसांनी तब्बल 708 कोटींचे अमली पदार्थ जप्त केले आहे. खालापुरातही लाखो रुपयांची दारू पोलिसांनी जप्त केली आहे.

मागील तीन वर्षात नशामुक्ती मोहिमेअंतर्गत 25 जणांवर कारवाई करण्यात आली आहे.  खोपोली साजगाव येथील एन.पी. धाब्यासमोर खालापूर उपविभागीय पोलीस अधिकारी रणजीत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या कारवाईत कैलास मोहन मोहिते (40, रा. टाकरखेड बुलढाणा) याला ताब्यात घेत त्याच्याकडून 15 किलो 620 ग्राम गांजा व रोख रक्कम असा एक लाख 56 हजाराचा ऐवज जप्त करण्यात आला. राज्य गुन्हे अन्वेषण खात्याच्या आकडेवारी नुसार दोन हजार गुन्हे दाखल आहेत पैकी मुंबई व पुण्यात सर्वात जास्त गुन्हे दाखल आहेत.

नागपूर, ठाणे शहर, सांगली अशा शहरात 90 टक्के गुन्हे दाखल झाले आहेत. अमली पदार्थांच्या व्यसनातून मागील तीन वर्षात चार हजार 855 जणांनी आत्महत्या केल्या आहेत. नशेची चटक लागल्याने विकत घेणे परवडत नसल्याने नैराश्येतून आत्महत्या करणार्‍यांची संख्या मोठी आहे. देशात वर्षाला चार हजाराच्या आसपास अमली पदार्थांच्या व्यसनातून आत्महत्या होत आहेत. त्यामध्ये महाराष्ट्राचा क्रमांक वरचा आहे. व्यसनातून होणार्‍या आत्महत्या हा चिंतेचा विषय बनून राहिला आहे. शाळा-महाविद्यालये अमलीपदार्थांच्या विळख्यात येत असून अफू चरस, गांज्या यांसारख्या पारंपरिक अमली पदार्थांपासून मेफ्रेडोन, कोकेन, चरस, तसेच शरीरात टोचून घेणारे, तसेच नशा  येणारी काही औषधेही वापरली जातात.  अमली पदार्थांच्या नशेत नेत्यांपासून अभिनेत्यांपर्यंत उद्योगपती ते सडकछाप गर्दुले यात गुरफटले असल्याचे भयाण सत्य समोर येत आहे. महाराष्ट्रातील एका दिवगंत ज्येष्ठ नेत्याच्या मुलाच्या करामती महाराष्ट्राने पहिल्या आहेत. टीव्ही मालिकात काही काळ हा नेता पुत्र चमकला होता. खालापुरानेही अमलीपदार्थ सेवन व त्याचा धांगडधिंगा काही वर्षांपूर्वी अनुभवला आहे. तत्कालीन माउंटव्हू हॉटेल विणेगाव खालापूर, सध्या या हॉटेलचे नाव बदलले आहे. या हॉटेलमध्ये रंगलेली अमलीपदार्थ सेवन  रेव्ह पार्टीवर मुंबई पोलीस आयुक्तांनी धाड टाकून उच्च वसाहतीमधील तसेच नेते, अभिनेते यांच्या मुलांना झिंगलेल्या अवस्थेत ताब्यात घेतले होते.

काही लाडले बापाच्या पुण्याईने पोलिसांनी गपचूप पसार केले तर काही पोलीस कारवाईत अटकले. मात्र सर्वात मोठा मासा होता तो  मुंबई अमलीपदार्थ विरोधी पथकातील पोलीस निरीक्षक अनिल जाधव. या जाधवने छापा मारून ताब्यात ठेवलेला करोडो रुपयांचा अमलीपदार्थ हॉटेल माउंटव्हूमध्ये आणला होता, अशी चर्चा आहे. जे आवडेल ते सेवन करण्याची मुभा ठेवण्यात आली होती. परंतु जाधव याचा काटा काढण्याच्या उद्देशाने याच खात्यातील त्याचा वैरी खबर्‍या झाल्याची अंदर की बात आहे. माउंटव्हूवर मुंबई व नवी मुंबई पोलिसांनी छापा मारीत अनिल जाधव सह 40 बड्या धेंड्यांच्या पुत्रांवर कारवाई केली होती. हिंदुस्तानात तरुणांची संख्या जास्त आहे. या तरुणांना चंगळवादाच्या

गर्तेत लोटून भारताला खिळखिळीत करण्याचा डाव शत्रूराष्ट्र करीत आहेत. या काळ्या धंद्यात नायजेरियन नागरिकांचा मोठ्या प्रमाणात समावेश आहे. भारतातील आजची पिढी हुशार, समृद्ध असल्याचे समजले जाते. हीच पिढी अमली पदार्थांच्या स्वाधीन करण्याचे मनसुबे शत्रूराष्ट्राचे आहेत. यापासून दूर राहण्याचे काम देशातील नागरिकाने करणे आवश्यक आहे. देशाच्या पंतप्रधानांनीही अमली पदार्थांच्या तस्करीबाबत चिंता व्यक्त केली आहे.

-अरूण नलावडे, फिरस्ती

Check Also

जाहीर धुव्वा

विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन शुक्रवारी संपले. या संपूर्ण अधिवेशनाच्या काळात विरोधी पक्षाचे नेते पूर्णत: निष्प्रभ झालेले …

Leave a Reply