Breaking News

पनवेलमध्ये रंगणार टी-20 पनवेल प्रीमिअर लीग

पनवेल : प्रतिनिधी

रायगड जिल्ह्यातील लेदर क्रिकेट खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी पनवेल क्रिकेट स्पोर्ट्स अकॅडमीच्या माध्यमातून पनवेलमध्ये दिनांक 12 ते 19 मे पर्यंत ‘अंडर 23 टी-20 पनवेल प्रीमिअर लीग’ स्पर्धेचे आयोजन करण्यात आल्याची माहिती पनवेल क्रिकेट स्पोर्ट्स अकॅडमीचे अध्यक्ष रवींद्र नाईक यांनी आज (दि. 04) खांदा कॉलनी येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत दिली.

या परिषदेस मुख्य प्रशिक्षक सागर कांबळे, पालक प्रतिनिधी रतन खारोल, व्हेल अण्णा दुरे आदी उपस्थित होते. नाईक यांनी पुढे बोलताना सांगितले की, आज संपूर्ण रायगडमध्ये क्रिकेट खेळाला अधिक पसंती मिळत आहे. त्या अनुषंगाने टेनिस क्रिकेट अधिक जोमाने होत आहे, त्यामधून अनेक खेळाडू प्रतिभावंत म्हणून पुढे येत आहेत, करिअरच्या दृष्टिकोनातून या खेळाडूंनी लेदर क्रिकेटकडे वळले पाहिजे. त्यासाठी आमचे प्रयत्न सुरू असून या स्पर्धेतून दर्जेदार खेळाडू तयार होऊन जिल्हा व राज्य स्तरावर चमकतील, असा विश्वास नाईक यांनी व्यक्त केला. त्यांनी पुढे बोलताना सांगितले की, महात्मा फुले महाविद्यालय पनवेल अर्थात एएससी महाविद्यालयाच्या मैदानावर होणार्‍या लीगमध्ये ‘चिताज सुपर किंग्स’, ‘शिवम प्रजापती वॉरियर्स’, ‘लावाज रॉयल’, ‘विराज सुपर किंग्स’, ‘श्यामशेठ सुपर किंग्स’ आणि ‘हाय रिच सुपर स्टाईकर्स’ या सहा संघांचा समावेश असून सहा संघ मालकांकडून खेळाडूंची बोली होणार आहे. या लीगमधून जमा होणारा निधी खेळाडूंच्या विकासासाठी उपयोगात आणला जाणार असल्याची माहिती देतानाच या स्पर्धेचा खेळाडू व क्रीडारसिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहनही त्यांनी या वेळी केले. या लीगसाठी श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ, लावाज आणि टीव्हीएस प्रियंका यांचे सहकार्य लाभणार असल्याचेही त्यांनी या वेळी नमूद केले.

पनवेल क्रिकेट स्पोर्ट्स अकॅडमीच्या माध्यमातून ग्रामीण व शहरी भागातील खेळाडूंना तांत्रिक पद्धतीने प्रशिक्षण देण्याचे काम आम्ही करीत आहोत. या भागात अनेक होतकरू खेळाडू आहेत, त्यांना योग्य ते मार्गदर्शन करण्याचे काम आम्ही करीत राहू, त्यासाठी खेळाडूंनी स्वयंस्फूर्तीने पुढे यावे, असे आवाहन प्रशिक्षक सागर कांबळे यांनी या वेळी पत्रकार परिषदेतून खेळाडूंना केले.

Check Also

कामोठ्यात शनिवारी ’मा. श्री. परेश ठाकूर केसरी’ भव्य कुस्त्यांचे जंगी सामने

पैलवान देवा थापा आणि नवीन चौहान यांची बिग शो मॅच होणार पनवेल ः रामप्रहर वृत्त …

Leave a Reply