पंतप्रधान मोदी यांचे गौरवोद्गार, लता दीनानाथ मंगेशकर पुरस्काराचे वितरण
मुंबई ः प्रतिनिधी
संगीत एक साधना आणि भावना आहे. संगीतामध्ये अव्यक्तला व्यक्त करण्याची ऊर्जा आहे. आपण सगळेच भाग्यवान आहोत की, संगीताच्या या शक्तीला आपण लतादिदींच्या रूपाने अनुभवू शकलो. लतादिदी म्हणजे साक्षात सरस्वती मातेचे प्रतिरूप होत्या, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गानसम्राज्ञी स्व. लता मंगेशकर यांच्याविषयी गौरवोद्गार काढले. यावर्षीपासून सुरू झालेल्या लता दीनानाथ मंगेशकर पुरस्काराचे पहिले मानकरी पंतप्रधान नरेंद्र मोदी ठरले आहेत. मुंबईतील षण्ङमुखानंद सभागृहात हा पुरस्कार वितरण समारंभ रविवारी (दि. 24) पार पडला. या वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. या कार्यक्रमात लतादिदींविषयी बोलताना पंतप्रधान मोदी भावूक झाले. या कार्यक्रमास राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, उषा मंगेशकर, आशा भोसले, आदिनाथ मंगेशकर, उद्योगमंत्री सुभाष देसाई, भाजप नेते विनोद तावडे आदींसह विविध क्षेत्रांतील मान्यवरांची उपस्थिती होती. पुढे पंतप्रधान म्हणाले की, मंगेशकर कुटुंबाच्या आशीर्वादाने मी माझ्यातील उणीवा भरुन काढण्याचा प्रयत्न करेन. मंगेशकर कुटुंबाने मला दिलेल्या या पहिल्या पुरस्कारासाठी मी त्यांचा आभारी आहे. लतादिदींच्या सुरांनी लोकांना समृद्ध केले. त्यांच्या आवाजाने 80 वर्षे संगीत क्षेत्रावर आपली छाप सोडली. संगीत क्षेत्रात ग्रामोफोनपासून कॅसेट, सीडी, डीव्हीडीनंतर पेनड्राईव्ह हा काळ त्यांनी पाहिला. संगीत साधना आणि ईश्वराची साधना त्यांच्यासाठी एकच होती. 40 वर्षांपूर्वी सुधीर फडकेंनी माझी आणि लतादिदींची भेट घडवून दिली होती. लतादीदी या माझ्या मोठ्या बहिण होत्या. मला देण्यात येणारा पुरस्कार जर मोठ्या बहिणीच्या नावाने देण्यात येणार असल्याने या पुरस्काराला नकार देणे माझ्यासाठी शक्यच नव्हते. मला देण्यात आलेल्या सन्मानपत्रातील उणिवा शोधून त्या सुधारण्याचा मी प्रयत्न करणार आहे. हा पुरस्कार मी सर्व देशवासियांना समर्पित करतो, असे शेवटी ते म्हणाले. यानंतर इतर मान्यवरांना पुरस्कार प्रदान करण्यात आले, तसेच आशा भोसले, उषा भोसले यांनीही लतादिदींच्या आठवणींना उजाळा दिला.
इतर मान्यवरांनाही पुरस्कार प्रदान
या कार्यक्रमात उत्कृष्ट संगीत कारकिर्दीसाठी गायक राहुल देशपांडे यांना तर सिनेमातल्या कारकिर्दीसाठी अभिनेत्री आशा पारेख आणि अभिनेते जॅकी श्रॉफ यांना विशेष पुरस्कार प्रदान करण्यात आला. सामाजिक कार्यासाठी आनंदमयी पुरस्कार नूतन मुंबई टिफीन चॅरिटेबल ट्रस्ट म्हणजे मुंबईच्या डबेवाल्यांना देण्यात आला असून संध्याछाया या नाटकासाठी दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी आणि निर्माते श्रीपाद पद्माकर यांनाही पुरस्कार देण्यात आला.
पंतप्रधानांच्या हस्ते विविध प्रकल्पांचे लोकार्पण
श्रीनगर ः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते जम्मू काश्मिरमधील सुमारे 20 हजार कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण रविवारी (दि. 24) करण्यात आले. या वेळी त्यांनी दोन केंद्रशासित प्रदेशांना जोडणार्या बनिहाल-काझीगुंड रोड बोगद्याच्या उद्घाटन तसेच किश्तवाड जिल्ह्यातील 850 मेगावॅट रॅटले जलविद्युत प्रकल्पाची पायाभरणी केली, तर 500 किलोवॅट सौरऊर्जा प्रकल्पाचे उद्घाटनदेखील त्यांनी केले. यामुळे कार्बन न्यूट्रल बनणारी देशातील पहिली पंचायत बनली आहे. या सोहळ्यात मोदी म्हणाले, 370 कलम काढून जम्मू-काश्मीरमध्ये लोकशाही मजबूत करण्यात आली. केंद्र सरकारच्या योजना आता येथे राबवल्या जात आहेत. जम्मू-काश्मीरमध्ये नवा विकास केला जाईल.