Breaking News

उरण पिरवाड समुद्रकिनारा सुना सुना

उरण : वार्ताहर

कोरोनाच्या संकटामुळे राज्यात लॉकडाऊन तसेच काही ठिकाणी कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. या काळात समुद्रकिनार्‍यांवर फिरण्यास मनाई असल्याने पर्यटकांविना उरण पिरवाड समुद्रकिनाराही ओस पडला आहे. येथे सर्वत्र शुकशुकाट पाहायला मिळत आहे.

समुद्रकिनार्‍यावर असलेल्या खाद्यपदार्थांच्या टपर्‍या, दुकाने, हातगाडीवाले, कणीसवाले, चायनीज, मांसाहार, भाकरी, शहाळे आदी दुकाने बंद असल्याने स्थानिकांच्या उत्पन्नाचे साधन बंद झाले आहे. त्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. समुद्रकिनार्‍यावर 15 दुकाने आहेत. उरण बस डेपो मोरा ते पिरवाड समुद्रकिनारी जाणार्‍या रिक्षावाल्यांचा धंदा बंद झाला आहे.

कोरोनाच्या दुसर्‍या लाटेत रुग्णसंख्या झपाट्याने वाढू लागल्याने राज्यात कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. त्याचा फटका उरण तालुक्यातील पर्यटन व्यावसायिकांना बसला आहे. मागील वर्षी तब्बल नऊ महिने हॉटेल, लॉज इत्यादी व्यवसाय पूर्णपणे बंद होते. आता मार्च महिन्यापासूनच पर्यटन व्यवसाय पूर्णपणे बंद झाला आहे. त्यामुळे पर्यटन व्यावसायिकांचे कंबरडे मोडले आहे. पर्यटक या ठिकाणी येत नसल्यामुळे व्यवसाय नुकसानीत असल्याचे पाहायला मिळत आहे. पर्यटन व्यवसाय ठप्प झाल्यामुळे त्यावर अवलंबून असणारे कामगारदेखील बेरोजगार झाले आहेत.

उरण पिरवाड समुद्रकिनार्‍यावर पर्यटक जानेवारी ते मेपर्यंत येत असतात. शाळेच्या सुटीमध्ये मार्च ते मेपर्यंत खूपच गर्दी असायची. रविवार व सुटीच्या दिवशी मोठ्या संख्येने पर्यटक येत असत. त्यामुळे आम्हा स्थानिकांना चांगले उत्पन्न मिळत असे, मात्र कोरोनामुळे सर्व बंद असल्याने समुद्रकिनार्‍यांवर पर्यटक येत नसल्याने आमचे उत्पन्न बंद होऊन आमच्यावर उपासमारीची वेळ आली आहे.

-हरेश्वर म्हात्रे, खाद्यविक्रेता, पिरवाड-नागाव, उरण

Check Also

पिक्चर सुपर हिट; पुष्पा 2चे यश काही वेगळेच

सामाजिक, सांस्कृतिक वातावरण असे आहे की तुम्ही पुष्पा2च्या जाळ्यात सापडला आहात अथवा वावरताहात…लोकप्रियतेची जणू अक्राळविक्राळ …

Leave a Reply