आमदार रमेश पाटील यांच्या पाठपुराव्याला यश
मुरूड ः प्रतिनिधी
आरसीएफ कंपनीच्या आजूबाजूच्या परिसरात राहणार्या कोळी बांधवांना मूलभूत सुविधा देण्याबाबत आश्वासन दिल्याने कोळी बांधवांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. भाजप आमदार रमेश पाटील यांनी याबाबत काही दिवसांपूर्वीच केंद्रीय रसायन व खतमंत्री भगवंत खुबा यांची दिल्ली येथे भेट घेऊन मच्छिमारांना न्याय देण्याची मागणी केली होती. केंद्रीय मंत्री यांनी तत्काळ याबाबत लक्ष घालण्याचे आदेश देताच बुधवारी (दि. 13) आरसीएफ कंपनी प्रशासन व आमदार पाटील यांच्या निवास्थानी एक विशेष बैठक झाली. बैठकीत कोळी बांधवांचे सर्व प्रश्न तातडीने सोडवण्याचे मान्य करण्यात आल्याने येथील स्थानिक कोळी बांधवांकडून भाजप आमदार पाटील यांचे ऋण व्यक्त करण्यात येत आहेत. अलिबाग तालुक्यातील थळ व नवगाव परिसरात आरसीएफ हा खत कारखाना आहे. या कारखान्यामुळे बाधित मच्छीमार बांधवांना मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासंदर्भात नुकतीच कोळी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष व भाजपचे आमदार रमेश पाटील यांच्या निवासस्थानी आरसीएफचे महाप्रबंधक श्रीनिवास कुलकर्णी, उपमहाप्रबंधक संजीव हरळीकर, वरिष्ठ प्रबंधक धनंजय खामकर यांच्यासोबत बैठक पार पडली. या वेळी महाराष्ट्र राज्य भाजपा मच्छीमार सेलचे अध्यक्ष अॅड. चेतन पाटील व प्रकल्प बाधित मच्छीमार बांधव यावेळी उपस्थित होते. या बैठकीमध्ये मच्छीमार बांधवांना वीज, पाणी, रस्ते या सुविधा येत्या दोन महिन्यांत उपलब्ध करून दिल्या जातील. तसेच आऊट फॉल चॅनेल केंद्र सरकार, राज्य सरकार व आरसीएफ एकत्रित निधी उपलब्ध करून लवकरच बांधण्यात येईल, आजपर्यंत ज्या मच्छीमारांचे मरीन आऊट फॉल पाईपलाईनमध्ये नुकसान झाले आहे त्यांना नुकसान भरपाई देण्यात येईल, असे आश्वासनही व्यवस्थापनाकडून देण्यात आले आहे.
मच्छीमारांनी मानले आभार
गेली अनेक वर्ष प्रलंबित असलेले सर्व प्रश्न भाजप आमदार रमेश पाटील यांनी केंद्रीय मंत्र्यांची भेट घेतल्याने सुटल्यामुळे येथील मच्छीमारांनी त्यांचे आभार मानले आहेत.