पनवेल ः वार्ताहर
नागोठणे येथील सुमित राय या सात वर्षीय मुलाच्या डाव्या हाताच्या खाली असणारी गाठ काढण्यात डॉक्टरांना यश आले आहे. स्थानिक प्रशासन व एमजीएम रुग्णालयातील डॉक्टरांच्या प्रयत्नांमुळे सुमितीच्या शस्त्रक्रियेसाठी मदत मिळाली. लहानपणापासून सुमित रायच्या डाव्या हाताच्या खाली गाठ होती. वयानुरूप ती गाठ वाढत गेली आणि त्यामुळे त्याचा त्रासही वाढत गेला. घरची हलाखीची परिस्थिती त्यात मुलाला होणारा त्रास या सर्व गोष्टींमुळे पालक हताश होते. या मुलाच्या पालकांना नागोठणे येथील अमरचंद जेठमल जैन शाळेच्या मुख्याध्यापिका राजेश्री शेवाळे यांनी सुमितला वेळेत उपचार देण्याबाबत सूचित केले. रोहा पं. स. गटशिक्षण अधिकारी सादुराम बांगारे यांच्या मार्गदर्शनाखाली समग्र शिक्षा अभियान, समावेशित शिक्षण विभागातील टीम, सर्व साधनव्यक्ती, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था पनवेलच्या प्राचार्या तसेच समता विभाग प्रमुख तुपे, समावेशित जिल्हा समनव्ययक विशे यांनी सुमितच्या उपचारासाठी प्रयत्न केले. अखेर सर्वांच्या मदतीने एमजीएम हॉस्पिटलमधील सर्जन डॉ. भुसारे यांच्या प्रयत्नाने सुमितवर 4 एप्रिल रोजी पहिली तर दुसरी शस्त्रक्रिया 12 एप्रिल रोजी यशस्वीरित्या पार पडली. सुमित परप्रांतीय असून अपूर्ण कागदपत्रांमुळे महिनाभरापासून हॉस्पिटलमध्ये अॅडमिट ठेवले होते. सर्व अडचणी लक्षात घेऊन शिक्षक भानुदास आमले यांच्या विशेष प्रयत्नाने कागदपत्रांची अडचणही दूर झाली. या सर्व गोष्टी पार पाडत असताना अलिबाग जिल्हा रुग्णालयातील पंकज मोरे यांचे वेळोवेळी मोलाचे मार्गदर्शन लाभले.