पनवेल ः प्रतिनिधी
प्रत्येक मूल जन्मत:च हुशार असते आणि प्रत्येक मुलामधील असाधारण क्षमतेचा शोध घेणे ही पालक व शिक्षकांची जबाबदारी असल्याचे प्रतिपादन अभिनेत्री भाग्यश्री पटेल यांनी खारघर येथील विश्वज्योत हायस्कूलमध्ये आयोजित केलेल्या अद्वितीय टॅलेन्ट मॅनिया कार्यक्रमामध्ये केले. त्या म्हणाल्या, अध्ययन म्हणजे वर्गामध्ये शिकवल्या जाणार्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करण्यासोबत प्रश्नांची उत्तरे आणि समस्यांसाठी सोल्युशन्स शोधण्याचा सक्रियपणे प्रयत्न करणे, प्रत्येक मुलाची अद्वितीय क्षमता ओळखून निपूण करणे महत्त्वाचे आहे, कारण प्रत्येक मुलामध्ये बदलाचे स्रोत आणि भावी लीडर्स बनण्याची क्षमता आहे. आज मी या मुलांना भेटण्याचा, त्यांच्यासोबत संवाद साधण्याचा आणि प्रत्येक अद्वितीय टॅलेन्टला जाणून घेत उत्तम वेळ व्यतित केला. ही मुले अत्यंत जिज्ञासू असल्याने प्रश्न विचारतात. आपण त्यांना प्रोत्साहित केले पाहिजे आणि असे वातावरण दिले पाहिजे, जे त्यांना त्यांची सर्जनशीलता व विचारसरणी सर्वोत्तम पद्धतीने विकसित करण्यामध्ये मदत करते. भाग्यश्री यांनी पालकांना त्यांच्या मुलांचे आधीच परीक्षण किंवा इतर मुलांसोबत तुलना न करण्याचे, तसेच मुलांवर विश्वास दाखवत प्रत्येक मुलामध्ये असलेल्या प्रतिभेला जोपासण्याचे आवाहन केले. मुलांसोबत खेळ खेळताना त्या परत भूतकाळात गेल्या. जीवनामध्ये अशा क्षणांची भर घालण्यासाठी विश्वज्योतसारख्या शाळेमध्ये जायला आवडेल, असे त्या शेवटी म्हणाल्या.
या कार्यक्रमाला उपस्थित पालकांना भाग्यश्री या टॅलेन्ट हंटच्या विजेत्यांची घोषणा करतील असे अपेक्षित होते, पण त्याऐवजी त्यांनी टॅलेन्टकडे पाहण्याच्या नवीन पैलूंबाबत सल्ला दिला.