एका बाजूला उकाड्याच्या आगडोंबामुळे सर्वसामान्यांचे जगणे मुश्किल झाले असताना रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यातील खारेपाट विभागात भीषण पाणीटंचाईने डोके वर काढले आहे. खारेपाट विभागातील अनेक गावे, वाड्या वस्त्या तहानलेल्या असून पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष निर्माण झाले आहे. जनतेला पाणी विकत घेण्याची नामुश्कि ओढवलीय तसेच घोटभर पाण्यासाठी महिलांची रखरखत्या उन्हात भटकंती सुरू असून दूषित गढूळ आणि दुर्गंधीयुक्त पाण्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. खारेपाट विभागात भीषण पाणी टंचाई ने डोके वर काढले आहे. घोटभर पाण्यासाठी येथील महिलांची रखरखत्या उन्हात, रात्री व पहाटे वणवण भटकंती सुरू आहे. पाण्यासाठी महिला प्रचंड हाल सोसत आहेत. येथील पाणी प्रश्न गंभीर होत आहे, मात्र राज्य शासन तसेच प्रशासन गांभिर्याने पाहत नाहीत. जनता जगो अथवा मरो त्यांना काही देणेघेणे नाही अशी परिस्थिती आहे. मार्च, एप्रिल व मे महिन्यात खारेपाट विभागाला पाणीटंचाईच्या भीषण झळा सोसाव्या लागतात. महिलांच्या डोक्यावरील हंडा उतरवू ही पोकळ व तकलादू आश्वासने हवेत विरून जातात, मात्र पाणी प्रश्न काही सुटत नाही. आमची कीव शासन-प्रशासनाला येत नाही, जे पाणी गुरे-ढोरेही पिणार नाहीत इतके दूषित, गढूळ व दुर्गंधीयुक्त पाणी, खारे पाणी आमच्या वाट्याला आलेय. हे पाणी पिऊन मरायचे काय, अशी व्यथा मांडत येथील महिला व ग्रामस्थ संताप व्यक्त करीत आहेत. उकाड्याने हैराण केले आहे. उष्णतेचा पारा दिवसेंदिवस वर सरकत आहे. सूर्यदेव जणू आग ओकत असून अंगाची लाही लाही होत आहे. त्यातच पाणीटंचाई. मग काय करावे? कसे जगावे? असे प्रश्न सतावत आहेत. उष्म्याने जीव जायची वेळ आलीय. रोज किमान पाच ते सात लीटर पाणी पिणे गरजेचे आहे, मात्र रोज विकतचे पाणी परवडत नसल्याने पाणी कमी प्रमाणात पित असल्याचे महिलांनी अत्यंत वेदनादायी वास्तव मांडले. येथील शहापाडा धरणाच्या खर्चासाठी आवश्यक निधी मिळत नसल्याने वाशी विभाग, वडखळ विभागातील जनतेला पिण्याच्या पाण्याची झळ सोसावी लागत आहे. मार्च महिन्यापासून सर्वत्रच पिण्याच्या पाण्याची बोंबाबोंब सुरू होते. कोकणात भरपूर पाऊस पडतो, पण पाणी साठवण व्यवस्था चांगली नसल्याने पावसाचे पाणी नदी, नाल्यावाटे समुद्राला मिळते. कोकण विभाग अतिवृष्टीचा असला तरी पाण्याची झळ सोसावी लागते. पेण तालुक्यात मोठी धरणे आहेत, परंतु या तालुक्यातील जनता पाण्यावाचून नेहमीच तडफडत असते. जलसंपदा, पाटबंधारे विभाग, ग्रामीण पाणीपुरवठा यांचा समन्वय आणि नियोजन नसल्याने ही परिस्थिती आहे.शहापाडा धरण पाणी योजनेस हेटवणे धरणातून पाण्याचा साठा उपलब्ध करून दिल्यास या धरणातून वडखळ व वाशी विभाग, कधीच पिण्याच्या पाण्यापासून वंचित राहाणार नाही, पण या धरणाच्या दुरुस्तीसाठी किंवा पाणीपुरवठा वाढविण्यासाठी आवश्यक निधी यंत्रणेला उपलब्ध होत नाही. त्यामुळे सुधारणा करण्यासाठी अनेक अडथळे आहेत. सध्या वाशी खारेपाटातील जनतेचे पाण्यासाठी प्रचंड हाल होत आहेत. पाणी भरण्यासाठी ग्रामस्थांना रात्री 12 ते 2 वाजेपर्यंत जागावे लागते. पाण्याचा दाब कमी असल्याने छोटे पंप लावावे लागतात तसेच अनेक ठिकाणी पाइप गळती असल्याने शेतातील खारे पाणी शिरून पिण्याचे पाणी दूषितदेखील होते. अशामुळे ग्रामस्थांच्या आरोग्यास धोका निर्माण होत आहे. नोकरीनिमित्त बाहेर असलेले लोक गावी जाताना मिनरल पाण्याच्या बाटल्या घेऊन जातात. मिळणारे पाणी कमी असल्यामुळे जनावरांचेसुद्धा हाल होत आहेत. अशी गंभीर परिस्थिती या विभागातील जनतेची आहे. आमची मुले उच्चशिक्षित आहेत, चांगल्या कामावर आहेत, मात्र पाण्याच्या समस्याने कोणताही बाप आपली मुलगी या पाण्याच्या दुष्काळी भागात द्यायला तयार होत नाही.त्यामुळे खूप मोठ्या अडचणी निर्माण झाल्या आहेत, असे येथील वृद्ध महिलांनी सांगितले. येथील काही गावांत तलाव व विहिरी असूनदेखील या गावांना पाणीटंचाईचा शाप आहे, विहिरी आटल्या आहेत, तर तलावात प्रचंड घाणीचे साम्राज्य, दुर्गंधी आहे. या ठिकाणी योग्य नियोजनाचा अभावही पहावयास मिळतोय. पाणी मिळविण्यासाठी शाळकरी मुली यांचीदेखील धावपळ होते. परिणामी त्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. पाणी प्रश्नावर अनेकदा मोर्चे, ठिय्या आंदोलन, उपोषण केले, मात्र बिसलेरीचे पाणी पिणार्या त्या अधिकार्यांना आमचे दुःख काय कळणार, असा सवाल महिलांनी उपस्थित केलाय. आमचा पाण्याचा प्रश्न लवकरात लवकर निकाली काढला नाही तसेच आम्हाला मुबलक व शुद्ध पाणी मिळाले नाही, तर निवडणुकीत बहिष्कार घालू आणि शासन-प्रशासनाचे लक्ष वेधू, असा इशारा खारेपाट विभागातील संतप्त महिलांनी दिलाय. आमच्या भावनांचा अंत पाहू नका, जलद पाणी प्रश्न सोडवा; अन्यथा यापुढे आम्ही सर्व महिला हंडे घेऊन शासकीय कार्यालयाला घेराव घालून काम बंद करू, असाही संतप्त झालेल्या महिलांनी इशारा दिला. महिलांच्या या पाणी प्रश्नावर सामाजिक कार्यकर्त्यां मोहिनी गोरे सातत्याने आंदोलनात्मक भूमिका घेत आहेत. जोपर्यंत आपण मान्सूनच्या काळात जल संचय करीत नाही तोपर्यंत आपल्याला जल संकटाशी सामना करावाच लागेल. तथापि, जर पावसाचे पाणी संरक्षित करण्याची चोख व्यवस्था करण्यात आली तरच पाणी टंचाईपासून मुक्ती मिळेल. ज्या विभागांत पाऊस फार कमी पडतो तेथे तर पाताळातील पाणीच एकमेव स्रोत आहे, तेथे कसे पाणी टंचाईपासून बाहेर पडता येईल याकडे लक्ष देण्याची गरज आहे. केंद्र सरकारने जलशक्ती मंत्रालय स्थापन करून गांभीर्याने पाणीप्रश्नाकडे पहायला सुरुवात केली आहे, पण या परिघात त्यांनी तलाव आणि विहिरींचा पुनरुद्धाराची बाब हाताळायला हवी, तसेच पाण्याला राष्ट्रीय संपदा म्हणून घोषित करून जलसंकटावर तोडगा काढला पाहिजे. मुख्य म्हणजे राज्य सरकारने प्रत्येक वेळी केंद्राकडे बोट न दाखवता स्वत:हून काही तरी केले पाहिजे. तरच भविष्यात राज्यातील नागरिकांचे जीवन सुरक्षित राहील, असे मत जल अभ्यासक व्यक्त करीत आहेत.
-धम्’शील सावंत