अ.भा.मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष भारत सासणे यांचे उद्गार
कर्जत : बातमीदार
समाजातील सर्वांच्या काळजाला भिडणार्या कविता देणारे कविवर्य नारायण सुर्वे यांच्या नावाने दिला गेलेला पुरस्कार हा अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाएवढेच आपल्यासाठी महत्त्वाच्या दर्जाचे असल्याचे उदगीर येथील 95व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष प्रा.भारत सासणे यांनी सांगितले. पद्मश्री नारायण सुर्वे अकादमीच्या वतीने दिला जाणारा जीवनगौरव पुरस्कार भारत सासणे यांना ज्येष्ठ साहित्यिक डॉ. श्रीपाल सबनीस यांचे हस्ते देण्यात आला. या वेळी ते बोलत होते.
आंतरराष्ट्रीय कामगार दिन आणि महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने पद्मश्री नारायण सुर्वे साहित्य-कला अकादमी आणि मातोश्री सुमती चिंतामणी टिपणीस महाविद्यालय यांच्या माध्यमातून नेरळ येथील विद्यामंदिर मंडळाच्या प्रांगणात काव्य जागर संमेलनाचे आयोजन केले होते. या संमेलनाची सुरुवात वृक्षाला पाणी घालून करण्यात आली. त्यावेळी डॉ.श्रीपाल सबनीस, 95व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष प्रा. सासणे, पद्मश्री नारायण सुर्वे साहित्य अकादमी सुदाम भोरे, विद्यामंदिर मंडळाचे कोषाध्यक्ष विवेक पोतदार, कार्यकारी सदस्य डॉ. मिलिंद पोतदार, सुमती चिंतामणी टिपणीस महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.नंदकुमार इंगळे, मुख्याध्यापक पी. बी. विचवे, बाल वाङमय लेखिका प्रा.लीला शिंदे, लेखिका नेहा सावंत, अकादमीच्या विश्वस्त कल्पना घारे, कार्याध्यक्ष पुरूषोत्तम सदाफुले, सुरेश कंक आदी व्यासपीठावर उपस्थित होते. कवी कामगार भूषण राजेंद्र वाघ ’डोंगरी शेत’ या काव्याने कार्यक्रमाची सुरुवात झाली. काव्य जागर आणि पुरस्कार वितरण सोहळ्याचे प्रास्ताविक पद्मश्री नारायण सुर्वे साहित्य अकादमीचे अध्यक्ष सुदाम भोरे यांनी केले. तर स्थानिक पातळीवर प्रा.संतोष तुकमाने यांनी आपल्या सहकारी प्राध्यापक यांच्यासह नियोजनात सहभाग घेतला.
प्रा. सासणे पुढे म्हणाले, कविवर्य नारायण सुर्वे यांच्या नावाने मिळणारा सन्मान हा सर्वोच्च सन्मान असतो. नारायण सुर्वे यांच्या कवितेतून मिळणारा सामान्य माणूस आताच्या लेखकांच्या लेखानातून हरवत चाललेला आहे, असे त्यांनी या वेळी स्पष्ट केले. तर अध्यक्ष स्थानावरून बोलताना अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष आणि ज्येष्ठ साहित्यिक डॉ. श्रीपाल सबनीस यांनी लहानशा गावात नारायण सुर्वे यांच्या सारख्या ज्येष्ठ साहित्यिक यांचे वास्तव्य राहिले, त्या गावाला आता साहित्य चळवळीचा वारसा मिळाला आहे, त्याची जपणूक नेरळकरांनी करायला हवी अशी सूचना केली. यावेळी पद्मश्री नारायण सुर्वे ‘जीवनगौरव पुरस्कार’ हा प्रा. सासणे यांना देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले.त्यानंतर पद्मश्री नारायण सुर्वे स्नेहबंध पुरस्कार अभिनेत्री आणि लेखिका प्रा. नेहा सावंत आणि मास्तरांची सावली हा पुरस्कार औरंगाबाद येथील वाङमय लेखिका प्रा.लीला शिंदे यांना देवून त्यांचा सन्मान करण्यात आला. धुळे येथील कमलाकर देसले यांना कुसुमाग्रज काव्यप्रतिभा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. नारायण सुर्वे साहित्य पुरस्कार पुणे येथील ललिता श्रीपाल सबनीस यांच्या मन स्पंदन, कोल्हापूर येथील चंद्रशेखर कांबळे यांच्या शेणाला गेलेल्या पोरी, पंढरपूर येथील सूर्याजी भोसले यांच्या कालाभूत आणि चिंचवड पुणे येथील सविता इंगळे-सावी यांच्या चाकोरीतल्या जगण्यातून या साहित्याचा सन्मान करण्यात आला. नारायण सुर्वे काव्य प्रतिभा पुरस्कार तळेगाव मावळ येथील इंद्रायणी महाविद्यालयाचे प्राचार्य समीक्षक, कवी, लेखक डॉ. संभाजी मलघे यांना सन्मानित करण्यात आले. नारायण सुर्वे साहित्य पुरस्कार शिरूर येथील डॉ.दत्तात्रय जगताप यांच्या पुस्तकाला तसेच कोल्हापूर येथील डॉ. राजश्री पाटील यांच्या ती अजूनही जळत आहे. या पुस्तकाला तसेच नगर येथील माधुरी मरकड यांच्या रिंगण या पुस्तकाला आणि सांगली येथील रमजान मुल्ला यांच्या अस्वस्थ काळरात्रीचे दृष्टांत यांच्या पुस्तकाला देण्यात आला.
काव्यांचा जागर
या प्रसंगी लेखक उद्धव कानडे, पुरुषोत्तम सदाफुले यांनी लिहिलेल्या आणि पुणे येथील संस्कृती प्रकाशनने प्रकाशित केलेल्या ’कविवर्य नारायण सुर्वे मास्तरांचे विद्यापीठ’ या पुस्तकाचे प्रकाशन यावेळी करण्यात आले. या कार्यक्रमात साहित्य प्रकाशक, संवेदना प्रकाशन चिंचवड येथील नितीन हिरवे आणि प्रतिभा पब्लिकेशन पुणे येथील डॉ. दीपक चांदणे यांचा गौरव करण्यात आला. या वेळी सादर झालेल्या काव्य जागरमध्ये कवी रमजान मुल्ला- सांगली, माधुरी मरकड-नगर, कोल्हापूर येथील डॉ. राजश्री पाटील, शिरूर येथील डॉ. दत्तात्रय जगताप, पंढरपूर येथील सूर्याजी भोसले, चिंचवड पुणे येथील सविता इंगळे, कोल्हापूर येथील चंद्रशेखर कांबळे यांनी कविता सादर केल्या. ख्यातनाम वाङमय लेखिका प्रा.लीला शिंदे यांनी यावेळी बोलताना, मास्तरांची सावली या पुरस्काराचे विवेचन करताना सावलीची तुलना करू शकत नाही असे स्पष्ट करीत सर्वत्र वावरणारी सावली यामध्ये त्याग आणि समर्पण देखील असते असे सांगून मास्तरांची सावली बनण्याचा प्रयत्न करू असे आश्वासन त्यांनी या वेळी दिले.