राज्यात सध्या उष्णतेचे तीव्र चटके बसू लागले आहेत. उन्हाळ्यात तापमान वाढणे स्वाभाविकच असते, पण अलिकडच्या काही वर्षांत तापमानाचा पारा सरासरीच्या कैक पटींनी वर सरकताना दिसतोय. त्यामुळे अंगाची लाही लाही होणे काय असते याचा अनुभव येत आहे. मे महिन्यात तर तापमान 50 अंशांच्या पुढे जाण्याचा अंदाज वर्तविण्यात आलाय. त्यामुळे सावधान म्हणण्याची वेळ आलीय.
हल्ली ऋतूमान बदलले आहे. त्यामुळे वातावरणात कधी काय होईल याचा नेम नाही. वर्षाच्या बारा महिने कधी ना कधी कुठे ना कुठे पाऊस पडत असतो, गारपीट होते, तर अधूनमधून वादळेही येत असतात. हे कमी म्हणून की काय आता उन्हाळाही सोसेनासा झाला आहे. सर्वसाधारणपणे फेब्रुवारी ते मे असा चार महिन्यांचा उन्हाळा असला तरी एप्रिल -मेमध्ये खर्या अर्थाने तो प्रकर्षाने जाणवतो. या काळात वातावरणात प्रचंड उष्मा असतो. राज्यातील विदर्भात तर सूर्य जणू आग ओकत असतो. याची काही प्रमाणात लोकांना सवय आहे, पण अलिकडच्या काळात उष्णतेचा पारा सरासरी ओलांडून वर सरकत असल्याने असह्य होऊ लागले आहे. अलिकडे मार्च महिन्यापासूनच उन्हाच्या झळा जाणवू लागतात आणि त्याची तीव्रता उत्तरोत्तर वाढत जाते. त्याचाच अनुभव गेल्या काही दिवसांपासून येत आहे. राज्यात उष्णतेची लाट आली असून बहुतांश ठिकाणी पारा 40 अंश सेल्सिअसच्या वर गेलाय. विदर्भातील चंद्रपूर येथे तर 46 अंशांहून अधिक तापमानाची नोंद झाली आहे. वायव्य भारतातून येणारे उष्ण आणि कोरडे वारे कायम असल्याने राज्याच्या कमाल तापमानाचा पारा अद्यापही 40 अंशांपेक्षा जास्त आहे. येत्या काळात तापमानाचा पारा पन्नाशी ओलांडेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. खरोखरच तसे झाल्यास काय होईल याची कल्पनाच न केलेली बरी. कार्बन उर्त्सजन आणि प्रदूषण वाढ ही तापमानवाढीची प्रमुख कारणे आहेत. जगभरात मोठ्या प्रमाणात कार्बन डायऑक्साईडचे उत्सर्जन होत आहे. त्यामुळे सूर्याची ऊर्जा परावर्तित होत नाही. याचा परिणाम थेट जागतिक तापमानवाढीवर होत असून सातत्याने तापमान वाढत आहे. दुसरीकडे मोठ्या प्रमाणात होणारे प्रदूषणदेखील तापमानवाढीस कारणीभूत ठरत आहे. कंपन्या, वाहने यांच्या माध्यमातून सर्वाधिक प्रदूषण होत असते आणि ते थेट हवेत पसरून आरोग्यास अपायकारक ठरत आहे. हे असेच सुरू राहिले तर पर्यावरणाचा र्हास होऊन मानवावर त्याचे विपरित परिणाम होतील. दुर्दैवाने त्याची सुरुवात झालेली आहे. तापमानवाढीमुळे हिमनद्या झपाट्याने वितळत आहेत, समुद्राच्या पातळीत वेगाने वाढ होत आहे. ही तापमानवाढ वेगाने होत असून येत्या 30 वर्षांत याचा धोका अधिक असणार आहे. परिणामी मुंबईसह जगभरातील 15 मोठी शहरे पाण्याखाली जातील, असा इशारा देण्यात आलेला आहे. त्यामुळे वेळीच सावध होणे काळाची गरज आहे. जगभरातील तज्ज्ञ मंडळींनी एकत्र येऊन यावर उपाययोजना करणे आवश्यक आहे तसेच त्या सर्व देशांनी अमलात आणायला हव्यात. तेव्हाच तापमानवाढ आणि त्यामुळे होणारे दुष्परिणाम थोपवता येऊ शकतात. आपण काहीही करू शकतो या अविर्भावात माणूस राहिल्यास निसर्ग आणखी कोणती परिस्थिती निर्माण करेल, हे सांगता येत नाही.