पनवेल ः प्रतिनिधी
नवीन पनवेलमधील शांतिनिकेतन पब्लिक स्कूलच्या प्रवेशद्वारासमोरील गटारावरील झाकण तुटल्याने मोठा खड्डा पडला होता. या खड्ड्यात पाय घसरून विद्यार्थी पडल्यास मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता असल्याचर तक्रार होताच सिडकोने त्या खड्ड्यावर तातडीने झाकणे बसवल्याने पालकांनी नि:श्वास सोडला.
नवीन पनवेल सेक्टर 2मध्ये शांतिनिकेतन पब्लिक स्कूल आहे. या शाळेच्या प्रवेशद्वारावर फुटपाथखाली तीन ते चार फूट खोल गटार आहे. या गटारावरील स्लॅब पडल्याने त्याठिकाणी मोठा खड्डा पडला होता. त्यामध्ये बाटल्या, दगड आणि लोखंडी सळ्यांचे तुकडे आहेत. त्याच्यावर शाळेने एक प्लायवूडचा तुकडा टाकून ठेवला होता. विद्यार्थी त्याच्यावरून जाताना प्लायवूड तुटल्यास किंवा त्याच्या गॅपमध्य एखाद्या मुलाचा पाय गेल्यास अपघात होण्याची शक्यता होती. याबाबत आरपीआयचे नवीन पनवेल शहराध्यक्ष अंकुश साळवे, उपाध्यक्ष संपत भोजने व पंचशील झोपडपट्टीचे अध्यक्ष पप्पू साळवे यांनी त्याचा पाठपुरावा सुरू केला होता. शाळेनेही महापालिकेला आणि सिडकोला पत्र दिले होते. सिडकोचे एईई संतोष साळी यांची भेट घेऊन त्यांना फोटो दाखवल्यावर त्यांनी ताबडतोब ठेकेदाराला काम पूर्ण करण्याचे आदेश दिले. ते काम पूर्ण झाल्याने पालकांनी त्यांना धन्यवाद दिले.
शांतिनिकेतन पब्लिक स्कूलच्या गेटवर पडलेला खड्डा धोकादायक होता. त्याबाबत आपल्या प्रतिनिधीने माझी भेट घेतल्यावर ठेकेदाराला ते काम ताबडतोब करून देण्याचे व त्या गटारातील कचराही साफ करण्यास आदेश दिले. – संतोष साळी, एईई, सिडको