कोरोना विषाणूच्या विळख्यात संपूर्ण महाराष्ट्र पुरता अडकला त्याला आता उणेपुरे सात महिने होतील. या सात महिन्यांमध्ये बर्याच उलथापालथी घडल्या. अनेक कुटुंबे देशोधडीला लागली. कित्येकांना आपल्या आप्तेष्टांना मुकावे लागले. महाराष्ट्रातील गावोगावी अशा हजारो शोकांतिका आहेत. अशा प्रतिकूल परिस्थितीत जीव हतबल होतो हे खरेच. अशा असाह्य अवस्थेत कुठल्याही सामान्य माणसाला सर्वप्रथम देव आठवतो. किंबहुना ही आस्तिकताच जनसामान्यांना जीवनसंघर्षामध्ये बळ देते, जगवत ठेवते. खाद्यालये आणि मद्यालये उत्साहाने उघडणार्या ठाकरे सरकारला देवालयांचे मात्र काय वावडे आहे हे कळण्यास काही मार्ग नाही. कारण श्रद्धाळू भक्तांनी वारंवार मागणी करूनदेखील मुख्यमंत्र्यांनी मंदिरे उघडण्यास परवानगी नाकारली आहे.
देवाचिये द्वारी बसावे पळभरी, असे संत महात्म्यांनी सांगून ठेवले असले तरी सध्या मात्र हे पळभराचे मुखदर्शनदेखील सर्वसामान्यांकरिता अशक्य होऊन बसले आहे. महाराष्ट्रातील मद्यालये पुन्हा एकदा गजबजू लागली असली तरी देवालयांची कवाडे मात्र पुन्हा पुन्हा मागणी करूनही बंदच आहेत. गेल्या काही महिन्यांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार राज्यामध्ये मिशन बिगिन अगेनला सुरुवात झाली. काही दुकाने, आस्थापना, सरकारी-निमसरकारी कचेर्या हळूहळू सुरू होऊ लागल्या. ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात खाद्यालये आणि मद्यालये पुन्हा एकदा उघडली. दारूची दुकाने तर खूप आधीच उघडली होती. वास्तविक देशभरातील देवळे जून महिन्यातच उघडण्यात आली आहेत. दक्षिणेतील तिरूपती बालाजी पद्मनाभ मंदिर, पुरी येथील जगन्नाथ मंदिर तसेच उत्तरेतील वैष्णोदेवीपासून सर्व मंदिरांची कवाडे भक्तांसाठी खुली करण्यात आली. यापैकी कुठेही भक्तांनी गर्दी केल्यामुळे कोरोना रुग्णांची संख्या वाढल्याची उदाहरणे नाहीत, परंतु देशभरातील या अनलॉककडे राज्यातील महाविकास आघाडी सरकार सोयीस्कर डोळेझाक करते. परिणामी महाराष्ट्रातील सर्वच्या सर्व देवळे आजमितीस बंद आहेत. हे निव्वळ अहंकाराचे राजकारण म्हणावे लागेल. कारण देवळे उघडावीत ही आग्रही मागणी भारतीय जनता पक्षाने लावून धरली आहे. त्याचप्रमाणे वंचित आघाडीच्या डॉ. प्रकाश आंबेडकर यांनी गेल्या महिन्यात पंढरपूर येथे उग्र आंदोलन केले होते. विरोधकांच्या आणि श्रद्धाळू भक्तांच्या रास्त मागणीला मान देऊन मुख्यमंत्र्यांनी देवळे आणि देवस्थानांचे दरवाजे वेळीच उघडले असते तर आज आंदोलने छेडण्याची वेळच आली नसती. देवस्थानांच्या आसपास लाखो कुटुंबे जगत असतात. देवस्थानांच्या पंचक्रोशीत बहुतेक सर्व व्यवहार हे तेथील भक्तांच्या देवदर्शनावर अवलंबून असतात. लॉकडाऊनमुळे आज या लाखो कुटुंबांची अक्षरश: उपासमार होत आहे. दुर्दैवाने ठाकरे सरकारला ही उपासमार पाहून पाझर फुटत नाही. म्हणूनच माननीय राज्यपालांनी आघाडी सरकारचे खरमरीत पत्र पाठवून कान उपटले. त्याला ताबडतोब राजकीय रंग देऊन मुख्यमंत्र्यांनी राजकारणाचा नवा खेळ सुरू केला. आपल्याला राज्यपालांकडून हिंदुत्वाचे प्रमाणपत्र घेण्याची आवश्यकता नाही आदी मुक्ताफळे त्यांनी राज्यपालांच्या पत्रावर उधळली आहेत. आता त्यामुळे मूळ मुद्दा राहिला बाजूलाच आणि विनाकारण कुरघोडीचे राजकारण महाराष्ट्रातील जनतेच्या नशिबी आले आहे. हा साराच प्रकार अतिशय दुर्दैवी आहे. राज्यातील महाविकास आघाडी सरकारला बंद देवळांमध्ये बंदिस्त असलेला परमेश्वर सुबुद्धी देवो, हीच त्याच्या चरणी प्रार्थना.