Breaking News

पेण अर्बन बँक ठेवीदारांना न्याय द्या; सर्वपक्षीय धरणे आंदोलन

भाजप आमदारांनी उपस्थित राहून दिला पाठिंबा

पेण : प्रतिनिधी
पेण अर्बन बँक घोटाळ्यात भरडल्या गेलेल्या ठेवीदारांच्या न्याय हक्कांसाठी राज्य शासनाचे लक्ष वेधून घेण्याकरिता संघर्ष समितीच्या माध्यमातून मंगळवारी (दि. 2) पेण नगर परिषदेसमोरील हुतात्मा कोतवाल चौकात सर्वपक्षीय धरणे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनास भाजपच्या चार आमदारांनी उपस्थित राहून जाहीर पाठिंबा दिला.
घोटाळा झाल्याने पेण अर्बन बँकेवर 23 सप्टेंबर 2010 रोजी रिझर्व्ह बँकेने निर्बंध लादले आणि रायगडसह मुंबईमध्ये 18 शाखा असणारी 75 वर्षे जुनी बँक आर्थिक दिवाळखोरीत गेली. त्याला आता 12 वर्षे उलटून गेली, मात्र राज्य शासन व अधिकार्‍यांनी उदासीनतेचे धोरण अवलंबिल्याने ठेवीदारांच्या न्याय्य हक्कांसाठी संघर्ष समितीच्या माध्यमातून पुन्हा एकदा शासनाचे लक्ष वेधून घेण्याकरिता पेण नगर परिषदेसमोरील कोतवाल चौकात मंगळवारी सर्वपक्षीय धरणे आंदोलन करण्यात आले.
या वेळी माजी मंत्री व विद्यमान आमदार रविशेठ पाटील, भाजप उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, आमदार संजय केळकर, आमदार महेश बालदी यांच्यासह माजी आमदार धैर्यशील पाटील, नगराध्यक्ष प्रीतम पाटील, उपनगराध्यक्ष वैशाली कडू,  जि. प. सदस्य प्रभाकर म्हात्रे, डी. बी. पाटील, भाजप तालुकाध्यक्ष श्रीकांत पाटील, नगरसेवक अजय क्षीरसागर, शोमेर पेणकर, हिमांशू कोठारी, माजी सभापती प्रकाश पाटील, देवात साकोस्कर, संघर्ष समितीचे कार्याध्यक्ष नरेन जाधव, पदाधिकारी, ठेवीदार, खातेदार उपस्थित होते.
या वेळी बोलताना आमदार संजय केळकर यांनी सांगितले की, गेली 12 वर्षे म्हणजेच एक तप संघर्ष समितीच्या माध्यमातून आपण लढा देत आहोत. ठेवीदारांना कशा प्रकारे मदत करता येईल यासाठी विविध बैठका, आंदोलने वेळीवेळी करण्यात झाली. विधिमंडळाच्या प्रत्येक अधिवेशनात पेण अर्बन बँकेचा मुद्दा मांडला असून हा लढा अविरत सुरूच राहील. ज्या प्रकारे कर्नाळा बँकेच्या ठेवीदारांना आमदार आमदार प्रशांत ठाकूर, महेश बालदी हे पाठपुरावा करून न्याय मिळवून देत आहेत त्याच धर्तीवर पेण अर्बन बँक लुटारूंचा हिशोब तर चुकता करायचा आहे, परंतु प्रथम लक्ष या बँकेच्या ठेवीदारांना पैसे कसे परत मिळवून देता येईल याकडे राहणार आहे. यासाठी तीव्र स्वरूपाचे आंदोलन करावेच लागणार आहे. जे बोगस ठेवीदार आहेत त्यांना अटक व्हायला हवी. जप्त केलेल्या मालमत्तेची विक्री करण्याबाबत जी कमिटी नेमली आहे त्यांचेसुद्धा या बाबतीत दुर्लक्ष होत आहे. राज्य सरकारने या गोष्टींकडे जातीने लक्ष घालून लवकरात लवकर हा प्रश्न मार्गी लावावा तसेच केंद्रातील अर्थराज्यमंत्री अनुराग ठाकूर यांची भेट घेऊन अर्बन बँक प्रश्नाचा तिढा केंद्राच्या माध्यमातून कसा सोडविता येईल यासाठीही पाठपुरावा सुरू आहे.
या वेळी आमदार रविशेठ पाटील यांनी अर्बन बँकेच्या भ्रष्टाचारातील मुख्य आरोपी शिशिर धारकर यांच्यावर हल्लाबोल केला. धारकर पेणमध्ये राजरोसपणे फिरत असून लोकांना भूलथापा देण्याचे काम करीत आहे. या भ्रष्टाचारी माणसाला अर्बन बँकेच्या पैशांसंदर्भात जाब विचारणे गरजेचे आहे. पेण नगर परिषदेचे पाणीपुरवठा योजनेचे पाच कोटी रुपये रसातळाला घालविण्याचे काम या संचालक मंडळाने केले असून अशांवर कठोर कारवाई होणे गरजेचे आहे. गोरगरीब जनतेचा तळतळाट या भ्रष्टाचार्‍याला लागल्याशिवाय राहणार नाही, असे सांगून या लढ्यात पुन्हा एकदा सर्वांनी एकत्रित, संघटित राहून ठेवीदारांच्या पाठीशी ठामपणे उभे राहू, असे आश्वासन आमदार रविशेठ पाटील यांनी दिले.
पेण अर्बन बँकेच्या संघर्षात गेली अनेक वर्षे लढा देत असलेले लोकप्रतिनिधी, ठेवीदार यांच्या लढ्याचे कौतुक करीत आमदार प्रशांत ठाकूर म्हणाले की, या ठिकाणी ठेवीदारांच्या गेली 12 वर्षे असलेली मनातील जखम अजून भरलेली नसून ती कशा प्रकारे भरून निघेल याकडे लक्ष देणे लोकप्रितिनिधी म्हणून आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. आम्ही वेळोवेळी विधासभेत अर्बन बँकेचा हा प्रश्न उपस्थित केला. पनवेलमधील कर्नाळा बँकेत कोट्यवधींचा घोटाळा झाला. त्याविरोधात आम्ही लढा देत 15 हजार खातेदारांच्या पाच लाख रुपयांपर्यंतच्या ठेवी केंद्र सरकारने केलेल्या विमा कायद्यानुसार परत मिळवून देण्याचे काम केले. पाच लाख रुपयांच्या आतील जवळजवळ 357 कोटी रुपये अद्याप मिळवायचे आहेत. अर्बन बँकेच्या लढ्यात कायदेशीर तसेच काही ठिकाणी राजकीय अडथळेसुद्धा आले. यामध्ये ईडीच्या बाबतीत काही प्रक्रिया असतील, तर केंद्र शासनाची मदत घेता येईल. यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेऊन मार्ग काढण्यात येईल. त्या अनुषंगाने कृतीशील कार्यक्रम आखावे लागतील. यापुढे कायदेशीर मार्गाने व रस्त्यावरची लढाई करावी लागणार असून यासाठी सर्व लोकप्रतिनिधींनी ठेवीदारांसाठी मोठा संघर्ष उभारून पुन्हा एकदा शासनपर्यंत ठेवीदारांच्या तीव्र भावना पोहचवाव्या लागतील.
माजी आमदार धैर्यशील पाटील यांनीही ठेवीदारांसाठी सर्वांनी एकत्र यावे, असे आवाहन केले, तर प्रास्ताविकात पेण अर्बन संघर्ष समितीचे कार्याध्यक्ष नरेन जाधव यांनी बँकेच्या लढ्यात पुन्हा एकदा लोकप्रतिनिधींनी उपस्थित राहून ठेवीदारांच्या पाठीशी ठाम असल्याचे दाखवून दिले त्याबद्दल आभार मानले. त्यांनी पेणमध्ये उजळ माथ्याने फिरणार्‍या आरोपींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी तसेच ठेवीदारांना पैसे मिळावेत या एकच भावनेतून हा लढा देत असून लेखापरीक्षक विक्रम वैद्य यांना प्रक्रियेतून हटवावे, अशी मागणीही या वेळी केली.

Check Also

शरद पवार गटातील राष्ट्रवादीच्या पदाधिकार्‍यांचे लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी केले भाजपमध्ये स्वागत

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल मतदार संघात आमदार प्रशांत ठाकूरांनी केलेल्या विकासकामांवर आणि त्यांच्या कार्यप्रणालीवर …

Leave a Reply