Breaking News

उल्हास नदीचे संवर्धन

लाखो लोकांचे जनजीवन पाण्यासोबत चालविणारी उल्हासनदी प्रदूषणाच्या विळख्यात सापडली आहे. उल्हासनदीचा उगम ज्या ठिकाणी होतो तेथूनच ही जलवाहिनी असलेली नदी प्रदूषणाचा शिकार बनलेली आहे. खंडाळा-लोणावळाच्या पायथ्याशी असलेल्या कातळदराच्या जंगलात उल्हासनदीचा उगम झाला आहे. त्या ठिकाणीच कोंढाणा धरण बांधण्याचे प्रस्तावित असून उल्हासनदी आपल्या उगमच्या ठिकाणी सांडपाणी पोटात घेऊन पुढे कल्याणच्या खाडीपर्यंत प्रवास सुरु करते. उल्हासनदी ज्या ठिकाणी उगम पावते, अगदी त्यांच्या मागे असलेल्या दरीत लोणावळा भागातील सांडपाणी सोडले जाते. सांडपाण्याचा एक मोठा पाईप हा बोरघाटात सोडला आहे, त्यातून दिवसरात्र सांडपाणी दरीत पडताना दिसत असते. पुढे ते सांडपाणी उल्हासनदीच्या उगम झालेल्या ठिकाणी येऊन मिळते आणि डोंगरातील कातळात म्हणजे दगडात उगम पावलेल्या उल्हासनदीचा प्रवास हा प्रदूषित पाणी सोबत घेऊनच सुरू होतो.

कर्जत शहर येईपर्यंत फार तुरळक प्रमाणात लोकवस्ती असल्याने आणि पाणी वाहत येत असताना ते स्वच्छ होऊन पुढे जात असते या नियमाप्रमाणे उल्हासनदीचे पाणी स्वच्छ झालेले असते असे काहींचे म्हणणे आहे. कर्जत शहरात प्रवेश करण्यापूर्वी उल्हासनदीच्या तीरावर मोठ्या प्रमाणात नागरीकरण होत असून त्या ठिकाणी निर्माण होणारे सांडपाणी हे उन्हाळयात काही प्रमाणात कोरड्या राहणार्‍या उल्हास नदीमध्ये सोडले जाते.त्यामुळे कर्जत शहरात प्रवेश करण्याआधी उल्हासनदी सांडपाणी वाहून घेऊन येत असते. त्यात भर म्हणजे कर्जत शहरातील अनेक इमारती यांच्या सांडपाणी सोडणार्‍या पाईपलाईन या थेट उल्हास नदीच्या पात्रात सोडण्यात आल्या आहेत. त्यामुळे उल्हास नदीचे सांडपाणी वाहून नेण्याचे प्रमाण वाढते. परिणामी उल्हास नदीचे पाणी हिरवेगार होऊन ते वापरण्या योग्य राहत नाही. या सर्व स्थितीत उल्हासनदीचे पाणी प्रदूषण ही मोठी समस्या बनून राहिली आहे.कारण ही नदी पुढे कल्याणच्या खाडीला जाऊन मिळते आणि त्या दरम्यान लाखो लोकांची तहान भागविण्यासाठी या नदीच्या पाण्याचा वापर केला जात असल्याने उल्हास नदीचे प्रदूषण मोठी समस्या बनून राहिली आहे. त्यावर उपाययोजना करण्यासाठी

चर्चेच्या फैर्‍या झडत असतात, पण केवळ चर्चेशिवाय काहीही होताना दिसत नाही. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणने नवीन गृहनिर्माण संस्था उभारत असताना आपल्या संकुलाचे ड्रेनेज हे त्याच परिसरात झाडांना वापरण्या योग्य करण्याचे आदेश आहेत. पण तसे काही होत नाही, त्याचवेळी कर्जतसारख्या नगरपालिका असलेल्या शहरात भुयारी गटार व्यवस्था नाही, त्याचवेळी सांडपाण्यावर प्रक्रिया करणारे यंत्रणा नाही, त्यामुळे कर्जत शहरात उल्हासनदीचे प्रदूषण वाढलेले दिसून येते. त्याचा परिणाम म्हणजे कर्जतपासून पुढे उल्हासनदी आंबिवलीजवळ पेज नदीला भेटण्यापूर्वी उल्हास नदीचे पाणी हे हिरवेगार आणि जलपर्णी यांच्यात हरवले असल्याचे दिसून येते.

कर्जत शहरात उल्हासनदीमध्ये सांडपाणी सोडण्यात येत असल्याने नदीमधील सर्व पाणी दूषित झाले आहे.त्यामुळे नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी पालिका प्रयत्न करील असे आश्वासन पालिकेचे मुख्याधिकारी यांनी दिले आहे.

दरम्यान, नदीच्या संवर्धनासाठी शहरातील काही पर्यावरण प्रेमी यांनी काम सुरू केले होते, यांच्या चळवळीला पालिकेच्या निर्णयामुळे यश आल्यासारखे वाटत आहे. कर्जत शहरातून वाहणारी उल्हासनदीचे पाणी त्या नदीमध्ये सांडपाणी सोडले जात असल्याने दूषित झाले आहे हे लक्षात घेऊन कर्जत येथे दहिवली गावाजवळ पायापूल वजा बंधार्‍यात नदीचे पाणी अडविले जात असताना ते दूषित असल्याने पाण्याबाबत सातत्याने ओरड होत आहे. हे लक्षात घेता कर्जत शहरातील समीर सोहोनी आणि मिलिंद भागवत यांनी नदीच्या पात्रात कचरा टाकणार्‍या लोकांमध्ये जनजागृती करण्यासाठी पावले उचलली. गणेश घाट स्वच्छ करण्यासाठी हे दोघेही गेली तीन महिने आपल्या सोयीनुसार येऊन परिसर स्वच्छ ठेवण्याचे काम करीत आहेत. या दोन भिन्न वयाच्या पर्यावरण राखण्याची आवड असलेल्या व्यक्तींनी गेल्या काही महिन्यांपासून सुरू केलेल्या उल्हास नदीच्या संवर्धनाला आता बळ येताना दिसत आहे. कारण त्यांची उल्हासनदीमध्ये टाकला जाणारा कचरा उचलण्याची सवय आता अनेकांनी स्वतःला लावून घेतली आहे. त्यांची सवय चळवळ होऊ पाहत असून कर्जत शहरातून उल्हासनदी पुढे जात असताना ती प्लास्टिकमुक्त राहावी यासाठी त्या दोघांचा प्रयत्न सुरू आहे.केवळ प्लास्टिक नदीमध्ये राहणार नाही, यामुळे नदीचे प्रदूषण कमी होईल असे सोहोनी आणि भागवत या दोन्ही पर्यावरणप्रेमी यांना मान्य नाही. त्यामुळे त्यांनी पुढाकार घेऊन कर्जत नगरपालिकेला बोलते करण्याचा प्रयत्न केला आहे. पालिकेचा नदी संवर्धन प्रकल्प उल्हासनदीला वाचवू शकतो आणिलाखो लोकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निकाली काढू शकतो. याची जाणीव झाल्याने आणि उल्हासनदीचे संवर्धन करावे यासाठी कर्जत शहरातील अनेक हात पुढे येऊ लागले आहेत.

पर्यावरण प्रेमी तरुण यांचा प्रयत्न लक्षात घेऊन कर्जत पालिकेने या कामात सहभागी व्हावे असे आवाहन केल्यानंतर आमदार सुरेश लाड यांनी आपला सहभाग नोंदविण्यासाठी उल्हासनदीवर आपली उपस्थिती लावली. त्यावेळी तेथे आलेले कर्जत पालिका मुख्याधिकारी रामदास कोकरे यांनी यापुढे कर्जत शहरातून उल्हास नदी वाहत असताना नदीमध्ये कोणीही कचरा टाकणार नाही याची काळजी घेण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे यांचे जाळे पालिकेच्या खर्चातून उभे केले जातील, असे आश्वासन दिले आहे. त्याचवेळी नदीलगत ज्या जागा मोकळ्या आहेत, त्या ठिकाणी बगिचा फुलविण्यासाठी पालिका कामे सुरू करील, असे आश्वासन ही चळवळ राबविणार्‍या नागरिकांना दिले. तर कार्यकर्त्या कल्पना दास्ताने यांनी आमच्या नागरिकांनी पुढाकार घेतला आहे, आता पालिकेने आपली जबाबदारी ओळखून काम करायला हवे असे आवाहन त्यांनी केले.  पालिका आणि नागरिक यांनी हातात हात घेऊन नदीचे संवर्धन काम हाती घेतले तर ते सहज शक्य होईल असा आशावाद दास्ताने यांनी व्यक्त केला. आमदार सुरेश लाड यांनी कर्जत शहरातील भुयारी गटारे यांचा विषय गेली सात वर्षे प्रलंबित आहे, त्यावर मार्ग निघावा यासाठी आपण प्रयत्नरत असून शहरात भुयारी गटारे झाली तर उल्हासनदीमधील पाण्याचे प्रदूषण कमी होईल. तर कर्जतच्या प्रथम नागरिक नगराध्यक्ष सुवर्णा जोशी यांनी आमचा प्रयत्न हा भुयारी गटार योजना मंजूर करण्यासाठी आहे. राज्य सरकारकडून या प्रकल्पासाठी मंजुरी मिळाली असून केंद्र सरकारकडे प्रस्ताव गेला आहे. केंद्रीय मंत्री या प्रस्तावावर लक्ष घालत असल्याने लवकर कर्जतचा भुयार गटार योजना प्रकल्प साकारला जाईल, असे पालिकेकडून सांगण्यात आले आहे.

मात्र नदी संवर्धन प्रकल्प राबवित असताना नदीच्या कडेला सतत अतिक्रमण केले जात असून पालिकेने अतिक्रमण होणार नाहीत, याची काळजी घेतली पाहिजे जेणेकरून भविष्यात उल्हासनदी ही प्रदूषण आणि अतिक्रमण मुक्त झालेली असेल. नदीच्या कडेला असलेल्या इमारतीमधील सांडपाणी नदीमध्ये सोडतात आणि आम्ही त्याच पवित्र नदीत आम्ही आमचे लाडके बाप्पा यांचे विसर्जन करतो. त्याला आता काय म्हणायचे असे हतबल होऊन रमाकांत जाधव बोलत होते. त्यांच्या या शब्दाचा विचार सर्वांनी गांभीर्याने करायला हवा, असे उल्हास नदी संवर्धन प्रकल्प राबवित असताना प्रमुख मत विचारात घेण्यात यावे, असे मतप्रवाह पुढे येत आहे.

-संतोष पेरणे, खबरबात

Check Also

राज्यस्तरीय अटल करंडक एकांकिका स्पर्धेच्या प्राथमिक फेरीचा शुभारंभ

स्पर्धा प्रमुख परेश ठाकूर यांची जळगाव केंद्रावर उपस्थिती जळगाव ः रामप्रहर वृत्त श्री. रामशेठ ठाकूर …

Leave a Reply