Breaking News

तीन पायांची अभद्र आघाडी टिकेल का?

एकनाथ खडसे यांचा उपरोधिक सवाल

पंढरपूर ः प्रतिनिधी

 वर्षानुवर्षांची आपली विचारधारा, तत्त्वे बाजूला सारून सत्तेसाठी राज्यात अभद्र आघाडी झाली असून, ही तीन पायांची आघाडी महाराष्ट्राला एका दिशेला नेईल असे वाटत नाही, असा घणाघात भाजप नेते एकनाथ खडसे यांनी केला. तसेच ही तीन पायांची अभद्र आघाडी टिकेल का, असा उपरोधिक सवालही त्यांनी केला. सांगोला तालुक्यातील एका कार्यक्रमाला जाताना खडसे विठ्ठल दर्शनासाठी थांबले असताना बोलत होते. काँग्रेस-राष्ट्रवादी या पक्षांनी वर्षानुवर्षे जपलेली तत्त्वे सत्तेसाठी सोडून दिली असून, पहिल्या 50 दिवसांत 50 प्रकरणे समोर आली आहेत. एकमेकांवर आरोप, विसंगत विधाने, सत्तेसाठी एकत्र आलेली ही अभद्र आघाडी किती दिवस चालेल सांगता येत नाही, असा टोलाही खडसे यांनी लगावला. शिवसेना प्रखर हिंदुत्ववादी, तर काँग्रेस-राष्ट्रवादी हे पुरोगामी पक्ष आहेत, मात्र आता जनतेसमोर जाताना हे कोणती विचारधारा घेऊन जाणार, असा सवालही खडसे यांनी केला. 2014मध्ये शिवसेना काँग्रेससोबत सरकार स्थापन करायच्या तयारीत असल्याचा गौप्यस्फोट माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केल्याने उठलेल्या वादळावर प्रतिक्रिया देताना खडसे म्हणाले की, त्यांच्या आरोपांत तथ्य असू शकते. 2014मध्ये शिवसेना आणि भाजप वेगळे लढले होते. त्यामुळे सेनेने कोणासोबत जायचे हा त्यांचा निर्णय होता. भाजपला सत्तेपासून रोखण्यासाठी आजच्या घडीला हे तीन पक्ष एकत्र आले. त्याच पद्धतीने 2014 साली प्रयत्न झाल्याचे चव्हाण यांनी सांगितले आहे. त्या वेळी पृथ्वीराज चव्हाण हे मुख्यमंत्री असल्याने त्यांच्या माहितीत नक्कीच तथ्य असू शकेल, असेही खडसे यांनी सांगितले.

Check Also

भारतमाता चित्रपटगृहाशी माझं नातं अगदी वेगळं…

भारतमाता चित्रपटगृहाने छान कात टाकली. ते आजचं झाले.बदल हा होतच असतो, तो व्हायलाही हवा. काही …

Leave a Reply