नवी मुंबई ः बातमीदार
वाशी येथील नवी मुंबई महानगरपालिकेच्या विष्णुदास भावे नाट्यगृहात दर्शनी भागात स्थापन करण्यात आलेल्या ब्राँझ धातूच्या सहा फूट उंच मूर्तीचे अनावरण अभिनेते दामले व अभिनेत्री वर्षा उसगावकर यांच्या हस्ते, महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांच्या प्रमुख उपस्थितीत मंगळवारी अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर झाले. या वेळी अतिरिक्त आयुक्त संजय काकडे, प्रशासन विभागाचे उपायुक्त दादासाहेब चाबुकस्वार, शहर अभियंता संजय देसाई, क्रीडा व सांस्कृतिक कार्य विभागाचे उपायुक्त मनोजकुमार महाले, कार्यकारी अभियंता अजय संखे, वाशी विभागाचे सहायक आयुक्त सुखदेव येडवे व इतर मान्यवर उपस्थित होते.
या वेळी प्रशांत दामले यांनी स्वच्छ व सुंदर असा देशात नावलौकीक असणारे नवी मुंबई शहर नावीन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात नेहमीच आघाडीवर आहे. येथे सुविधा निर्मितीप्रमाणेच त्या सुविधांच्या देखभालीवरही विशेष लक्ष दिले जाते असा अनुभव असल्याचे सांगत विष्णुदास भावे नाट्यगृह हे त्याचे उत्तम उदाहरण आहे, असे मत व्यक्त केले. आगामी काळात ऐरोलीतही नाट्यगृह निर्माण होत असून यामधून नवी मुंबईतील नाट्यरसिकांना आणखी एक चांगली सुविधा उपलब्ध होईल याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.
नवी मुंबई नावाप्रमाणेच नाविन्याला प्राधान्य देत असून आज अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर नाटयदेवता नटराज मूर्तीचे अनावरण करण्याचे भाग्य आम्हाला लाभले अशा शब्दात आनंद व्यक्त करीत नामांकित अभिनेत्री वर्षा उसगावकर यांनी बुकेऐवजी बुक भेट देत नवी मुंबई महानगरपालिकेने वाचन संस्कृतीचा प्रसार करण्याचा जपलेला वसा प्रेरणादायी असल्याचे सांगितले.