इस्लामाबाद : वृत्तसंस्था
पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शोएब अख्तरने पुलवामा हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना आदरांजली वाहत भारताला पाकिस्तानविरुद्ध क्रिकेट न खेळण्याचा पूर्णपणे अधिकार असल्याचे म्हटले आहे. भारतीय सैन्यावर हल्ला झाला असून, त्यामध्ये त्यांच्या जवानांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. यामुळे भारताने पाकिस्तानविरुद्ध न खेळण्याचा निर्णय घेतला तर त्याच्यात वावगे काहीच नाही, असे अख्तरने एका पाकिस्तानी वृत्तवाहिनीशी बोलताना आपले मत व्यक्त केले.
याचवेळी शोएबने हल्ल्यानंतर पाकिस्तानवर टीका करणार्या माजी भारतीय खेळाडूंना आपल्या टीकेचे लक्ष्य बनवलेे. भारतीय खेळाडू प्रकरणाचे गांभीर्य लक्षात न घेता टीका करीत असल्याचे शोएबने म्हटले आहे. भारतीय जवानांना आपले प्राण गमवावे लागले याबद्दल आम्हाला दुःख आहे, मात्र पाकिस्तान हा एक स्वतंत्र देश आहे. त्यामुळे मनात कोणताही दुसरा विचार न आणता आम्ही पंतप्रधान इम्रान खान यांच्या पाठीशी आहोत, असे अख्तर म्हणाला.
खेळाडूंनी क्रिकेट सोडून राजकारणावर बोलणे टाळावे.ज्या वेळी असे प्रकार घडतात, त्या वेळी दोन्ही देशांमधील बिघडलेले संबंध सुधारण्यासाठी क्रिकेट एक उत्तम पर्याय आहे. खेळाडूंनी दोन्ही देशांत वितुष्ट येईल अशी वक्तव्य करणे टाळावे, असेही अख्तरने म्हटले आहे.