पुणे ः प्रतिनिधी ‘फनी’ चक्रीवादळाने ओडिशात धुमाकूळ घातल्यानंतर तिथल्या स्थानिक प्रशासनाने केलेल्या कामाचे सर्वत्र कौतुक होताना दिसत आहे. या भागात अनेक मराठी अधिकारी काम करीत असल्यामुळे महाराष्ट्राची मान उंचावली आहे. यातील गंजाम नावाच्या जिल्ह्यात अवघ्या 36 तासांत जिल्हा प्रशासनाने तीन लाख लोकांचे स्थलांतर केले. त्यांच्या या नियोजनामुळे संपूर्ण जिल्ह्यात एकही जीवितहानीची घटना घडली नाही. इतकेच नव्हे तर वादळ संपल्यावर अवघ्या दोन तासांत या जिल्ह्यातील सर्व रस्ते वाहतुकीसाठी मोकळे करण्यात आले. यामागे महाराष्ट्रातील अहमदनगरचे सुपुत्र असलेल्या जिल्हाधिकारी विजय कुलंगे यांचे सुयोग्य नियोजन होते. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेले फनी चक्रीवादळ शुक्रवारी ओडिशा किनारपट्टीला धडकले. या वेळी ओडिशा प्रशासनाने दाखवलेली तत्परता कौतुकास्पद आहे. त्यांच्या या नियोजन आणि तत्काळ अंमलबजावणी प्रक्रियेची आखणी अत्यंत काळजीपूर्वक केली गेली. गंजाम जिल्ह्यात पाच तालुके वादळामुळे प्रभावित झाले होते. फनीबाबत हवामान खात्याने पाच दिवस आधी प्रशासनाला कळवले होते. त्यानुसार गंजाममधून नियोजन करून शेवटच्या दीड दिवसात तीन लाख नागरिकांचे सुरक्षित स्थलांतर केले गेले. यातही प्राधान्याने गरोदर महिला, अपंग, वयोवृद्ध यांना हलविण्यात आले. या वेळी 540 गरोदर महिलांना सुरक्षित ठिकाणी नेण्यात आले. यातील 153 महिलांची 3 तारखेला प्रसूतीही झाली. प्रत्येक स्थलांतरस्थळी अन्न, पाणी, जनरेटर आणि वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून ठेवण्यात आली होती. आधीच स्थानिक भागातील केटरर्स सेवा देणार्या व्यक्तींशी संपर्क करून ठेवण्यात आला होता. अनेक नागरिक सोबत आपली जनावरे किंवा पाळीव प्राणी घेऊन येत असल्याने त्यांनाही दाखल करून घेण्यात आले. या काळात सर्व माध्यमांचा आधार घेऊन लोकांना कच्च्या घरातून बाहेर पडण्याचे आवाहन करण्यात आले. शिवाय प्रत्यक्ष वादळाला सुरुवात झाल्यावर कोणीही बाहेर पडू नये, असाही प्रचार करण्यात आला. अर्थात याचा फायदा लोकांकडून मिळणार्या सहकार्यात झाल्याचे प्रशासनाने नमूद केले.
Check Also
करिअरविषयक मार्गदर्शन सत्राला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
पनवेल : रामप्रहर वृत्तसध्या जगात एआय तंत्रज्ञानावर आधारित सर्वाधिक संधी असल्यामुळे विद्यार्थ्यांनी एआयसोबत लवकरच परिचित …