कर्जत : बातमीदार
येथे पर्यटनासाठी आलेल्या दिवा (जि. ठाणे) येथील पर्यटक महिलेचा दरीत पडून मृत्यू झाला. गीता मिश्रा असे या महिला पर्यटकाचे नाव होते.
दिवा येथील अभिषेक मिश्रा हे आपली पत्नी गिता, दोन मुली चाहत, अन्यना तसेच मित्र सचिन शुक्ला यांच्यासह शनिवारी (दि.4) माथेरानला पर्यटनासाठी आले होते. दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास ते येथील बेलवेडीयर पॉईट पाहण्यासाठी गेले असता पत्नी गिता मिश्रा हिचा पाय घसरुन 800 फुट खोल दरीत पडल्या. त्यात त्या मृत पावल्या. याबाबत माहिती मिळताच माथेरान पोलिसांनी सह्याद्री रेस्क्यू टीमला पाचारण केले. माथेरान पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव आचरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस शिपाई प्रशांत गायकवाड, पोलीस नाईक रुपेश नागे तसेच सह्याद्री मित्र रेस्क्यु टिमच्या सदस्यांनी खोल दरीत उतरुन गिता मिश्रा यांचा शोध सुरु केला असता 800 फुट खोल दरीत त्यांचा मृत्युदेह आढळला. त्यानंतर सह्याद्री मित्र रेस्क्यु टिमचे सुनिल कोळी, उमेश मोरे, वैभव नाईक, सुनिल ढोले, अक्षय परब, अजिंक्य सुतार, अमोल सकपाळ तसेच ऋषिकेश कोळी यांनी खोल दरीतून मृतदेह वर काढुन तो शवविच्छेदनाकरीता माथेरानच्या बी. जे. हॉस्पिटल येथे पाठविला. या प्रकरणाचा माथेरान पोलीस अधिक तपास करीत आहेत.