माणगाव ः प्रतिनिधी
गणेशोत्सवासाठी मकरांना मोठ्या प्रमाणात मागणी असते. यापूर्वी त्यासाठी प्लास्टिक, थर्माकोल आदी वस्तूंचा वापर होत होता. त्यामुळे पर्यावरणाला या घटकांचा धोका होता. यावर उपाय म्हणून लॉकडाऊन काळात शहरी भागातून गावाकडे आलेल्या तरुणांनी टाकावूतून टिकाऊ व पर्यावरणपूरक अशी मकर बनविली आहेत. यामध्ये विविध प्रकारच्या पुठ्ठ्यांचा वापर करून आकर्षक नक्षीकाम करून मकर बनविले आहेत. यामध्ये मंदिर, सिंहासन, खांब आदी नक्षीकाम केले आहे. अतिशय आकर्षक दिसणारे व अगदी कमीत कमी खर्चात तयार झालेली ही मकर सर्वांच्या पसंतीस उतरत आहेत.
जुने पुठ्ठे वापरून ही मकर तयार केली असून लॉकडाऊन काळातील फावल्या वेळात तालुक्यातील भादाव, चेरवली आदी गावांतील तरुणांनी आपल्या कलागुणांना वाव देत कमीत कमी खर्चात बनविलेल्या या पर्यावरणपूरक सजावटीमुळे या तरुणांचे कौतुक होत आहे. जुने टीव्ही, पंखा, फ्रीज यांचे पुठ्ठे वापरून ही मकर बनविली आहेत.
लॉकडाऊन काळात मिळालेल्या वेळेचा सदुपयोग करून ही मकर बनविली आहेत. पूर्णतः पर्यावरणपूरक व अतिशय कमी खर्चात मकर तयार झाली आहेत. यातून पर्यावरणाचे रक्षण करण्याचा संदेश मिळेल.
-राजेश पालवणकर, कारागीर
टाकावूतून टिकाऊ अशी ही मकर आहेत. या तरुणांच्या कलागुणांना लॉकडाऊन काळात वाव मिळाला असून अतिशय सुंदर मकर त्यांनी तयार केली आहेत. महागाईच्या काळात घरी बनविलेल्या या मकरांना खूप महत्त्व आहे.-नितीश भादावकर, सामाजिक कार्यकर्ते.
RamPrahar – The Panvel Daily Paper