महाड : प्रतिनिधी
मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम अद्याप पूर्ण झाले नाही तरच महाड शहराजवळ असलेल्या भुयारी मार्गातील फुटपाथवर विक्रेते आणि खाजगी वाहनांनी तळ ठोकला असल्याने तेथे कायम वाहतूक कोंडी होत आहे. या वाहतूक कोंडीकडे स्थानिक पोलीस प्रशासन व महामार्ग बांधकाम विभागाचे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे सर्वसामान्य माणसाला मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे.
महाडजवळ नातेखिंड आणि चांभारखिंड या ठिकाणी दोन मोठे भुयारी मार्ग ठेवण्यात आले आहेत. मुंबई-गोवा महामार्ग अद्याप अपूर्ण असून महाडजवळ नातेखिंड ते हॉटेल विसावापर्यंत उंची वाढवून महामार्गाचे काम सुरु आहे. नातेखिंड या ठिकाणी किल्ले रायगडकडे आणि महाड शहरात जाण्यासाठी तर चांभारखिंड गावाजवळ महाड शहरातील प्रवेश मार्ग आहे. या दोन्ही ठिकाणी कायम वाहनांची वर्दळ असते. महाड एसटी स्थानकात येणार्या बसेसदेखील चांभारखिंड येथील भुयारी मार्गाचाच वापर करणार आहेत. सध्या एसटी महामंडळाच्या रस्त्यावरून महाड शहराला प्रवेश मार्ग आहे.
नातेखिंड आणि चांभारखिंड या दोन्ही भुयारी मार्गावर खाद्य पदार्थ, भाजी, आणि फळ विक्रेते, मासळी विक्रेते, रिक्षा चालकांनी कब्जा केला आहे. यामुळे अवजड वाहने, शिवशाही बसेस आदी वाहने भुयारी मार्गातून तसेच सर्व्हिस मार्गावर काढताना मोठी वाहतूक कोंडी होत आहे. एका बाजूला विक्रेते तर दुसर्या बाजूला रिक्षा चालकांनी उभ्या केलेल्या रिक्षा, कामावर जाताना उभ्या केलेल्या दुचाकी यामुळे याठिकाणी मोठी अडचण निर्माण झाली आहे.
चांभारखिंड येथे महाड एसटी महामंडळाच्या रस्त्याच्या प्रवेशद्वारावर सध्या खाजगी प्रवासी वाहतूक करणारी खाजगी वाहने बिनदिक्कत उभी करून प्रवासी गोळा करण्याचे काम चालते. हीच अवस्था नातेखिंड येथील महाड-रायगड मार्गाची झाली आहे. या ठिकाणीदेखील भुयारी मार्गात दोन्ही बाजूला आरडा ओरड करणारे भाजी, फळ विक्रेते आणि खाद्य पदार्थ विक्रेत्यांनी तळ ठोकला आहे. किल्ले रायगडाकडे जाणार्या वाहनांना आणि किल्ले रायगडकडून महाड शहरात येणार्या वाहनांना त्याचा त्रास होत आहे. या ठिकाणी महामार्गाचे काम सुरु आहे. महामार्ग कामासाठी आलेल्या वाहनांनादेखील याठिकाणी सामान उतरवताना अडचण निर्माण झाली आहे. महामार्ग पूर्ण होण्याआधीच विक्रेत्यांनी बस्तान बसवल्याने भविष्यात या ठिकाणी मोठ्या वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागणारा आहे.
महाड शहराजवळ अद्याप मूळ महामार्ग सुरु झालेला नाही. यामुळे नाते खिंड येथून थेट नडगावपर्यंत अद्याप पर्यायी मार्गाचा वापर केला जात आहे. पर्यायी मार्गदेखील एकाच दिशेनेच सुरु असल्याने ये-जा करणारी वाहने एकाच पर्यायी मार्गावरून धावत आहेत. त्यातच अनेकवेळा विविध ठिकाणी महामार्ग ठेकेदार कंपनीकडून बदल केले जात आहेत. याचा त्रास वाहनचालकांना सहन करावा लागत आहे.
मच्छीची मागणी करतंय तरी कोण?
मुंबई-गोवा महामार्गालगत महाड एसटी स्थानकाच्या रस्त्यावर यापूर्वी मासळी विक्रेते बसत होते. महाड शहरात मच्छी मार्केट असतानादेखील बाहेरून येणार्या मासळी विक्रेत्यांनी कधी नगरपालिका हद्दीत, कधी एसटी स्थानकाचा रस्ता आणि आता भुयारी मार्गात बस्तान बसवले आहे. मासळी विक्रेत्यांना अधिकार्यांचे, पोलिसांचे भय नसल्याने लोकांच्या त्रासाबाबत यांना काहीही देणेघेणे नाही. याबाबत बोलताना एका मासळी विक्रेत्याने नाव न सांगण्याच्या अटीवर हायवे डिपार्टमेंट अधिकारी इथे येवून फुकट मच्छी घेऊन जातात असे सांगितले. नक्की कोणत्या विभागाचे अधिकारी मच्छी घेवून नागरिकांच्या त्रासाला कारणीभूत ठरत आहेत याचा शोध घेवून कारवाई होणे गरजेचे आहे.