मँचेस्टर : वृत्तसंस्था
विश्वचषकाच्या अखेरच्या साखळी सामन्यात दक्षिण आफ्रिकेने ऑस्ट्रेलियाच्या संघाचा 10 धावांनी पराभव करीत विश्वचषकातील आपला समारोप गोड केला. अखेरच्या षटकापर्यंत रंगलेल्या या सामन्यात आफ्रिकेच्या 325 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाचा डाव 315 धावांमध्ये आटोपला.
ऑस्ट्रेलियाकडून सलामीवीर डेव्हिड वॉर्नरने शानदार शतकी खेळी (117 चेंडूंत 122 धावा) करीत एक बाजू सावरून धरली होती, मात्र दुसर्या बाजूने ठराविक अंतराने गडी बाद होत गेले. सलामीवीर फिंच अवघ्या तीन धावांत तंबूत परतला. त्यानंतर आलेले उस्मान ख्वाजा, स्टीव्ह स्मिथ, मार्कस स्टॉयनिस व ग्लेन मॅक्सवेल स्वस्तात बाद झाले. वॉर्नरला अॅलेक्स कॅरीने चांगली साथ दिली. सहाव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आलेल्या कॅरीने 69 चेंडूंत 85 धावांची खेळी केली. दोघे संघाला विजय मिळवून देतील असे वाटत असतानाच वॉर्नरपाठोपाठ कॅरीही बाद झाला. यानंतर आलेल्या मायकल स्टार्कने फटकेबाजी करीत ऑस्ट्रेलियाला लक्ष्याजवळ आणले, मात्र झटपट विकेट पडल्याने हा संघ 315 धावाच करू शकला. आफ्रिकेकडून कागिसो रबाडाने सर्वाधिक तीन बळी घेतले.
तत्पूर्वी, नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना फाप डु प्लेसिसने तडाखेबंद शतकी खेळी केली. त्याने 94 चेंडूंमध्ये 100 धावा केल्या. प्लेसिसला क्विंटन डी कॉक (52) व रासी दुसेन (95) यांनी दमदार साथ दिली. या तिघांच्या खेळीमुळे आफ्रिकेने सहा गड्यांच्या मोबदल्यात 325 धावांचे आव्हान ऑस्ट्रेलियासमोर ठेवले होते.