Breaking News

महामार्ग चौपदरीकरणाचे 80 टक्के काम पूर्ण

देशात महामार्गांचे जाळे झपाट्याने विकसित होत आहे. गेली अनेक वर्षे प्रलंबित असलेला मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 66 दुसरा टप्पा पुर्णत्वाच्या दिशेने आहे. यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे कौतुक होत आहे. गेली 12 वर्षे पळस्पे ते इंदापूर महामार्गाचे काम निकृष्ट दर्जाचे झाल्याने कोकणवासीयांना खुपच मनस्ताप सहन करावा लागला होता आणि याचे पाप हे भुजबळांच्या वाट्याला जाते, परंतु तीन वर्षांपूर्वी केंद्रीयमंत्री गडकरी यांच्यामुळे इंदापूर ते पत्रादेवी या दुसर्‍या टप्प्याच्या कामाला सुरुवात झाली. आधुनिक तंत्रज्ञान वापरून उच्च दर्जाचा काँक्रीट महामार्ग आता पूर्णत्वाकडे वाटचाल करीत आहे. कोकणचे आता खर्‍या अर्थाने स्वप्न साकार होत आहे. चाकरमान्यांची मुंबई आता अगदी जवळ येणार आहे. मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 66 चे जवळपास 80 टक्के काम पुर्ण झाले आहे. या महामार्गावरील बहुतांशी पूल बांधुन त्यांची चाचणी घेऊन वाहतुकीसाठी खुले देखील करण्यात आले आहेत. बहुतांश महामार्गावरुन वाहतूक सुरु झाली आहे. वाहनचालक प्रथमच कोकणात वेगवान ड्रायव्हिंगचा आनंद घेत आहेत. खड्डे आणि घाटातील अवघड वळणे आता इतिहासजमा होणार आहेत. जस जसे महामार्गाचे काम पूर्ण होत आहे तस तशा काही अडचणीदेखील समोर येत आहेत, मात्र तेवढीच त्यावर मात केली जात आहे. पंधरा वर्षांपूर्वी केलेला सर्व्हे आणि आताची स्थिती यात बराच फरक पडला आहे. काही ठिकाणी नाक्यावर वस्ती वाढली आहे. काही ठिकाणी अतिपावसामुळे पाण्याचे प्रवाह बदलले आहेत. मोरीच्या जागी छोट्या पुलांची गरज वाढली आहे, तर महामार्गालगत नागरी वस्ती वाढल्याने अतिरिक्त भुयारी मार्गांची गरज वाढली आहे. काही ठिकाणी भुस्तखलनाचा धोका वाढला आहे. काही ठिकाणी पुराचा धोका वाढला आहे. या सर्वांपेक्षाही यक्षप्रश्न असा निर्माण झाला आहे की महामार्गालगत असलेल्या गावांना महामार्गावरुन प्रवास करता येणार नाही. गावचे जोड रस्ते जे पुर्वी जुन्या महामार्गाला जोडले होते ते आता जोडले जाणार नाहीत. या ठिकाणी कोणत्याही प्रकारची इतर वाहने, बैलगाडी, सायलस्वार यांना चौपदरी महामार्गावर येण्यास रोखण्यासाठी लोखंडाचे बॅरीगेट्स लावले जाणार आहेत. या गावासाठी कोणत्याही प्रकारचे सर्व्हिस रोड नसल्याने महाड तालुक्यातील बर्‍याचशा गावांचा संपर्क तुटणार आहे. जुना महामार्ग आहे त्या स्थितीत ठेवला असता तर या गावाचा संपर्क कायम राहिला असता आणि ज्यांना चौपदरी महामार्गावरुन जायचे नसेल त्यांच्यासाठी एक पर्याय राहिला असता. मात्र समस्या असल्या तरी गेले अनेक वर्षांचे चौपदरीकरणाचे सर्वांचे स्वप्न आता सत्यात उतरत आहे. मुंबई महाड हे अंतर पाच तासांवरुन तीन तासांवर येणार आहे. तसेच पूर्वीसारखा एकपदरी महामार्ग नसून तीन लेन असणार आहेत. या मुळे अपघातांचे प्रमाण 90 टक्क्यांनी कमी होणार आहे. तसेच सतत होणारी वाहतूक कोंडी होणार नाही. त्यामुळे इंधनाचीही बचत होणार आहे. हेच या नव्या महामार्गाचे वैशिष्ट्य आहे. कोकणाचा पर्यटन आणि औद्योगिक विकास झपाट्याने होणार आहे.

-महेश शिंदे

Check Also

कामोठ्यात शनिवारी ’मा. श्री. परेश ठाकूर केसरी’ भव्य कुस्त्यांचे जंगी सामने

पैलवान देवा थापा आणि नवीन चौहान यांची बिग शो मॅच होणार पनवेल ः रामप्रहर वृत्त …

Leave a Reply