Breaking News

हे तर शिक्षकांच्या हक्कावर गदा आणण्याचे काम

पनवेलचे गटशिक्षण अधिकारी आणि त्यांच्या सहकार्‍यावर कारवाई करा -प्रकाश बिनेदार

पनवेल : रामप्रहर वृत्त

शिक्षकांच्या व्यक्तीगत हक्कावर गदा आणण्याचे काम करणारे पनवेल पंचायत समितीचे गटशिक्षण अधिकारी मनिष खामकर आणि त्यांचे सहकारी सिताराम मोहिते यांच्यावर कारवाई करण्याची मागणी भाजपच्या अनुसूचित जाती मोर्चाचे रायगड जिल्हा अध्यक्ष नगरसेवक प्रकाश बिनेदार यांनी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

बिनेदार यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, शिक्षकांना त्यांच्या न्याय हक्कासाठी शिक्षण संघटना काढून चालवण्याचा त्यांना भारतीय संविधानाने हक्क व अधिकार दिले आहेत, मात्र असे निदर्शनास आले आले की पनवेल पंचायत समितीचे शिक्षण विभागातील अधिकारी विशिष्ट संघटनेसाठी जाहिरपणाने काम करत आहेत. विशिष्ट संघटनेच्या मेळाव्यासाठी शिक्षकांवर दबाव आणून पैसे काढणे, पावत्या फाडणे, मेळाव्यासाठी उपस्थित रहा असे प्रत्यक्ष अप्रत्यक्ष फोन करून सांगणे, व्हॉटसअ‍ॅपवर मेसेज पाठवणे ही बेजबाबदारपणाची कामे करत असल्याच्या तक्रारी माझ्याकडे तसेच आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडे शिक्षकांच्या आल्या आहेत. मागील मेळाव्यासाठी संघटनेच्या पावत्या फाडण्यासाठी गटशिक्षण अधिकारी मनिष खामकर यांनी सांगितले होते, तर दिनांक 06 मे 2022 रोजी बांठिया हायस्कूल (संत साई बाबा हॉल) येथे आयोजित केलेल्या शिक्षक मेळाव्यासाठी सिताराम मोहिते यांनी प्रत्यक्ष मोबाईलवरुन केंद्र प्रमुखांना जाहिरपणे व्हॉटसअ‍ॅप मेसेज पाठवून आपल्या स्तरावर सर्व शिक्षकांना मेळाव्यासाठी उपस्थित राहण्याबाबत कळविले होते. हे नियमबाह्य व कर्तव्यात कसूर केला असून त्यांच्या कामात ’अनियमितता आढळून आल्याचे स्पष्ट होत आहे.

विशिष्ट शिक्षण संघटनेच्या पावत्या फाडा तसेच त्यांच्या संघटनेच्या मेळाव्यास हजर रहा असे निरोप मनिष खामकर, सिताराम मोहिते यांच्याकडून केंद्र प्रमुख आणि शिक्षकांना जात असतील तर हे योग्य आहे का? म्हणजे विशिष्ट संघटनेला जाहिरपणे सहकार्य करायचे असा त्याचा स्पष्ट अर्थ आहे म्हणजेच उरलेल्या संघटनेला विरोध करणे असा आहे. अशा प्रकारे निरोप देणे व शिक्षकांवर सक्ती करणे योग्य नसून शिक्षकांची विशिष्ट संघटनेसोबत जाण्याची इच्छा नसताना त्यांना उपस्थित राहण्यासाठी दबाव आणणे हे गैरकृत्य असून शिक्षकांच्या व्यक्तीगत हक्कावर गदा आणण्याचे काम पनवेल पंचायत समितीचे गटशिक्षण अधिकारी मनिष खामकर आणि त्यांचे सहकारी सिताराम मोहिते हे जाणीवपूर्वक करत असल्यामुळे त्यांच्यावर सात दिवसात त्वरित कारवाई करावी अन्यथा पंचायत समितीवर जाहिर मोर्चा काढून आंदोलन करावे लागेल आणि याला संबंधित प्रशासनाची सर्वस्वी जबाबदारी राहील, असेही प्रकाश बिनेदार यांनी सूचना वजा इशारा दिला आहे.

Check Also

तापमानवाढीमुळे महायुतीच्या कार्यकर्त्यांनी प्रचारादरम्यान काळजी घ्यावी -खासदार श्रीरंग बारणे

कर्जत : प्रतिनिधी मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी, मनसे, आरपीआय, रासप व मित्रपक्ष महायुतीचे …

Leave a Reply