भाजप नेते प्रसाद हनुमंते यांची मागणी
पनवेल : रामप्रहर वृत्त
वीज ग्राहक अथवा धारकांकडून दरवर्षी घेण्यात येणार्या अनामत (डिपॉझिट) रकमेबाबत माहिती मिळण्याची मागणी भाजप सोशल मीडिया सेलचे पनवेल शहर संयोजक प्रसाद हनुमंते यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी महावितरणच्या पनवेल उरण नाका येथील अतिरिक्त कार्यकारी अभियंत्यांना निवेदन दिले आहे.
पनवेलमधील वीज ग्राहक, धारकाकडून गेली अनेक वर्षे दरवर्षी विजबिलपोटी अनामत रक्कम वसूल केली जाते. या अनामत रक्कमेचा कुठेही ताळतंत्र लागत नाही आहे. याबाबत प्रसाद हनुमंते यांनी महावितरणचे कार्यकारी अभियंता पांडुरंग बोके यांची भेट घेऊन ही बाब निसर्शनास आणून दिली. या अनामत रक्कमेवरचे व्याज आर्थिक वर्षाच्या शेवटी ग्राहकांच्या बिलातून वजा करण्यात येते असे सांगण्यात येते, परंतु विज ग्राहकाकडून वसुली पद्धतीने घेण्यात येणार्या अनामत रक्कमेबाबत साशंकता/ गौडबंगाल कायम असल्याचे दिसत आहे. याबाबत महावितरणकडून कोणत्याही प्रकारचे उत्तर अथवा खुलासा देण्यात येत नाही.
ज्या प्रकारे थकीत वीज बिलाचे स्टेटमेंट ग्राहकास देण्यात येते त्याचप्रमाणे ग्राहकाकडून वसूल करण्यात येणार्या अनामत (डिपॉझिट) रक्कमेचेही सॅन 2003 (संगणकीय झाल्यापासूनचे) स्टेटमेंट देऊन सविस्तर, परिपूर्ण माहिती लेखी स्वरूपात देण्यात यावी, अशी मागणी प्रसाद हनुमंते यांनी अतिरिक्त कार्यकारी अभियंता यांच्याकडे केली आहे. या वेळी सोशल मीडिया सेलचे सह संयोजक मनोज पाटील, शहर सदस्य सचिन नाजरे, पनवेल शहर ओबीसी मोर्चाचे सरचिटणीस प्रसाद म्हात्रे ही उपस्थित होते.