पनवेल, पेण ः वार्ताहर
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या एका एसटी बसला मुंबई-गोवा महामार्गावरील कर्नाळा अभयारण्य येथे शुक्रवारी (दि. 13) सकाळी अचानक आग लागली. या आगीत बस जळून खाक झाली. सुदैवाने जीवितहानी झाली नाही. मुंबई सेंट्रल येथून महाडमधील फौजी आंबवडे येथे जाणारी एसटी बस (एमएच 14-बीटी 2056) सकाळी 9.15च्या सुमारास कर्नाळा अभयारण्य येथे आली असता या गाडीतून धूर येत असल्याचे चालकाच्या लक्षात आले. या वेळी प्रसंगावधान राखून चालक व वाहकाने सर्व 52 प्रवाशांना गाडीतून उतरविले. त्यामुळे सुदैवाने जीवितहानी झाली नाही, पण प्रवाशांचे सामान आगीत बससह भस्मसात झाले. अग्निशमन दलाने ही आग आटोक्यात आणण्यात आली. या वेळी काही काळासाठी मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. वाहतूक पोलिसांनी ती सुरळीत केली. दरम्यान, एसटी जिल्हा वाहतूक नियंत्रक अनघा बारटक्के यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.