हवामान बदलाच्या भयावह परिणामांचे चित्र किती भीषण असू शकेल याचा इशारा देणारे अनेक अहवाल या आठवडाभरात समोर आले आहेत. वाढते तापमान, पावसाच्या स्वरुपात वारंवार होणारे ठळक बदल आणि कित्येक ठिकाणी उद्भवणारी पूरस्थिती या तिन्ही बाबी हवामान बदलाच्या दुष्परिणामांना तोंड देण्यासाठीची सुसज्जता भारताला आता वेगाने वाढवावी लागणार आहे हेच अधोरेखित करतात.
यंदाच्या मार्च, एप्रिल, मे महिन्यात जगभरातील अनेक देशांना अतितीव्र उष्म्याचा सामना करावा लागला आहे. जागतिक हवामान बदल हा निव्वळ आंतरराष्ट्रीय परिषदांमधून चर्चा करण्याचा विषय राहिला नसून संपूर्ण मानवजातीला इथून पुढे या भीषण वास्तवाला तोंड द्यावे लागणार आहे याची चुणूक या वर्षीपासून दिसू लागली आहे. हा जागतिक हवामान बदल तात्कालिक स्वरुपाचा नसून त्याला तोंड देण्यासाठी आपली सुसज्जता वाढवण्यावाचून आपल्यापुढे अन्य पर्याय नाही हेही शास्त्रज्ञांनी आता स्पष्टपणे सांगायला सुरूवात केली आहे. राजधानी दिल्ली व आसपासच्या परिसरात यंदा पारा 49 अंश सेल्सिअसला जाऊन पोहोचला. उत्तर भारतात काही भागात हा आकडा 50 अंशांच्याही पुढे गेला. एकीकडे उत्तर भारत अतितीव्र उष्म्याच्या लाटेत होरपळून निघत असताना आसामात भीषण पूरस्थिती ओढवली आहे. हे सारे हवामान बदलाचेच परिणाम आहेत हे स्पष्ट आहे. अवघा दक्षिण आशियाच यंदा हवामान बदलाच्या परिणामांना तोंड देतो आहे आणि येथून पुढे अतितीव्र उष्म्याच्या लाटा या अधिक तीव्रच होत जातील असा इशारा शास्त्रज्ञांनी दिला आहे. अतितीव्र उष्म्यामुळे यंदा भारतातील गव्हाच्या उत्पादनावर परिणाम झाला. येत्या काही वर्षांत हवामान बदलामुळे अन्नधान्य उत्पादनात मोठी घट होणार असून भूकबळींची संख्या भयावहरित्या वाढू शकेल असे सांगितले जाते आहे. अतितीव्र उष्म्याचे परिणाम विशिष्ट गटांमध्ये मोडणार्या जनतेला जास्त भोगावे लागणार आहेत. उदाहरणार्थ शहरी भागांमध्ये ग्रामीण भागाच्या तुलनेत उष्मा अधिक जाणवतो. तसेच उघड्यावर काम करणारे मजूर, असंघटित क्षेत्रातील कामगार, भाजी-मासे विक्रेते आदींना अतितीव्र उष्म्याच्या दीर्घकालीन गंभीर आरोग्य समस्यांना तोंड द्यावे लागणार आहे. याचे परिणाम कोविड इतक्याच किंवा त्याहूनही अधिक तीव्रतेने जाणवतील हे लक्षात घेऊन सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेला सुसज्ज करावे लागणार आहे. महाराष्ट्रात नागपूरसारख्या शहरात अतितीव्र उष्मा लक्षात घेऊन जीवनशैलीत मूलभूत बदल करणे भाग पडणार आहे. कामाच्या वेळा बदलणे, घरांच्या व इमारतींच्या बांधकामात उष्मा शोषून घेणार्या तंत्राचा वापर करणे आदी उपाययोजनांचा नियोजनपूर्वक वापर करावा लागेल. देशभरातच विशेषत: महिला व मुलांच्या आरोग्यावर तापमानवाढीचा गंभीर परिणाम होणार असून जवळपास 20 टक्के महिला व मुलांमध्ये लोहाची कमतरता दिसून येईल, झिंकचा अभावही वाढेल असे तज्ज्ञ डॉक्टर सांगत आहेत. कोलेस्टेरॉलची समस्या व पक्षाघात यांचे प्रमाणही वाढण्याची शक्यता आहे. पृथ्वीचे एकंदर तापमान 1.2 अंश सेल्सिअसने वाढले आहे. कार्बन उत्सर्जन कमी करा अशी हाकाटी गेली अनेक वर्षे सुरू होती. परंतु फार लक्षणीय असे बदल काही त्या आघाडीवर कोणताच देश घडवू शकलेला नाही. त्यामुळे आता जागतिक हवामान बदलाच्या दुष्परिणामांना तोंड देण्यासाठीची सुसज्जता वाढवण्यावर भर देणे याच पर्यायावर सार्यांनाच लक्ष केंद्रित करावे लागणार आहे.