Breaking News

’स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी’

‘स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी’  असे आपल्या माय मराठीत म्हटले जाते. आई आजूबाजूला नसेल तर काहीच सुचत नाही. बाहेरून घरात आल्यानंतर सर्वात पहिली हाक मारली जाते ती आईला. सर्वात पहिले नजर शोधू लागते ती घरात आईला. बाकी कोणी घरात आहे की, नाही हे सर्वात पहिले डोक्यात येतच नाही. तुम्ही कितीही प्रयत्न केलात तरी आईची जागा कधी कोणी घेऊ शकत नाही. बालग्रामसारख्या संस्थेतील निराधार मुलांनाही तेथे आपला सांभाळ करणार्‍या आईची आठवण आल्याशिवाय राहत नाही. आईसाठी (मदर्स डे) मातृदिन हा उत्सव आईचा सन्मान करण्यासाठी साजरा केला जातो.

मदर्स डे होऊन गेल्यावर हे सगळे आठवण्याचे कारण म्हणजे या महिन्यातील दुसर्‍या रविवारी एसटीतून प्रवास करताना माझ्या शेजारी बसलेल्या महिलेला सारखे ’मदर्स डे’च्या शुभेच्छा देणारे फोन येत होत. त्या शुभेच्छा स्वीकारताना तिच्या चेहर्यावर दिसणारा आनंद लपून राहत नव्हता. त्यांना सतत येणारे फोन पाहून कुतुहलाने मी त्यांना विचारले, तुम्हाला शुभेच्छा देण्यासाठी एवढे फोन कसे येत आहेत. तुम्ही काय करता. त्या म्हणाल्या, मी अलिबागजवळच्या एका बालग्राममध्ये काम करते. आमच्या बालग्राममधून मोठी झालेली ही मुले आज वेगवेगळ्या ठिकाणी आहेत, ती मला फोन करून शुभेच्छा देत आहेत.

सुषमा महाजन या मूळच्या जळगाव जिल्ह्यातील त्यांना दोन मुले आहेत. त्या परिस्थितीमुळे येथील बालग्राममध्ये नोकरी करीत आहेत. बालग्राममध्ये निराधार लहान मुलांना आणले जाते. त्यांना मोठी होईपर्यंत आपल्या मुलांप्रमाणे प्रेम देऊन सांभाळावे लागते. ही मुले मोठी झाल्यावर नोकरीधंद्यात, संसारात गुंतल्यावरही अनेक वेळा भेटायला येतात. मदर्स डेला तर आठवणीने फोन करून शुभेच्छा देतात हे सांगताना त्यांच्या चेहर्‍यावर वेगळीच चमक आणि समाधान दिसत होते. तेवढ्यात त्यांचा स्टॉप आल्याने त्या उतरून गेल्या.

अ‍ॅना जार्विस या अमेरिकन महिलेने पहिल्यांदा मदर्स डे साजरा करण्यास सुरुवात केली. अ‍ॅनाला आपल्या आईविषयी अत्यंत प्रेम आणि आदर होता. जेव्हा अ‍ॅनाच्या आईचे निधन झाले तेव्हा अ‍ॅनाने आपले संपूर्ण आयुष्य आपल्या आईला समर्पित केले. आपल्या आईच्या निधनानंतर अ‍ॅनाने मदर्स डे साजरा करण्यास सुरुवात केली. युरोमध्ये हा दिवस मदरिंग संडे नावाने साजरा केल जातो. अमेरिकचे तत्कालीन राष्ट्रपती वुड्रो विल्सन यांनी 9 मे 1914 हा दिवस मदर्स डे साजरा करण्यास सुरुवात केली. त्यानंतर अमेरिकेत मे महिन्याच्या दुसर्‍या रविवारी मदर्स डे साजरा केला जाईल, असा कायदा अमेरिकेच्या संसदेत पारित करण्यात आला. त्यानंतर युरोप खंडातील देश आणि भारतातही हा मातृदिन म्हणून साजरा करण्यास सुरुवात झाली.

आपण एकमेकांविषयी तिरस्कार करून दुःख आणि  वेदनाच जन्माला घालतो. ते दूर करायचा असेल तर प्रत्येकाने आपल्यातले आईपण जपले पाहिजे. आईपणातल्या मातृत्वाला, सहृदयतेला जपले पाहिजे तरच आजूबाजूला स्वार्थासाठी चाललेली, सत्तेसाठी चाललेली, जाती-धर्माच्या नावाखाली आपल्याच माणसांची हत्या थांबवू शकू. आज आईपणामागचा व्यापक अर्थ नव्याने जाणून घेण्याची वेळ आली आहे. कारण जगात शांतता, बंधुत्व, एकोपा नांदणे ही काळाची गरज आहे. आई ही व्यक्ती असली तरी आईपण ही वृत्ती आहे, भावना आहे. ती भावना जेवढी व्यापक होत जाईल तितके तिच्यामध्ये प्रेम, शांतता, बंधुत्व, सहृदयता, एकोपा सामावत राहिल पण आज त्याचीच वानवा आहे

आई पणाच्या गौरवापेक्षा आईचा, तिच्या त्यागाचा, कुटुंबावरील प्रेमाचा सन्मान अशा व्याख्येत ‘मदर्स डे’चं व्यापकत्व होते. आता त्याला व्यावसायिक स्वरूप येऊ लागले आहे. मदर्स डे म्हणजे कार्नेशनची फुले, असे समीकरण झालं आणि या फुलाचा बाजार सुरू झाला. ‘मदर्स डे’ आला की, या फुलांच्या किमती नको तितक्या वाढू लागल्या. त्याच्या रंगांना अर्थ आले. अनेकांनी या दिवसाचा वापर वेगवेगळ्या कारणांसाठी फंड गोळा करण्यासाठी सुरू केला. गिफ्टस, शुभेच्छा कार्डस् यांच्या धंद्याला बरकत आली. मदर्स डेला आपण सेलिब्रेटी किंवा राजकीय नेत्यांच्या आईच्या मुलाखती घेतो, त्यांचा सन्मान करतो, पण अनेक निराधार मुलांसाठी आपले संपूर्ण आयुष्य खर्‍या अर्थाने समर्पित करणार्‍या अशा बालग्रामसारख्या संस्थेतील आईंचा सन्मान आपण कोणीच करीत नाही. ज्यांचे आपण कोणीच नसतो अशा निराधार मुलांची आई होणे, त्यांना प्रेम देणे सोपे नसते. त्यांच्या कार्याला खरे तर ’मदर्स डेला’ सलाम करणे आवश्यक आहे, पण त्याचाच आपल्याला विसर पडतो.

आईचे नाते सर्व नात्यांमध्ये श्रेष्ठ आहे. तीची तुलना इतर नात्यांबरोबर होवूच शकत नाही. ज्याला आईचे नाते कळले, तीच  व्यक्ती आपल्या जीवनात पुढे इतर नात्यांचा सन्मान करु लागेल यासाठी आधी आईचे नाते कळले पाहिजे. ‘स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी’  असे आपल्या माय मराठीत यासाठीचे म्हटले जाते.

-नितीन देशमुख, खबरबात

Check Also

शरद पवार गटातील राष्ट्रवादीच्या पदाधिकार्‍यांचे लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी केले भाजपमध्ये स्वागत

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल मतदार संघात आमदार प्रशांत ठाकूरांनी केलेल्या विकासकामांवर आणि त्यांच्या कार्यप्रणालीवर …

Leave a Reply