Breaking News

कामोठे वसाहतीत महिला असुरक्षित

पायी चालत जाताना बॅग, चैन हिसकावल्याचे प्रकार ; दोन दिवसांत दोन घटना घडल्या

पनवेल : वार्ताहर

कामोठे वसाहतीतील 33 वर्षीय महिला रस्त्याने पायी आपल्या घरी जात असताना पाठीमागून आलेल्या चोरट्यांनी त्या महिलेची हातामधे असलेली बॅग हिसकावल्याची घटना कामोठे वसाहतीत घडली आहे. तर दुसर्‍याच दिवशी एका महिलेच्या गळ्यातील चैन व लॉकेट चोरून नेले आहे, मात्र कामोठेमधे बतावणी, फसवणूक व सोनसाखळीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले असल्याने नागरिक असुरक्षित असल्याच्या प्रतिक्रिया देत आहेत.

सेक्टर 22 येथील नीलकंठ ग्रीन येथे राहणारी 33 वर्षीय महिला आपल्या परिवारासह कामोठे वसाहतीत राहत आहे. त्या महिलेचे सेक्टर 21 येथे फॅमिली सलून पार्लर आहे. या वेळी नेहमीप्रमाणे आपले पार्लर बंद करून आपल्या घराकडे निघाल्या होत्या. त्या महिलेला रस्त्यामध्ये टीजेएसबी बँकेचे एटीएम दिसले, व त्या एटीएममध्ये पैसे टाकण्यासाठी गेल्या होत्या, त्यानंतर पुन्हा त्या घराकडे सेक्टर 22 येथील शिवनेरी सोसायटीजवळ आल्या. या वेळी त्यांच्या खांद्यावर ठेवलेली बॅग पाठीमागून आलेल्या दोन बाईकस्वार अज्ञात व्यक्तींनी हिसकावली व ते नौपाडा गावाकडे जाणार्‍या रस्त्याकडे पसार झाले. या वेळी त्या बॅगमध्ये मोबाइल फोन, सोन्याची साखळी, अंगठी, व इतर दागिने असे एकूण 54 हजार रुपये किमतीचे ऐवज चोरी झाल्याची तक्रार कामोठे पोलीस ठाण्यात करण्यात आली असून अधिक तपास पोलीस करीत आहेत.

काही दिवसांपूर्वी अशा अनेक घटना कामोठे वसाहतीत घडल्या आहेत. त्यामुळे येथील नागरिकांसह महिला असुरक्षित  असल्याच्या प्रतिक्रिया कामोठेकर देत आहेत. तर दुसर्‍या घटनेत 87,500 रुपये किमतीची एक सोन्याची चैन चोरली. कामोठेतील सेक्टर 18 येथे राहणारी 54 वर्षीय महिला रोज सकाळी पायी चालत जात असे. ही महिला नेहमीप्रमाणे भुमीरत्न को. ऑ. सोसायटी या बिल्डिंगबाहेर रस्त्यावर चालत जात असताना पाठीमागून अज्ञात दोन बाईकस्वार यांनी रस्त्यावर चालणार्‍या महिलेच्या गाळ्यात असलेली 87,500 रुपये किमतीची सोन्याची चैन व त्याला असलेला लॉकेट जबरदस्तीने खेचून घेऊन मानसरोवर रेल्वे स्टेशनकडे पसार झाले असल्याची घटना घडली आहे.

Check Also

उलवे नोड येथील शकुंतला रामशेठ ठाकूर स्कूलमध्ये विज्ञान प्रदर्शन उत्साहात

उलवे नोड ः रामप्रहर वृत्त रयत शिक्षण संस्थेच्या उलवे नोड येथील शकुंतला रामशेठ ठाकूर स्कूलमध्ये …

Leave a Reply