गेल्या पाच वर्षांपासून मी पनवेल महापालिका सभागृह नेता म्हणून काम करतो. नागरिकांच्यात जाऊन त्यांच्या समस्या समजून घेण्याचा प्रयत्न करतो. त्यांच्यासाठी कितीही काम केले तरीदेखील माझे समाधान होत नाही. अजूनही खूप काही करणं बाकी आहे, असंच मला वाटतं… अशी प्रामाणिक कबुली दिलीये पनवेल महापालिका सभागृह नेते परेश ठाकूर यांनी. आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांचे अनुभव, त्यांचे पनवेलच्या विकासाचे व्हिजन जाणून घ्यायचा आम्ही प्रयत्न केलाय…
आपल्या अनुभवावरून सांगताना परेश ठाकूर म्हणाले की, मुळातच आमच्या घरात समाजकारण आणि राजकारणाचा वारसा लाभला आहे. आमचे आजोबा माननीय जनार्दन भगत साहेब, लोकनेते रामशेठ ठाकूर साहेब यांची समाजकारणाची शिकवण मला लहानपणापासूनच मिळाली. रामशेठ ठाकूर हे रयत शिक्षण संस्थेसारख्या मोठ्या संस्थेत शिकल्यामुळे विवकासकामे करताना समाजहिताला प्राधान्य प्राधान्य आणि भविष्याचा विचार अशी मोठशिकवण त्यांच्याकर्डूीन मला मिळाली. रामशेठ ठाकूर साहेब नेहमी म्हणतात, ‘भीड ही भिकेची बहिण आहे’ त्यामुळे ज्या ज्या अनुभवी लोकांचा सहवास अनुभवण्याचा योग आयुष्यात येईल, त्यांच्याकडून नेहमी चांगल्या गोष्टी शिकाव्यात, त्यासाठी भीड बाळगू नये. त्यामुळे मी कायमच शिकावू वृत्ती ठेवून काम करतो आणि यामुळेच मी लोकांसाठी कितीही काम केलं तरीदेखील मला ते कमीच वाटतं. अजूनही खूप काम बाकी आहे.
पनवेलच्या विकासासाठी महापालिका निर्माण करण्याचा ज्यावेळी निर्णय घेण्यात आला, तेव्हापासूनच रामशेठ ठाकूर साहेब, आमदार प्रशांत ठाकूर साहेब यांच्या मार्गदर्शनाने सर्वच आवश्यक बाबींचा विचार करून आम्ही चर्चा करीत होतो. नागरिकांचे हक्क, सरकारची कर्तव्ये, पनवेल शहराचा विकास याबाबत चर्चा व्हायची. त्यामुळे त्या अनुषंशाने काय काम करता येईल याबाबत आम्ही बोलायचो. मी विद्यार्थी संघटनेत कायम केल्याने थोडा फार अनुभव होता. शहराची आवश्यकता, नागरिकांच्या अपेक्षा याबाबत माहिती होती. त्यामुळे महापालिकेची तयारी आधीपासूनच सुरू झाली होती. त्यानंतर जेव्हा मी नगसेवक म्हण्ाून निवडून आलो. भारतीय जनता पक्षात कॅडर बेसवर काम चालतं. सर्वांना सोबत घेऊन काम करण्याची शिकवणच भारतीय जनता पक्षाची आहे. त्यात लोकनेते रामशेठ ठाकूर, रविंद्र चव्हाण, नंदू पटवर्धनजी, जयंत पगडे, अरुणशेठ भगत साहेब, रविनाथ पाटील, रवी जोशी, ब्रिजेश ठाकूर यांच्यासारखे अनुभवी व जाणत्या नेत्यांची साथ लाभल्याने काम करताना अनेक गोष्टी नव्याने शिकायला मिळाल्या. त्याचप्रमाणे कोणताही निर्णय घेताना सर्वांशी चर्चा केली जाते. आमच्या सर्वांचेच म्हणणे ऐकून मगच निर्णय घेतला जातो. या सर्व मंडळींनी आमच्यावर कोणत्याही कामासाठी दबाव आणला नाही. त्यामुळे या सर्वांसोबतच काम करायला मला कायमच आनंद वाटतो, असेही परेश ठाकूर यांनी सांगितले.
पनवेल महापालिकेचे सभागृह नेते म्हणून काम करताना, आलेल्या अनेक आव्हानांविषयी सांगताना परेश ठाकूर पुढे म्हणाले की, सगळ्यात आधी पनवेलमध्ये वाढत असलेले अतिक्रमण आणि कामे करण्यासाठी लागणार्या मनुष्यबळाची कमतरता ही आव्हाने आमच्यासमोर उभी ठाकली होती. मुळातच एखादं बाळ जन्माला येतं, तेव्हा अनेक आव्हाने त्याच्या पालकांसमोर असतात. बाळाचे संगोपन, त्याचे आरोग्य, शिक्षण, त्याच्यावरील संस्कार या सर्व आव्हानांना पालकांना समोरे जावे लागते. हीच सर्व परिस्थिती आम्ही पनवेल महापालिका झाल्यानंतर अनुभवली. अतिक्रमाच्या बाबतीत महापालिकेचे पहिले आयुक्त सुधाकर शिंदे यांनी खूप चांगले कामे केले. त्यानंतर मनुष्यबळाची कमतरता दूर करण्यासाठी नंतर आलेले आयुक्त गणेश देशमुख यांनी खूप चांगले काम केले. अनेक वेळेला आमच्या ज्येष्ठ नेत्यांच्या कोअर कमिटीने आम्हांला वेळोवेळी मार्गदर्शन केले. त्यांच्यामुळे ही कामे करून घेण्यात अडचणी आल्या नाहीत, असेही त्यांनी सांगितले.
कोरोनामुळे अनेक गोष्टींना फटका बसला. त्यातील मालमत्ता कर आहे. म्हणजे ज्यावेळी हा कर लागू करण्याचे ठरले त्याचवेळी विधानसभा आणि लोकसभा निवडणुका आल्या. ती संपता संपता, म्हणजे नवीन आर्थिक वर्षात म्हणजेच 1 एप्रिल 2020 ला कर लागू करावा, असा विचार सुरू असतानाच, त्याआधीच म्हणजेच 21 मार्च रोजी कोरोनामुळे लॉकडाऊन जाहीर झाला. त्यामुळे सर्व यंत्रणा कोरोनाविरोधातील लढाईत काम करीत होती. त्याचप्रमाणे कोरोनाच्या कठीण काळात पनवेलच्या जनतेवर आर्थिक भार देणं आम्हाला योग्य वाटलं नाही. त्यामुळे त्यानंतरही दोन वर्षांचा कालावधी गेला. त्यानंतर आम्ही मालमत्ता कर लागू करून नागरिकांना विविध सवलती देण्यात आल्या मात्र काही विरोधकांनी, सर्व नाही, काही विरोधी नगरसेवकांनी याला विरोध केला, कारण त्या लोकांनी फक्त आजचा विचार केला. भविष्याचा विचार केला नाही मात्र सर्वांनी विरोध केला नाही. आपला विरोधी पक्ष समजूतदार आहे, असेही परेश ठाकूर यांनी आवर्जून नमूद केले.
सिडकोने वसविलेल्या वसाहतीतील नागरिकांच्या समस्यांबाबत बोलताना परेश ठाकूर म्हणाले की, अजूनही अनेक सुविधांसाठी सिउकोकडून महापालिकेला हस्तांतरण होणे अपेक्षित होते ते झालेले नाही. त्यामुळे महापालिकेला सिडको वसाहतीतील नागरिकांना सेवा द्यायला अडचणी येतात. सिडकोने महापालिकेला 550 प्लॉट हस्तांतरीत करणे अपेक्षित असताना त्यापैकी केवळ 150 प्लॉट सिडकोने महापालिकेला हस्तांतरीत केले आहेत. त्यामुळे महापालिका याठिकाणी केवळ आरोग्यविषयक सुविधा आणि अतिक्रमणे याच गोष्टींकडे लक्ष देऊ शकते. त्यामुळे जनता ही सिडकोच्या सेवेवर नाखूष असते. सिडको वसाहतीत सर्वात महत्त्वाचा पाणी प्रश्न सिडकोने तातडीने सोडविण्याची गरज आहे. या ठिकाणी अपुरा पाणीपुरवठा होत असल्याने आम्ही अनेक वेळा आंदोलने केली, बैठका घेतल्या, मोर्चे काढले तरीदेखील सिडको प्रशासनाला जाग येत नाही याचे मला आश्चर्य वाटते. पनवेलमध्ये दिवसेंदिवस वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन सिडकोने उपलब्ध पाण्याचे योग्य नियोजन करून वितरण करणे गरजेचे आहे, मात्र सिडको 2011च्या जनगणनेवरून पाणी वितरण करते. त्यामुळे नागरिकांना अपुरा पाणीपुरवठा होतो. असे असतानाही सिडको नव्याने वसाहती निर्माण करीत आहे, त्यांना किमान सुविधा कशा पुरविणार? याचे उत्तर मात्र सिडकोने आजपर्यंत दिलेले नाही. सिडकोकडून अपेक्षित सहकार्य महापालिकेला मिळत नाही.
सिडको नागरिकांना किमान सोयीसुविधाही पुरवित नसल्याने नागरिक सिडकोवर नाखूष आहेत. या सर्व प्रकारामुळे कर भरण्याबाबत जनतेच्या भावनांचा चुकीच्या पद्धतीने वापर काही विरोधक करीत असतील तर जनतेचा काहीच दोष नाही असे मला वाटते. आम्ही सातत्याने पाठपुरावा करून सिडकोकडून आत्ता रस्त्यांची कामे करण्यास भाग पाडले आहे. ज्यावेळी आमदार प्रशांत ठाकूर हे सिडकोचे चेअरमन होते त्यावेळी त्यांनी अधिकार्यांवर दबाव आणून कामे करून घेतली. महापालिकेच्या वतीने सध्या शहरात विविध प्रकारची विकासकामे सुरू आहेत. लोकांना जर चांगली सेवा मिळाली तरच त्यांना कर भरण्यास काही वाटणार नाही. त्यामुळे लोकांना चांगल्या सुविधा देण्याचा प्रयत्न आम्ही महापालिकेच्या माध्यमातून करीत आहोत. नागरिकांचे अनेक प्रश्न सोडविण्यात आम्ही यशस्ची झालो आहोत मात्र असे काही प्रश्न असतात जे सोडविण्यास वेळ लागतो. तेदेखील सोडविण्याचा प्रयत्न आम्ही रामशेठ ठाकूर साहेब व आमदार प्रशांत ठाकूर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली करीत आहोत, असे परेश ठाकूर यांनी सांगितले.
आता पुढील काही महिन्यांत महापालिका निवडणुका होणार असून त्या अनुषंगाने निवडणुकांच्या अनुषंगाने पाण्याचे विशेष नियोजन करण्याबाबत काही आराखडा आहे का, असे विचारले असता परेश ठाकूर यांनी सांगितले की, पाण्याच्या नियोजनासाठी सिटी डेव्हलपमेंट प्लान 2043 तयार करण्यात आला आहे. न्हावा शेवा पाणीपुरवठा योजनेसाठी आम्ही राज्य सरकारवर दबाव आणण्याचा प्रयत्न करणार आहोत कारण जर ही योजना अंमलात आली तर पुढील पाच ते 10 वर्षे तरी नागरिकांना पाणीटंचाई भेडसावणार नाही. त्यामुळे ही योजना लवकरात लवकर अंमलात आणण्यासाठी आम्ही आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य सरकारमधील मंत्र्यांची भेट घेऊन पाठपुरावा करणार असल्याची ग्वाही त्यांनी शेवटी दिली.
(मल्हार टीव्हीच्या खबरबातसाठी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्याशी विजय पवार यांनी केलेली ही बातचीत…)