पोलादपूर : प्रतिनिधी
पहिल्या आणि दुसर्या कोरोना प्रतिबंधक डोसनंतर आता तिसर्या बूस्टर डोसला पोलादपूर शहरात चांगलाच प्रतिसाद मिळू लागला आहे. मंगळवारी (दि. 19) शहरातील स्वामी कवींद्र परमानंद मठगल्ली येथून बूस्टर डोसची सुरुवात झाली. पोलादपूर ग्रामीण रुग्णालयाच्या माध्यमातून आयोजित केलेल्या कोविड लसीकरण शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. गेल्या वर्षीदेखील स्वामी कवींद्र परमानंद मठगल्ली येथे कोविड लसीकरण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सिनचा पहिला व दुसरा डोस या शिबिरामध्ये देण्यात आला होता. यानंतर मंगळवारी आयोजित करण्यात आलेल्या शिबिरात तिसरा बूस्टर डोस देण्यात आला. या शिबिरामध्ये पोलादपूर शहरातील मुख्यत: मठगल्ली आणि बाजारपेठ येथील व्यापारी तसेच महिला व ज्येष्ठ नागरिकांसह सुमारे दिडशे नागरिकांनी लसीकरण करून घेतले. पोलादपूर ग्रामीण रुग्णालयाच्या अधीक्षक डॉ. भाग्यरेखा पाटील व डॉ.राजेश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली अधिपरिचरिका स्वप्नाली गांधी व परिचारिका अश्विनी चिपळूणकर यांनी नागरिकांचे लसीकरण केले.