पेण : प्रतिनिधी
आ. संजय केळकर व पेण अर्बन बँकेच्या ठेवीदार संघर्ष समितीच्या पदाधिकार्यांनी सह्याद्री अतिथीगृहामध्ये केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांची भेट घेऊन ठेवीदारांचे प्रश्न मार्गी लावावे असे निवेदनाद्वारे मागणी केली. अनेक वर्ष आंदोलने, धरणे, उपोषणे करूनही ठेवीदारांना न्याय मिळत नव्हता राज्य स्तरावर देखील बैठका घेण्यात आल्या होत्या, परंतु ठेवीदारांना अपेक्षित न्याय मिळाला नाही, त्या अनुषंगाने आमदार संजय केळकर यांनी नुकतीच केंद्रीय अर्थमंत्री डॉ. भागवत कराड यांच्याकडे ठेवीदारांच्या व्यथा मांडल्या यावेळी संघर्ष समितीचे कार्याध्यक्ष नरेंद्र जाधव, पेणच्या नगराध्यक्षा प्रीतम पाटील, नगरसेवक अजय क्षीरसागर, नगरसेविका शहनाज मुजावर व दिनेश गायकवाड आदी उपस्थित होते.
सुरुवातीपासूनच ठेवीदारांच्या लढ्याचे नेतृत्व करणारे आ. केळकर यांनी सविस्तर व तपशीलवार माहिती केंद्रीय राज्यमंत्री भागवत कराड यांना दिली. उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाबाबत देखील वस्तुस्थिती निदर्शनास आणून दिली. सदरची बँक लिक्विडेशनमध्ये नसल्याने मोर्द सरकारने सुरु केलेली पाच लाखापर्यंतचे सुरक्षाठेव योजना याही ठेवीदारांना लागू करण्याबाबत आग्रही मागणी केली.
सदरची मागणी मान्य करून ठेवीदारांना 5 लाखापर्यंत सुरक्षा योजना तत्काळ देण्याबाबत वरिष्ठ स्तरावर कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून तशा प्रकारचे आदेश दिले जातील असे आश्वासन केंद्रीय राज्य अर्थमंत्र्यांनी आ. संजय केळकर यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाला दिले. तसेच रायगड जिल्हाधिकार्यांनी यासंबंधातील प्रलंबित प्रश्न तातडीने मार्गी लावावेत असे आदेश देखील डॉ. कराड यांनी रायगड जिल्हाधिकार्यांना दुरध्वनीद्वारे दिले. केंद्रीय अर्थ राज्यमंत्री यांनी ठेवीदारांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी निर्णायक व सकारात्मक भूमिका घेऊन न्याय देण्याचा प्रयत्न केला त्याबाबत आ. केळकर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने समाधान व्यक्त केले. तसेच याप्रकरणी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची लवकरच आमदारांचे शिष्टमंडळ भेट घेणार असल्याची माहिती संघर्ष समितीचे अध्यक्ष नरेन जाधव यांनी दिली.