Breaking News

पाण्यासाठी महिला आक्रमक

नेरळ ग्रामपंचायतीची ग्रामसभा गाजली; ज्येष्ठ नागरिकाचा आत्मदहनाचा इशारा

कर्जत : बातमीदार

नेरळ ग्रामपंचायतीची महाराष्ट्र दिनानिमित्त आयोजित केलेली ग्रामसभा विविध विषयांनी गाजली. ग्रामसभेत महिलांनी ग्रामपंचायतीला पिण्याच्या पाण्यावरुन धारेवर धरले, तर उपोषण करून आठ महिने झाल्यानंतरदेखील आश्वासनांची पूर्तता केली नसल्याने ज्येष्ठ नागरिक माधव गायकवाड यांनी आत्मदहन करण्याचा इशारा दिला. दरम्यान, वाढते नागरीकरण लक्षात घेता नेरळ ग्रामपंचायतीची नगरपालिका करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी करून तो ठराव मंजूर केला.

ग्रामसभा सुट्टीच्या दिवशी आयोजित न करता कार्यालयीन कामाच्या दिवशी आयोजित करण्याचे आदेश असल्याने, नेरळ ग्रामपंचायतीची ग्रामसभा सुट्टीच्या दिवशी नसतानाही तिला गर्दी झाली होती. सरपंच जान्हवी साळुंखे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आलेल्या या ग्रामसभेला जिल्हा परिषद सदस्या अनसूया पादिर, कर्जत पंचायत समिती सदस्य सुजाता मनवे, नेरळचे उपसरपंच अंकुश शेळके, ग्रामपंचायत सदस्य केतन पोतदार, सदाशिव शिंगवा, राजेश मिरकुटे, प्रथमेश मोरे, अश्विनी पारधी, मीना पवार, ग्रामविकास अधिकारी राजेंद्र गुडदे आदींसह ग्रामस्थ आणि अधिकारी उपस्थित होते.

या वेळी नेरळ पूर्व भागातील महिलांनी कमी दाबाने होणार्‍या पाणी पुरवठ्याबाबत जाब विचारला, त्यांना मोहाचीवाडी भागातील महिलांनी साथ दिली. त्यावेळी ग्रामपंचायतीकडून, पाणी गळती आणि रस्त्यांची कामे करताना जमिनीत पाणीपुरवठा करणार्‍या पाईपलाईन लिकेज असल्याने दररोज 20 तास पाणी उचलून देखील पाणी सर्व भागात पोहोचू शकत नाही, अशी बाजू मांडण्यात आली. त्यानंतर वाढत्या नागरीकरणामुळे या ग्रामपंचायतीचे  नगरपालिकेत रुपांतर करावे, असा ठराव जिल्हा परिषदेचे माजी सदस्य सावळाराम जाधव यांनी मांडला, तो सर्वानुमते मंजूर करण्यात आला. 

रोहिदास मोरे यांनी पाणी टाकी येथे असलेली 122 गुंठे जमीन कधी ताब्यात घेणार? असा प्रश्न उपस्थित केला. नेरळ टॅक्सी स्टॅन्ड भागात माथेरानला जाण्यासाठी पर्यटन येतात, तेथील मच्छीमार्केटमुळे पर्यटक नाकाला रुमाल लावून उभे असतात, त्यामुळे टॅक्सी चालकांच्या व्यवसायावर परिणाम होतो. त्यामुळे तेथे असलेले मच्छीमार्केट इतरत्र हलवावे, अशी मागणी रिक्षा संघटनेचे अध्यक्ष प्रवीण पोलकम यांच्यासह अन्य टॅक्सी चालक असलेल्या ग्रामस्थांनी केली.

नेरळ गावातील 10 ज्येष्ठ नागरिकांनी मागील वर्षी उपोषण केले होते. ते उपोषण सोडताना विविध 13 विकासाचे प्रश्न आम्ही सोडवू, असे आश्वासन नेरळ ग्रामपंचायतीने दिले होते, मात्र त्यातील एकही मागणी पूर्ण झाली नसल्याने आपण आत्मदहन करू, असा इशारा ज्येष्ठ नागरिक माधव गायकवाड यांनी या ग्रामसभेत दिला.

या ग्रामसभेत नेरळ ग्रामपंचायतीमधील कर्मचारी भरती बेकायदा असल्याची ओरड अनेक ग्रामस्थांनी केली.

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply