महाराष्ट्रातील सगळ्या समस्या संपुष्टात आल्या असून सर्वत्र आलबेल आहे आणि अयोध्येला कोण जाणार आणि कोण जाणार नाही, एवढाच एकमेव प्रश्न उरला असल्याचे चित्र सध्या निर्माण झाले आहे. प्रकृतीच्या कारणास्तव राज ठाकरे यांनी आपला अयोध्या दौरा तूर्तास स्थगित केला असला तरी लवकरच तो व्यवस्थितपणे पार पडेल यात शंका नाही. देवाचे दर्शन कोणीही, कुठेही घेऊ शकते. महाराष्ट्रातील भाजप नेत्यांनी हीच भूमिका वेळोवेळी बोलून दाखवली आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंग्यांचा प्रश्न उपस्थित करतानाच हनुमान चालिसा दुप्पट आवाजात लावण्याचा पर्याय दिला होता. राज यांचे हे आवाहन सर्वदूर पसरले. महाराष्ट्रातल्या छोट्यातल्या छोट्या गावापासून उत्तर प्रदेशात देखील हनुमान चालिसाचे सूर दुमदुमू लागले. त्याच सुमारास राज यांनी लवकरच आपण अयोध्येचा दौरा करणार असल्याचे जाहीर केले होते. राज यांनी अचानक हिंदुत्वाची हाक दिली हा काही योगायोग नव्हे. महाविकास आघाडी सरकारमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून बसणार्या शिवसेनेची अवस्था अडचणीची झाली आहे. ज्यांच्या विरोधात आजवरच्या सर्व निवडणुका लढवल्या, हिंदुत्वाची भूमिका जोरकसपणे मांडली, त्यांच्यासोबत संसार थाटणार्या शिवसेनेला आपल्या वाट्याचे हिंदु मत गमावण्याची भीती निर्माण झाली. राज यांच्या अयोध्या दौर्याने त्यांची चांगलीच पंचाईत झाली होती. म्हणूनच पाठोपाठ पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी देखील आपली अयोध्या वारी जाहीर करून टाकली. भारतीय जनता पक्षाची बी टीम अशी मनसेची संभावना करण्यात महाविकास आघाडीचे नेते धन्यता मानत राहिले. परंतु प्रत्यक्षात उत्तर प्रदेशातील भाजपच्या नेत्यांनी राज यांच्या अयोध्या दौर्याला विरोधच केला. राज ठाकरे यांनी 5 जून रोजी होणारा आपला नियोजित अयोध्या दौरा तूर्तास स्थगित केला आहे. आदित्य ठाकरे हे 15 जून रोजी अयोध्येला जाण्याच्या बेतात आहेत. काही वर्षांपूर्वी राज यांनी मुंबईमध्ये उत्तर भारतीयांविरोधात आंदोलन छेडले होते. त्यामुळेच त्यांच्या अयोध्या दौर्याला उत्तरेतील नेत्यांनी अडसर घातला. परंतु श्री रामलल्लाच्या दर्शनाला अशी आडकाठी करता येणार नाही ही भूमिका विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी वेळोवेळी जाहीररित्या बोलून दाखवली आहे. अयोध्या दौर्याबाबत आपला राजकीय वापर होत आहे याचे भान राज यांनी ठेवले पाहिजे अशी टीका शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत यांनी केली. त्याला तसा काही अर्थ नाही. खुद्द राऊत यांचाच सर्वाधिक गैरवापर महाविकास आघाडीतील कुठला पक्ष करीत आहे हे सार्यांनाच ठाऊक आहे. त्यामुळे असल्या सवंग टीकाटिप्पणीकडे लक्ष देण्याची गरज नाही. महाराष्ट्रातील राजकारणाच्या मुख्य प्रवाहात परतण्याची आणखी एक संधी मनसेला या निमित्ताने मिळालेली दिसते. हिंदुत्वाची कास सोडून दिल्यानंतर शिवसेनेची अवस्था राजकीयदृष्ट्या अडचणीची झाली असून आगामी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत त्याचे स्पष्ट चित्र बघायला मिळेल. शिवसेनेची मुंबईवरील पकड सोडवण्यासाठी मनसेने भाजपला अनुकूल अशी भूमिका घेणे हिताचे ठरेल असे वाटते. अन्यथा देखील राज ठाकरे यांच्या प्रस्तावित अयोध्या दौर्याला कुणाचा विरोध असण्याचे काही कारण नाही. बाकी पक्षांच्या अयोध्यावारीला कुठलेच महत्त्व नाही, ते आले काय आणि गेले काय दोन्ही सारखेच.