कडाव : वार्ताहर : 33 मावळ लोकसभा मतदारसंघाची देशाची 17वी निवडणूक जशी जवळ येऊ लागली तसा स्थानिक पातळीवरील जिल्हा परिषद व पंचायत समिती वॉर्डमध्ये बैठका आणि प्रचार यंत्रणेला चांगलाच रंग भरलेला पाहावयास मिळत आहे.
मावळ लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांच्या प्रचारासाठी कर्जत विधानसभा मतदारसंघातील सावेळे जिल्हा परिषद वॉर्डमध्ये लोकसभेचे सावेळे जिल्हा परिषद विभागाचे प्रचारप्रमुख उत्तम कोळंबे यांच्या नेतृत्वाखाली महायुतीच्या कार्यकर्त्यांनी प्रचारासाठी मोठ्या संख्येने हजेरी लावून जोरदार शक्तिप्रदर्शन केले. याप्रसंगी शिवसेनेचे तालुका संघटक राजेश जाधव यांनी प्रचार यंत्रणेत उपस्थित कार्यकर्त्यांना संबोधित करताना सांगितले की, गेली अनेक वर्षे देशाचे आणि राज्याचे हित करायचे सोडून फक्त स्वतःचा स्वार्थ साधणार्यांना या वेळी संधी न देता गेल्या पाच वर्षांत देशाचे हित करण्यासाठी दिवसरात्र काम करणार्या नरेंद्र मोदी यांना पुन्हा एकदा पंतप्रधान करायचे आहे. त्यातच देशाचे व आपले हित आहे. अशा पद्धतीने काम करणारे आपले उमेदवार श्रीरंग बारणे यांना मोठ्या मताधिक्क्याने पुन्हा एकदा संसदेत पाठवायचे आहे. त्यासाठी जोरदारपणे काम करा, असे त्यांनी सांगितले.
सावेळे जिल्हा परिषद वॉर्डमध्ये प्रचार सभेला जोरदार सुरुवात झाली. त्यामध्ये पिंपळोली पंचायत समितीच्या पिंपळोली आणि वाकस ग्रामपंचायतीमध्ये महायुतीच्या प्रचारात कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली. रविवारी सकाळी 11 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत सावेळे जिल्हा परिषद वॉर्डमध्ये महायुतीतील शिवसेना, भाजप व आरपीआय या मित्रपक्षांच्या प्रचार यंत्रणेत उपतालुकाप्रमुख बाबू घारे, जिल्हा परिषद सदस्य साहरा कोळंबे, कर्जत विधानसभा सोशल मीडियाचे अध्यक्ष विलास श्रीखंडे, भाजपचे जिल्हा परिषद अध्यक्ष अंकुश मुने, मिलिंद विरले, नितीन धुळे, पांडुरंग बागडे, गुरुनाथ सोनावले, वामन विर्ले, राजन मसणे, भालचंद्र श्रीखंडे, रघुनाथ कोळंबे, महेश माळी, विनायक मार्के, बाळू डायरे, दिनेश मसणे, दीपक काळण, राजाराम डायरे आदी पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.