Breaking News

पुनरागमनायच…

यंदा अनंत चतुर्दशीच्या दिवशीच मुस्लिम बांधवांचा ईद-ए-मिलादचा सण आला आहे. मुस्लिम बांधवांच्याही मिरवणुका या दिवशी निघतात. गर्दीचे नियंत्रण थोडेतरी सुलभ व्हावे यादृष्टीने ईदची सुटी 29 तारखेला द्यावी अशी विनंती पोलीस दलानेच केल्यामुळे राज्य सरकारने अनंत चतुर्दशीच्या दुसर्‍या दिवशीही शासकीय सुटी जाहीर केली आहे. समाजामध्ये बंधुभाव आणि एकोपा वाढावा यासाठीच हे पाऊल उचलण्यात आले आहे हे उघड आहे.

दहा दिवसांच्या मंगलमय मुक्कामानंतर गणपतीबाप्पा अनंत चतुर्दशीच्या दिवशी सालाबादप्रमाणे गावाला जातील आणि आपल्याला मात्र चैन पडणार नाही. ‘गणपतीबाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’ असे साकडे सारे भक्तगण त्यांना आग्रहाने घालतात आणि भक्तांच्या प्रेमाग्रहामुळे श्रीगणराय पुढच्या वर्षी परत येतात. गेली हजारो वर्षे ही परंपरा सुरू आहे. राज्यभरातील जनसामान्यांच्या घरात बाप्पा विराजमान असतात. कुणाकडे दीड दिवस तर कुणाकडे पाच किंवा सात दिवस त्यांचा मुक्काम असतो. शास्त्रार्थानुसार अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणरायाचे विसर्जन करण्याची प्रथा आहे. महर्षी वेदव्यास यांनी महाभारताचे लिखाण करण्यासाठी गणपतीबाप्पाला राजी केले. बुद्धीची देवता असलेला बाप्पासारखा लेखनिक एवढ्या मोठ्या कामासाठी आवश्यकच होता. मात्र विघ्नहर्त्याने होकार देतानाच महर्षी वेदव्यासांना अट घातली की महाभारताचे लिखाण सलग आणि सतत होईल. तुमच्या वाणीचा ओघ थांबला की माझी लेखणी थांबेल. वेदव्यासांनी संमती देऊन भाद्रपदातील चतुर्थीच्या दिवशी महाभारत सांगण्यास प्रारंभ केला. दहा दिवसांनी म्हणजेच अनंत चतुर्दशीच्या दिवशी हे लेखनकार्य पूर्ण झाले. महर्षी वेदव्यासांनी डोळे उघडले तेव्हा दैवी ऊर्जेमुळे गणपतीबाप्पांचा देह प्रचंड तापला होता. वेदव्यासांनी घाईघाईने त्यांना नदीवर नेऊन, अंगावर पाणी ओतून तो प्रतिभेचा दाह शांत केला. म्हणूनच अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणपतीबाप्पाचे जलाशयामध्ये विसर्जन करण्याची प्रथा पडून गेली, अशी पौराणिक कथा सांगितली जाते. अनंत चतुर्दशीच्या दिवशी महाराष्ट्रातील शहरांशहरांमधून सार्वजनिक गणेशोत्सव संपताच लहानमोठ्या मूर्तींचे वाजतगाजत मिरवणुकीने विसर्जन केले जाते. मुंबईतील विसर्जनाची मिरवणूक जगभरात गाजली आहे. बीबीसी, सीएनएनपासून अनेक आंतरराष्ट्रीय वाहिन्या मुंबईतील गणेश-विसर्जनाच्या मिरवणुकीचे आवर्जून वृत्तांकन करतात. लाखो भक्तगणांचा जमाव गणपतीबाप्पांच्या महाकाय मूर्तींसोबत समुद्रापर्यंत निरोप द्यायला जातो. मध्यम आकाराच्या बोटींच्या साह्याने श्रीगणरायाच्या मूर्ती समुद्रात आतवर नेऊन विसर्जित केल्या जातात. पुण्यातील गणेश-विसर्जनाची मिरवणूक दुसर्‍या दिवशीपर्यंत चालते. या मिरवणुकांवर देखरेख ठेवताना आणि गर्दीचे नियंत्रण करताना पोलीस दलाची क्षमता पणाला लागते. बहुतेक सर्व पोलिस दल या काळात दिवसरात्रीचा विचार न करता राबत असते. खरे तर या पोलिस बांधवांबद्दल आपण सार्‍यांनीच कृतज्ञ राहिले पाहिजे. त्यांच्या परिश्रमामुळेच अनंत चतुर्दशीच्या दिवशी मिरवणुका शांततेत पार पडतात. त्यांना धन्यवाद द्यावेत तितके थोडेच आहेत. जोडून आलेल्या सुट्यांमुळे यावेळची आठवडाअखेर दीर्घ सुटीची असणार आहे. अनंत चतुर्दशी, ईद-ए-मिलाद, शनिवार-रविवार जोडून सोमवारची गांधी जयंती अशा सलग सुटीमुळे बाहेरगावी जाण्याचे बेत ठरवले जातील. तथापि याच कारणामुळे रस्त्यांवर आणि सार्वजनिक वाहतुकीवर प्रचंड मोठा ताण येणार आहे हेदेखील ध्यानात ठेवले पाहिजे. पुढील वर्षी बाप्पा खरोखरीच थोडासा लवकर येणार आहे. यंदा अधिक मासामुळे त्याचे आगमन थोडे लांबले होते. पुढल्या वर्षी सर्वांचा लाडका गणपतीबाप्पा लवकर येणार या सकारात्मक भावनेनेच त्याला निरोप देऊया…

Check Also

उरण विधानसभा मतदारसंघातील रस्त्यांचा होणार विकास

आमदार महेश बालदी यांच्या मागणी व पाठपुराव्याने 40 कोटी रुपयांच्या कामाला प्रशासकीय मान्यता उरण ः …

Leave a Reply