नवी मुंबई : रामप्रहर वृत्त
देशभर टोमॅटोचे उत्पादन घटल्यामुळे बाजारभाव वाढू लागले आहेत. मुंबई बाजार समितीमध्ये टोमॅटोचे दर 40 ते 80 रुपयांवर पोहोचले असून, किरकोळ मार्केटमध्येही भाव 90 ते 100 रुपये झाले आहेत.
भाजीपाल्यामध्ये सर्वाधिक मागणी असलेल्या टोमॅटोची असते. मुंबईकरांच्या आवडीची पावभाजी, सॅलॅड व सर्वसामान्य नागरिकांच्या आहारातही टोमॅटोची भाजी नियमित केली जाते. त्यामुळे वर्षभर टोमॅटोची मोठ्या प्रमाणात मागणी असते. मुंबईत सातारा, पुणे, नाशिकसह दक्षिणेतील राज्यांमधूनही टोमॅटोची आवक होत असते; परंतु पंधरा दिवसांपासून कर्नाटक, आंध्र प्रदेश, तामिळनाडूमध्ये टोमॅटोची कमतरता निर्माण झाली आहे. तेथेही महाराष्ट्रातून टोमॅटो पाठविला जात आहे. मागणीच्या तुलनेत उत्पादन कमी होत असल्यामुळे बाजारभाव वाढू लागले आहेत. मुंबई बाजार समितीमध्ये एक महिन्यापूर्वी 14 ते 22 रुपये किलो दराने टोमॅटो विकला जात होता.
एक आठवड्यापूर्वी हे दर 25 ते 60 रुपये झाले व सोमवारी बाजारभाव 40 ते 80 रुपयांवर गेले आहेत. किरकोळ मार्केटमध्ये 90 ते 100 रुपये दराने टोमॅटोची विक्री होत असून, त्यामध्ये अजून वाढ होण्याची शक्यता आहे.