Breaking News

लोकल प्रवासासाठी भाजप आक्रमक

मुंबई, ठाण्यात आंदोलन

मुंबई, ठाणे : प्रतिनिधी
सर्व सामान्यांसाठी मुंबई लोकल सुरू व्हावी या मागणीसाठी आता भाजपने आक्रमक भूमिका घेतली आहे. राज्यात कोरोनाची दुसरी लाट ओसरल्यानंतर अनेक निर्बंध शिथिल झाले आहेत, मात्र मुंबईची लाइफलाइन असलेली लोकल ट्रेन अद्यापही बंद आहे. त्यामुळे मुंबई व आसपासच्या शहरातील नोकरदारांची पुरती कोंडी झाली आहे. राज्य सरकार लोकलचा निर्णय सातत्याने पुढे ढकलत असल्याने भाजपने रस्त्यावर येऊन शुक्रवारी (दि. 6) आंदोलन केले.
मुंबई व ठाण्यात भाजप नेते व कार्यकर्त्यांकडून महाविकास आघाडी सरकार विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्या नेतृत्वाखाली चर्चगेट रेल्वे स्थानकात, तर आमदार अतुल भातखळकर यांच्या नेतृत्वाखाली कांदिवली रेल्वे स्थानकात आंदोलन करण्यात आले. दोन डोस घेतलेल्या लोकांना प्रवास करू द्यावा, अशी मागणी आंदोलकांनी या वेळी केली. लसीकरण केल्यानंतर विमान, एसटी, बेस्ट, रिक्षा, टॅक्सी यातून प्रवास करण्यास परवानगी आहे, मग लोकलमध्ये का नाही, असा प्रश्न उपस्थित करत लोकलमुभा मिळेपर्यंत सविनय कायदेभंग सुरूच ठेवणार, असा इशारा प्रवीण दरेकर यांनी दिला.
ठाणे रेल्वे स्थानकातही भाजपने आंदोलन केले. ठाणे भाजप अध्यक्ष व आमदार अ‍ॅड. निरंजन डावखरे, आमदार संजय केळकर यांच्या नेतृत्वाखाली भाजपचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने रेल्वे स्थानकात जमले. रेल्वे आमच्या हक्काची, नाही कुणाच्या बापाची, लोकल सुरू करा, अशा घोषणा देत भाजप कार्यकर्त्यांनी रेल्वे स्थानकाचा परिसर दणाणून सोडला.
आंदोलनादरम्यान पोलिसांनी भाजपच्या काही कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. चर्चगेट, दहिसर घाटकोपर या ठिकाणीही आंदोलन करण्यात आले.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून एक कोटी 35 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदार संघातील ग्रामिण भागात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली …

Leave a Reply