Breaking News

फ्लेमिंगोंच्या मुक्कामाने मच्छीमार अडचणीत

 किनार्‍यावर सहज सापडणार्‍या छोट्या मासळीची टंचाई

नवी मुंबई : रामप्रहर वृत्त

थव्यांच्या रूपात खाडीमध्ये श्वेत-गुलाबी रंगाची चादर पसरवणार्‍या फ्लेमिंगो अर्थात रोहित पक्ष्यांच्या दर्शनासाठी नवी मुंबई हे महत्त्वाचे ठिकाण बनत आहे. पुरेसे खाद्य आणि जैवविविधता मिळत असल्याने फ्लेमिंगोंचा यंदा मुक्कामही वाढला आहे, मात्र हा लांबलेला अधिवास नवी मुंबईतील मच्छीमारांच्या खिशाला कात्री लावू पाहात आहे.

नवी मुंबईतील खाडीकिनारी उथळ पाण्यात सहज सापडणार्‍या पातळी, झिंगा, तुडतुडी, कोलमी यांसारख्या मासळी आणि त्यांच्या अंड्यांवर फ्लेमिंगो यथेच्छ ताव मारत असल्याने मच्छीमारांच्या जाळ्यात ही मासळी सापडेनाशी झाली आहे. त्यामुळे कमाईचे साधन हरवत असल्याचे मच्छीमारांचे म्हणणे आहे.

मुंबई, उरण येथील खाडीकिनारी हिवाळ्याच्या दिवसांत स्थलांतर करणारे फ्लेमिंगो पक्षी गेल्या काही वर्षांत नवी मुंबईतील नेरूळ, वाशी, बेलापूर येथील खाडीकिनार्‍याला पसंती देत आहेत. या ठिकाणी गेल्या काही वर्षांत हजारोंच्या संख्येने फ्लेमिगोंनी अधिवास केल्याचे आढळून येत आहे. यंदा हे प्रमाण आणखी वाढले आहे. इतकेच नव्हे तर, साधारण मार्चनंतर आपल्या मूळ अधिवासाकडे प्रयाण करणार्‍या फ्लेमिंगोंनी मे महिना आला असतानाही मुक्काम कायम ठेवला आहे.

फ्लेमिगोंचा मुक्काम लांबल्याने पक्षीप्रेमी आणि पर्यटकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे, मात्र स्थानिक मच्छीमार मात्र हैराण झाले आहेत. पाणथळ आणि खाडीकिनारी आढळणार्‍या छोट्या मासळी, त्यांची अंडी, किडे यावर ताव मारणार्‍या फ्लेमिंगोंमुळे मच्छीमारांना ही छोटी मासळी मिळेनाशी झाली आहे.  ओहोटीच्या जागी मिळणारी पातळी, झिंगा, तुडतुडी, कोलमी यांसारखी मासळी गायब झाल्याचे कोळी समुदायातील काही नागरिकांनी सांगितले.

ठाणे खाडीकिनारी फ्लेमिंगो पक्षी मोठ्या प्रमाणात दिसून येत आहेत. फ्लेमिंगो पक्ष्यांचे दर्शन नयनरम्य वाटते, मात्र या पक्ष्यांमुळे अलीकडे खाडीकिनारी मिळणारी छोटी मासळी मिळेनाशी झाली आहे. याचा आम्हा मच्छीमारांना मोठा फटका बसतो.

-जयंता कोळी, मच्छीमार, दिवाळे

Check Also

पिक्चर सुपर हिट; पुष्पा 2चे यश काही वेगळेच

सामाजिक, सांस्कृतिक वातावरण असे आहे की तुम्ही पुष्पा2च्या जाळ्यात सापडला आहात अथवा वावरताहात…लोकप्रियतेची जणू अक्राळविक्राळ …

Leave a Reply