Breaking News

घोडदौडीतील आठ वर्षे

बरोबर आठ वर्षांपूर्वी याच सुमारास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भारतीय जनता पक्षाचे सरकार केंद्रात स्थानापन्न झाले होते. गेल्या आठ वर्षांत पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले आहे. परंतु पंतप्रधान मोदी यांच्या लोकप्रियतेचा ओघ पवित्र गंगेप्रमाणे वाढत गेलेला दिसला. मोदी सरकारच्या आठव्या वाढदिवशी देशभरात फार काही उत्सव वा समारंभ झाले नाहीत. परंतु भारतीय जनता पक्ष आणि नरेंद्र मोदी यांच्यावर तोंडसुख घेऊन काँग्रेसने मात्र हा वाढदिवस साजरा केला.

पंतप्रधानपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर मोदी यांनी संसदेच्या पायर्‍यांवर मस्तक टेकविले होते, तो भावपूर्ण क्षण भारताची जनता आजही विसरलेली नाही. गेल्या आठ वर्षांत मोदी सरकारने जनहिताचे अनेक निर्णय घेतले. काँग्रेस राजवटीने वारशात दिलेला भ्रष्टाचाराचा आगडोंब, सरकारी तिजोरीतील खडखडाट आणि धोरणाअभावी भरकटलेली नोकरशाही यामुळे सत्तेवर नव्याने आलेल्या मोदी सरकारपुढील आव्हाने डोंगराएवढी होती. जगाच्या बरोबरीने चालायचे असेल तर भारतीय अर्थव्यवस्थेला आता धावावे लागेल हे ओळखून पंतप्रधान मोदी यांनी धडाधड निर्णय घेतले. अर्थ व्यवस्थेला वेगाने रूळावर आणले. सरकारी तिजोरीतील पैसा हा जनतेचाच असतो, त्यातील पै आणि पै जनतेसाठीच खर्च व्हायला हवी या इराद्याने स्वच्छ कारभार करून दाखवला. गेल्या आठ वर्षांत मोदी सरकारच्या एकाही मंत्र्याविरोधात भ्रष्टाचाराची तक्रार नाही, ही एकमेव बाब मोदी सरकारची फलश्रुती सांगणारी आहे. एका अर्थी पंतप्रधान मोदी यांनी देशात युगांतर घडवले असे म्हटले तरी वावगे ठरू नये. गेल्या दोन वर्षांत कोरोना काळामध्ये सर्वच जगाची व्यवस्था विस्कटली. त्यात भारत देखील अपवाद नव्हता. परंतु पंतप्रधान मोदी यांनी जागरुक राहून अचूक निर्णय घेत देशाचे गलबत खवळलेल्या दर्यातून सुखरूप बाहेर काढले. 2014 सालाच्या आधी प्रगत देशांचा समुदाय भारताला फारशी किंमत देत नसे. परंतु पंतप्रधान मोदी यांनी ही प्रतिमा बदलली. आज संपूर्ण विश्व भारताकडे उद्याचे आशास्थान या नजरेतून बघत आहे. याच सरकारच्या काळात सर्वाधिक परकीय गुंतवणूक भारतात आली. सध्या जगभरात अडचणीची स्थिती असतानाही देशाचा विकास दर 8.5 टक्के आहे आणि महागाईचा दर 7.5 टक्के एवढा मर्यादित आहे. शेजारच्या श्रीलंकेसारख्या देशात काय परिस्थिती झाली आहे हे आपण पाहतोच आहोत. दुसरा शेजारी पाकिस्तान अक्षरश: दुर्दशेच्या वाटेवर उभा आहे. गेल्या आठ वर्षांत मोदी सरकारने जगातील सर्वात मोठा आर्थिक समावेश कार्यक्रम राबवला. सर्वात मोठी आरोग्य योजना भारतातच राबवली गेली. याच काळात गोरगरीब जनतेला सर्वाधिक धान्य वितरण करण्यात आले. लसीकरणाची सर्वात मोठी मोहीम भारतानेच राबवली. पंतप्रधान मोदी यांच्या स्वच्छता अभियानाची सुद्धा चेष्टा झाली होती. परंतु या अभियानाची दृश्य फळे आता दिसू लागली आहेत. देशातील प्रत्येक गावात वीज आणि रस्त्यांचे जाळे उभे झाले आहे. प्रत्येक घरात नळाद्वारे पाणी पुरवण्याचा संकल्प जवळपास तडीला गेला आहे. 370 कलम हटवणे, तिहेरी तलाक पद्धत नष्ट करणे, राममंदिराची उभारणी ही वचने देखील मोदी सरकारने पूर्ण केली. दृष्टिहीन झालेल्या काँग्रेसला मात्र यातले काहीच दिसत नाही. काँग्रेसला दिसत नसले तरी भारताची जनता मात्र डोळस आहे ही समाधानाची बाब.

Check Also

कोकण पदवीधर मतदारसंघ निवडणुकीत भाजपच्या निरंजन डावखरेंची विजयी हॅट्ट्रिक

नवी मुंबई : रामप्रहर वृत्त महाराष्ट्र विधान परिषदेच्या कोकण विभाग पदवीधर मतदारसंघात भाजप महायुतीचे उमेदवार …

Leave a Reply