Breaking News

कर्नाळा बँक आर्थिक घोटाळा प्रकरण : शेकापचे माजी आमदार विवेक पाटील यांच्याविरोधात आरोपपत्र दाखल

मुंबई ः प्रतिनिधी

सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) पनवेल येथील कर्नाळा नागरी सहकारी बँकेतील घोटाळा, भ्रष्टाचारप्रकरणी बँकेचे विद्यमान अध्यक्ष आणि शेकापचे माजी आमदार विवेकानंद शंकर पाटील यांच्याविरोधात गुरुवारी (दि. 12) आरोपपत्र दाखल केले. सध्या पाटील हे तळोजा जेलमध्ये आहेत. कर्नाळा नागरी सहकारी बँक गैरव्यवहारप्रकरणी विवेक पाटील यांच्यासह बँकेचे तत्कालीन व विद्यमान संचालक आणि मुख्याधिकारी यांच्यासह 76 जणांविरोधात गुन्हा दाखल झाला होता. त्यापूर्वीच संबंधितांविरोधात पनवेल शहर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले होते. या प्रकरणी राज्याकडून पुढील कारवाईच होत नव्हती. दरम्यान, ईडीने या गुन्ह्यातील कागदपत्रांच्या आधारे कारवाई सुरू केली. संशयित मनी लॉण्डरिंग प्रकरणात ईडीने तपास सुरू केला होता. त्या अंतर्गत संबंधित आरोपींनी 512 कोटी 54 लाख रुपये बनावट कागदपत्रांच्या सहाय्याने कर्ज दिल्याचे आणि त्यांच्याकडून परतफेडही न झाल्याचे चौकशीत समोर आले. कर्नाळा बँकेतील संशयास्पद अशा 67 खात्यांतील कोट्यवधी रुपये हे रोख रकमेच्या स्वरूपात वेळोवेळी काढण्यात आले. काढण्यात आलेल्या या रकमा विवेक पाटील यांच्याच अधिपत्याखालील कर्नाळा चॅरिटेबल ट्रस्ट आणि कर्नाळा स्पोर्ट्स अकॅडमी या संस्थांच्या 12 वेगवेगळ्या खात्यांमध्ये भरण्यात आल्याचे ईडीला चौकशीत आढळले होते. चौकशीअंती विवेक पाटील यांच्यावर कोट्यवधी रुपयांचा अपहार केल्याचा ठपका ठेवण्यात आला. हा गैरव्यवहार झाल्याचे उघड झाल्यानंतर कर्नाळा बँकेतून सामान्य ग्राहकांनाही आपल्याच हक्काचे पैसे काढण्यास मनाई करण्यात आली. त्यामुळे बँकेचे सामान्य खातेदार, ठेवीदार हवालदिल झालेले आहेत.

Check Also

खोपोलीत 106 कोटींचे ड्रग्ज जप्त

पोलिसांची कंपनीत कारवाई, त्रिकूट ताब्यात खोपोली, खालापूर : प्रतिनिधी खोपोली पोलिसांनी ढेकू गावच्या हद्दीतील एका …

Leave a Reply