केंद्र सरकारकडून अग्निपथ योजनेची घोषणा
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
भारतीय सैन्यात अग्निपथ भरती योजनेची घोषणा केंद्र सरकारने केली आहे. या अंतर्गत तिन्ही संरक्षण दलांमध्ये चार वर्षांसाठी तरुणांची भरती केली जाणार आहे, ज्याला ‘टूर ऑफ ड्यूटी’ असे नाव देण्यात आले आहे.
सुरक्षाविषयक कॅबिनेट समितीने मंगळवारी (दि. 14) ऐतिहासिक निर्णय घेऊन अग्निपथ या परिवर्तनीय योजनेला मंजुरी दिली आहे. यात भारतीय तरुणांना सशस्त्र सेवेत सामील होण्याची संधी दिली जाईल, असे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटले आहे.
नव्या योजनेनुसार ही सैन्य भरती चार वर्षांसाठी असणार आहे. चार वर्षांनंतर सेवेचा आढावा घेतला जाईल. त्यानंतर काही सैनिकांची सेवा वाढवली जाऊ शकते, तर बाकीचे सैनिक निवृत्त होतील. या चार वर्षांच्या नोकरीमध्ये सहा आणि नऊ महिन्यांचे प्रशिक्षणदेखील असणार आहे.
‘अग्निपथ’च्या माध्यमातून सैन्याचा भाग बनलेल्या सैनिकांना दरमहा 30 हजार ते 40 हजार रुपये पगार मिळणार आहे. यासोबतच 48 लाख रुपयांचा विमा असेल. अधिकार्यांनी सांगितले की, सैनिकांना अग्निवीर कौशल्य प्रमाणपत्रदेखील मिळेल, जे त्यांना सैन्यात सेवा दिल्यानंतर इतर नोकर्या मिळण्यास मदत करेल.
जर अग्निवीर सेवेदरम्यान शहीद झाला, तर त्याच्या कुटुंबाला एक कोटी रुपये मिळतील, तर अपंगत्व आल्यास 48 लाख रुपयांची मदत दिली जाणार आहे, अशी माहिती लेफ्टनंट जनरल अनिल पुरी यांनी दिली.
अग्निपथ योजनेद्वारे भारतीय तरुणांना ‘अग्निवीर’ म्हणून सेवा करण्याची संधी मिळणार आहे. यामुळे देशाची सुरक्षा मजबूत
होईल आणि तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील.
-राजनाथ सिंह, संरक्षणमंत्री