पनवेल : प्रतिनिधी
कर्नाळा नागरी सहकारी बँकेतील 560 कोटी रुपयांच्या घोटाळ्याला जबाबदार असलेले चेअरमन आणि शेकापचे माजी आमदार विवेकानंद शंकर पाटील यांच्या मालमत्ता विक्रीला सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) बंदी घातली आहे. याबाबत ईडीचे मुंबई झोन-2चे उपसंचालक अक्षयकुमार सिंग यांनी आदेश जारी केला आहे.
कर्नाळा बँकेतील गैरव्यवहार आणि बोगस कर्जखात्यांच्या आधारे विवेक पाटील यांनी केलेले गैरकारभार आता उघड होऊ लागले आहेत. विवेक पाटील यांनी बँकेतील पैसे गैरमार्गाने आपल्याच कंपन्या, संस्था, सेवाभावी संस्था यांसारख्या आपल्याच नियंत्रणाखालील खाजगी यंत्रणांकडे वळवले. ही बाब ईडीने केलेल्या चौकशीत पुढे आले आहे.
ईडीने विकायला बंदी घातलेल्या मालमत्तांमध्ये कर्नाळा स्पोर्ट्स अकॅडमीसह पनवेल तालुक्यातील विविध भागांतील शेकडो एकर जागा आणि काही फ्लॅट्सचा समावेश आहे. उपसंचालक अक्षयकुमार सिंग यांनी या आदेशात संबंधित मालमत्तांबाबत सर्व संबंधितांना पुढील आदेश येईपर्यंत मालमत्ता विक्री, भेटवस्तू गहाण ठेवण्याद्वारे हस्तांतरित किंवा शुल्क आकारणीस मनाई किंवा प्रतिबंधित केले आहे. तारण अथवा कोणत्याही प्रकारे या मालमत्तांचे व्यवहार करण्यास ईडीने मनाई केली आहे.
वर्षभर ईडीच्या अटकेत असलेल्या विवेक पाटील यांच्यावर 67 बनावट खात्यांच्या माध्यमातून 560 कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. चार वेळा शेकापचे आमदार राहिलेल्या विवेक पाटील यांना ईडीने गेल्या वर्षी 15 जूनला अटक केली होती. ते आजही तळोजा कारागृहातच आहेत.
बँकेचे अध्यक्ष व संचालकांनी इतरांच्या नावावर असलेली रक्कम स्वतःच्या खात्यात वर्ग केल्यानंतर ईडीने गुन्हा दाखल करून तपास सुरू केला होता. 2019-20मध्ये रिझर्व्ह बँकेच्या आदेशानुसार कर्नाळा नागरी सहकारी बँकेचे ऑडिट करण्यात आले. या ऑडिटदरम्यान बँकेचे तत्कालीन चेअरमन विवेक पाटील हे बनावट खात्याद्वारे त्या बँकेतून पैसे काढत होते आणि ते कर्नाळा चॅरिटेबल ट्रस्ट आणि कर्नाळा क्रीडा अकादमीत टाकत होते, असे आढळून आले. अलीकडेच विवेक पाटील जामीन अर्ज फेटाळल्यामुळे ते तळोजा कारागृहात आहेत, मात्र या प्रकरणात गुन्हे दाखल झालेल्या संचालकावर अद्याप कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही.
ईडीने विक्रीला बंदी घातलेल्या मालमत्ता
1. कर्नाळा स्पोर्ट्स अकॅडमी (50 हजार चौमी विस्तार असलेली)
2. पनवेल तालुक्यातील नेवाळी, तारा, पोसरी येथील आणि उरण तालुक्यातील पुनाडे येथील शेकडो एकर जमीन
3. नवीन पनवेल येथील फ्लॅट्स
4. पनवेल मार्केट यार्ड येथील इमारत